Jump to content

लिलाव

लिलाव ही एखादी वस्तू अथवा मालमत्ता याची विक्री आधी जाहीर करून जास्तीत जास्त किंमत देणाऱ्या खरेदीदाराला विकण्याची प्रक्रिया होय.

लिलाव करताना खालील गोष्टींचा अंतर्भाव होतो

१) मालमत्ता किंवा वस्तू विकण्याची जाहीर सूचना देऊन संभाव्य खरेदीदारास आवाहन केले जाते

२) मालमत्ता किंवा वस्तूचे तपशीलवार वर्णन प्रसिद्ध केले जाते

३) काही वेळा जी मालमत्ता अथवा वस्तू विकायची आहे तिची तपासणी करण्यासाठी संभाव्य खरेदीदारास वेळ दिला जातो

४) लिलावाच्या दिवशी जास्तीत जास्त किंमत देणाऱ्या खरेदीदारास ती वस्तू विकली जाते.

५) लिलावाच्या अटींप्रमाणे खरेदीदाराने ठराविक दिवसात पैसे जमा केल्यावर वस्तूचा अथवा मालमत्तेचा ताबा नव्या खरेदीदारास दिला जातो.

लिलाव करण्याच्या पद्धती खालीलप्रमाणे

१) जाहीर लिलाव - इंग्लिश चढत्या किमतीची पद्धत - लिलाव पुकारणारा व्यक्ती कमीत कमी कमी अपेक्षित किमत जाहीर करतो. उपस्थित संभाव्य खरेदीदार त्या पेक्षा जास्ती किंमत देऊ करतात. जो सर्वात जास्ती किंमत देतो त्याला वस्तू विकली जाते

२) जाहीर लिलाव - डच उतरत्या किमतीचा लिलाव - लिलाव पुकारणारा व्यक्ती अपेक्षित असणारी सर्वात अधिक किंमत स्वतःच जाहीर करतो. अर्थात या किमतीला कुणी खरेदीदार तयार नसतात. मग ही किंमत कमी कमी करत आणली जाते. एक वेळ अशी येते कि एखादा खरेदीदार त्या कमी किमतीला तयार होतो. हॉलंड मध्ये ट्युलिपच्या फुलांसाठी ही लिलाव पद्धत वापरली जायची

३) निविदा पद्धतीने लिलाव - ठराविक दिवशी सर्व इच्छुक खरेदीदार आपण देऊ करत असलेली किंमत बंद पाकिटात लिहून लिलावकर्त्याला देतात. ही पाकिटे उघडून ज्याने सर्वात जास्ती किंमत देऊ केलेली असते त्याला वस्तू विकली जाते

ही वस्तूंची विक्री करण्याची जुनी पद्धत आहे. भारतीय पुराणकथांमध्ये सुद्धा राजा हरिश्चंद्र आणि राणी तारामती यांचा गुलाम म्हणून लिलाव झाल्याचे संदर्भ आहेत. वस्तूंची उपलब्धता कमी पण खरेदीदार जास्ती असतील तिथे लिलाव पद्धत मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. उदा. भाजी बाजार, फुल बाजार, पुरातन वस्तू, चित्रे, शिल्प, स्थावर मालमत्ता इत्यादी.