लिपी
ब्राह्मी |
---|
ब्राह्मी परिवारामधील लिप्या |
लिपी ही लिखाणाची सुत्रबद्ध पद्धत आहे. लिपीचा उपयोग माहितीसंचयासाठी तसेच संदेश देवाणघेवाण करण्यासाठी केला जातो. लिपीमध्ये प्रामुख्याने अक्षरे व अंकांचा वापर केला जातो. वर्ण किंवा ध्वनी यांचे लेखन करण्यासाठी ज्या चिन्हांना उपयोग करतात, त्या चिन्हसमुहाला लिपी असे नाव आहे. एका चिन्हापासून जेव्हा एकाच ध्वनीचा बोध होतो, तेव्हा लिपीचा उद्देश सफल होतो.
आजची लिपी ही मानव बोलायला शिकल्यापासून हळूहळू परिणत झाली आहे. मानवाची संस्कृती जेवढी प्राचीन, तेवढीच लिपीही प्राचीन आहे.[१]
लिपीचा उगम
प्रारंभी मनुष्य आपले विचार साध्या उभ्या-आडव्या रेघोट्या काढून व्यक्त करीत असे. रेघोट्या मारता मारताच चित्रे काढण्याइतकी त्याची प्रगती झाली. त्या चित्रांतून तो आपला आशय व्यक्त करू लागला. सूर्य, वृक्ष, साप, बकरी इ. चित्रांनी त्या त्या वस्तूंचा व प्राण्यांचा बोध होऊ लागला. प्राचीन गुहानिवासी माणसांनी कोरलेली चित्रे अलिकडे सापडली आहेत.[१]
प्राचीन काळी इजिप्त व मेसोपोटेमिया या देशांतही भावाची अभिव्यक्ती चित्रांच्या द्वारेच होत असे. पण इजिप्तमध्ये ही चित्रे प्रायः दगडांवर खोदीत आणि मेसापोटेमियात ती मातीच्या विटांवर खिळ्यांनी कोरीत. विटांचा पृष्ठभाग मऊ असल्याने त्यांवर केवळ रेघाच ओढता येत, गोलाकार काढता येत नसत. उदा. तीनचार रेघा ओढून विटांवर माशाचे चित्र काढीत. त्यामुळे आरंभापासूनच ही चित्रे संकेतात्मक झाली. याच संकेतात्मक चित्रांतून पुढे इराणी लोकांना अक्षरे बनविली. चित्रलिपी हा लिपीच्या विकासातील एक टप्पा होय.
वैदिक लोकांनी गणन व लेखन या बाबतीत बरीच प्रगती केली होती. भारतात प्रारंभी ब्राह्मी लिपीचा उपयोग केला जात असे. पण ती निश्चित केव्हा प्रचारात आली, ते सांगता येत नाही. मात्र ती सनपूर्व पाचव्या शतकात प्रचारात होती, एवढे निश्चित म्हणता येते.[१]
सनपूर्व चौथ्या शतकापूर्वी लिपी हा शब्द प्रचारात होता. पाणिनीच्या अष्टाध्यायीत लिपी, लिबी व ग्रंथ या शब्दांचा वापर केलेला आहे. तसेच त्याने लिपिकर व यवनानी हे शब्द बनवण्याचे नियम दिले आहेत. कात्यायन व पतंजली यांनी यवनानी शब्दाचा अर्थ यवनांची लिपी असा दिला आहे. त्यावरून त्या काळी यावनी लिपी प्रचारात होती, असे समजते.
लिपीची दिशात्मकता
लिपींची विभागणी ही त्यांच्या लिहिण्याच्या दिशेने ही केली जाते. इजिप्शियन हायरोग्लिफ हे डावीकडून उजवीकडे व उजवीकडून डावीकडे अश्या दोन्ही प्रकारे लिहितात. प्राचीन अद्याक्षरे ही वेगवेगळ्या दिशेने लिहिली जात असे, जसे आडव्या प्रकारे (एका बाजूला एक) किंवा अनुलंबरित्या (एका खाली एक). लिपींच्या मानकीकरणापूर्वी अक्षरे डावीकडून उजवीकडे व उजवीकडून डावीकडे दोन्ही प्रकारे लिहित. हे बहुतेक सामान्यपणे बुस्ट्रोफेडोनिक पद्धतीने लिहिले जात होते: एका (आडव्या) दिशेने प्रारंभ करणे, नंतर ओळीच्या शेवटी व दिशा बदलणे.
सर्व भारतीय व युरोपियन लिप्या ह्या डावीकडून उजवीकडे लिहितात. तर अरेबियन किंवा मध्य आशियाई लिप्या ह्या उजवीकडून डावीकडे लिहिल्या जातात. चीनी लिपी ही अनुलंबरित्या लिहिली जाते.
चांगल्या लिपीचे निकष[१]
- निश्चितता - एका वर्णाचा एकच ध्वनी असणे.
- जसे लिहिले असेल, तसेच वाचता येणे, म्हणजे उच्चाराच्या बाबतीत संदेह नसणे. उदा. कमल हा शब्द आपण जसा लिहितो, तसाच त्याचा उच्चार करतो आणि तसाच तो वाचतो.
- शब्दातील प्रत्येक अक्षराचा उच्चार करावा लागणे.
- एकाच ध्वनीची अनेक लिपिचिन्हे नसावी. नाहीतर कोणत्या वेळी कोणते लिपिचिन्ह योजावे, त्याबद्दल गोंधळ होईल.
- लिपी दिसण्यात आकर्षक असावी.
- लिपी जलद गतीने लिहिता यावी.
- ती मुद्रणसुलभ असावी.
संदर्भ
संदर्भसूची
जोशी, पं. महादेवशास्त्री. भारतीय संस्कृति कोश - आठवा खंड - राजस्थान ते विहार. p. ३७५-३७६. लिपी