Jump to content

लक्षद्वीप

  ?लक्षद्वीप
ലക്ഷദ്വീപ്
भारत
—  केंद्रशासित प्रदेश  —
कवरत्ती समुद्री किनारा
कवरत्ती समुद्री किनारा
कवरत्ती समुद्री किनारा
Map

१०° ३४′ १२″ N, ७२° ३८′ २४″ E

गुणक: 10°34′N 72°38′E / 10.57°N 72.63°E / 10.57; 72.63

प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ३२ चौ. किमी
राजधानीकवरत्ती
मोठे शहरकवरत्ती
जिल्हे
लोकसंख्या
घनता
६०,५९५ (७ वा) (२००१)
• १,८९४/किमी
भाषामल्याळम
राज्यपालबी.वी. सिल्वराज
स्थापित१ नोव्हेंबर १९५६
संकेतस्थळ: लक्षद्वीप संकेतस्थळ

लक्षद्वीप हा भारतातील आठ केंद्रशासित प्रदेशांपैकी सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश आहे. याचे क्षेत्रफळ फक्त ३२ चौ.किमी. आहे. लक्षद्वीपची लोकसंख्या ६४,४२९ एवढी आहे. मल्याळी ही येथील प्रमुख भाषा आहे. लक्षद्वीपची साक्षरता ९२.२८ टक्के आहे, ही साक्षरतेच्या बाबतीत केरळनंतर भारतात दुसऱ्या क्रमांकावर आहे. नारळ, लिंबू, चिंच, केळी ही येथील प्रमुख पिके आहेत. कवरत्ती ही लक्षद्वीपची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. येथून जवळच असलेले मिनिकॅाय बेट अतुलनीय निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. फॅास्फेट, कॅल्शियम, कार्बोनेट ही येथील प्रमुख खनिजे आहेत.

मिनिकाॅय बेट
  1. ) लक्षद्वीप बेटे हा अरबी समुद्रातील बेटांचा एक समूह आहे.
  2. ) ही बेटे भारताच्या पश्चिम किनाऱ्यापासून खूप दूर, अरबी समुद्रात स्थित आहेत.
  3. ) बहुतांशी लक्षदीप बेटे प्रवाळाची कणकंदविप आहेत.
  4. ) लक्षदीप बेटे विस्ताराने लहान असून, त्यांची समुद्रसपाटीपासूनची उंची तुलनेने कमी आहे.

इतिहास

स्थानिक दंतकथांनुसार केरळचा अखेरचा राजा चेरमान पेरुमाल याच्या कारकिर्दीत या बेटांवरील पहिली वसाहत झाली असावी. काही अरब व्यापाऱ्यांच्या हुकुमावरून जेव्हा राजाला इस्लाम धर्म स्वीकारावयास लावण्यात आला, तेव्हा राजधानी क्रंगनोर (सांप्रतचे कोडुंगलूर)मधून त्याने मक्केला जाण्याच्या निमित्ताने पलायन केले. त्याच्या शोधार्थ किनाऱ्यावरील अनेक ठिकाणांवरून मक्केकडे जाणाऱ्या खलाशी बोटी सोडण्यात आल्या. त्यांपैकी कननोरच्या राजाची बोट तीव्र वादळात सापडून फुटली. तेव्हा अरबी समुद्रातच काही दिवस काढल्यानंतर शेवटी राजा व त्याच्याबरोबरील लोक एका बेटावर आले, ते बेट म्हणजेच ‘बंगारम बेट’ असल्याचे मानतात. त्यानंतर ते जवळच्या अगत्ती बेटावर आले. शेवटी वातावरण निवळल्यानंतर वाटेतील वेगवेगळ्या बेटांवर थांबत थांबत ते मुख्य भूमीवर आले. हा राजा परतल्यावर खलाशी आणि सैनिकांची दुसरी तुकडी अरबी समुद्रात पाठविण्यात आली. तेव्हा त्यांनी अमिनी बेटाचा शोध लावून तेथे ते राहू लागले. या पथकामध्ये पाठविलेले लोक हिंदू होते. आज जरी या बेटांवर इस्लामचे प्रभुत्व स्पष्टपणे दिसत असले, तरी अजूनही हिंदूंच्या काही सामाजिक परंपरा या लोकांमध्ये पहावयास मिळतात. अमिनी, काव्हारट्टी, ॲन्ड्रोथ व काल्पेनी या बेटांवर प्रथम लहान लहान वसाहती स्थापन झाल्या व त्यानंतर या बेटांवरील लोकांनी अगत्ती, किल्टन, चेटलट व काडमट या बेटांवर स्थलांतर केले.

ओबेदुल्ला या अरबी फकिराने येथे इस्लामवर प्रवचने केल्याचे सांगितले जाते. ॲन्ड्रोथ बेटावर ओबेदुल्लाची कबर असून आज ते एक पवित्र स्थळ मानले जाते. श्रीलंका, मलेशिया आणि ब्रह्मदेशातही ॲन्ड्रोथच्या धर्मोपदेशकांचा आदर केला जातो. पोर्तुगीजांचे भारतात सोळाव्या शतकात आगमन झाल्यावर समुद्रपर्यटकांच्या दृष्टीने लखदीवला विशेष महत्त्व आले. जहाजांसाठी काथ्याच्या दोरखंडांना खूप मागणी होती, त्यासाठी बेटांवरील जहाजांची लूट करण्यास पोर्तुगीजांनी सुरुवात केली. नारळाचा काथ्या मिळविण्यासाठी पोर्तुगीज लोक काही वेळा जबरदस्तीने अमिनी बेटावर उतरत, परंतु बेटावरील लोकांनी या अतिक्रमण करणाऱ्या लोकांना विष घालून मारले. अशा रीतीने पोर्तुगीजांच्या अतिक्रमणाचा शेवट करण्यात आला.

सर्व बेटांवरील लोकांचे इस्लामीकरण केल्यानंतरही पुढे काही वर्षे चिरक्कलच्या (छिराकल) हिंदू राजाचेच अधिराज्य या बेटांवर होते. सोळाव्या शतकाच्या मध्यात चिरक्कलच्या राजाकडून कननोरच्या अरक्कल (अली राजा) या मुस्लिम घराण्यातील राजाच्या हातात बेटांची सत्ता आली. अरक्कलची कारकीर्द खूपच जुलमी व असह्य होती. तिला कंटाळून सन १७८३मध्ये अमिनी बेटावरील काही लोक मोठ्या धैर्याने मंगलोरला टिपू सुलतानकडे गेले व अमिनी गटातील बेटांची सत्ता स्वतःकडे घेण्याची विनंती त्यांनी टिपू सुलतानला केली. टिपू सुलतानने अरक्कलच्या पत्नीशी मैत्रीपूर्ण बोलणी केली, तेव्हा विचारविनिमय होऊन अमिनी गटातील बेटांची सत्ता टिपू सुलतानकडे देण्यात आली. अशा प्रकारे बेटांची विभागणी दोन अधिराज्यांत झाली. पाच बेटे टिपू सुलतानाच्या अधिसत्तेखाली आली व उरलेली तशीच अरक्कलच्या अधिसत्तेखाली राहिली. श्रीरंगपट्टणच्या युद्धात टिपू सुलतान मारला गेल्यानंतर बेटांचा ताबा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीकडे आला. त्यावेळी बेटाचा राज्यकारभार मंगलोरहून चाले. सन १८४७मध्ये एका तीव्र चक्रीवादळाचा तडाखा ॲन्ड्रोथ बेटाला बसला. तेव्हा चिरक्कलच्या राजाने बेटावरील लोकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी व त्यांना मदत देण्यासाठी ॲन्ड्रोथला जाण्याचे ठरविले. तेव्हा ईस्ट इंडिया कंपनीचा अधिकारी सर विल्यम रॉबिन्सन यानेही राजाबरोबर ॲन्ड्रोथला जाण्याचे ठरविले. ॲन्ड्रोथला गेल्यावर तेथील लोकांच्या सर्वच मागण्या पुरविणे राजाला अशक्य वाटले, तेव्हा विल्यमने कर्जाच्या स्वरूपात काही मदत राजाला देऊ केली. ही मदत पुढे चार वर्षेपर्यंत चालू ठेवली. कर्जाची रक्कम खूपच वाढली. इंग्रजांनी राजाकडे कर्ज परतफेडीची मागणी केली; परंतु परतफेड करणे राजाला अशक्य होते. तेव्हा १८५४मध्ये उरलेल्या सर्व बेटांचे प्रशासन ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात देण्यात आले. अशा प्रकारे सर्व बेटांवर ब्रिटिशांचे अधिराज्य आले. दोन लाख रुपयांच्या मोबदल्यात ही बेटे घेतली म्हणून त्यांचे नाव ‘लक्षद्वीप’ पडले असे म्हणले जाते.

भूगोल

देशातील या सर्वात लहान केंद्रशासित प्रदेशाचा भूभाग कमी असला, तरी याला ४,२०० चौ. कि.मी.चे खाजणक्षेत्र, २०,००० किमीचे जलक्षेत्र व सात लाख किमीचे आर्थिक क्षेत्र लाभलेले आहे. या समूहातल्या कोणत्याही बेटाची समुद्रसपाटीपासूनची उंची दहा मीटरपेक्षा अधिक नाही. पृथ्वीचे तापमान सतत वाढत आहे. त्यामुळे समुद्राच्या पाण्याची पातळी वाढून पुढील सुमारे पन्नास ते शंभर वर्षांच्या कालावधीत लक्षद्वीप बेटे पाण्याखाली बुडतील, असा अंदाज राष्ट्रीय महासागर विज्ञान संस्थेने व्यक्त केला आहे. या बेटांवर कोणतीही पर्वतश्रेणी नाही किंवा बेटावरून कोणतीही नदी वाहत नाही.

हवामान

लक्षद्वीप बेटांवरील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १६० सेंमी. असून दोन्हीही मॉन्सूनचा पाऊस येथे पडतो. मार्च, एप्रिल व मे महिन्यांत कडक उन्हाळा जाणवतो. नारळ, केळी, अळू, शेवगा, विलायती फणस, फणस व रानटी बदाम ह्या वनस्पती या प्रदेशात आढळतात. पुळणींच्या जवळ थॅसिआ हेंप्रिचीन व साइमॉड्सीए आयसोएटिफोलिया असे दोन भिन्न प्रकारांचे सागर गवत आढळते. सागरामुळे होणारे क्षरण व पुळणींवर होणारे गाळाचे संचयन यांवर या गवतामुळे मर्यादा घातल्या गेल्या आहेत. लक्षद्वीपमध्ये सागरी प्राणिजीवन समृद्ध आहे. भूभागावर गुरेढोरे व पाळीव खाद्यपक्षी आढळतात. सामान्यपणे आढळणारे थराथसी (स्टर्ना फुस्काटा) व कारिफेटू (ॲन्वहस स्टॉलिड्स) हे समुद्रपक्षी आहेत. हे बेट पक्षी अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आलेले आहे.

अर्थतंत्र

कवारत्ती

ही लक्षद्वीपची राजधानी असून येथे सर्व शासकीय कार्यालये आहेत. याच बेटावर मत्स्यालय व जलजीवालय आहे. स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय व्यवसायाच्या विकासास लक्षद्वीपमध्ये खूप वाव आहे; परंतु भारताच्या मुख्य भूमीवरून लक्षद्वीपला जाण्यासाठी पूर्वी असलेल्या कडक निर्बंधांमुळे पर्यटन व्यवसायाचा विशेष विकास झालेला नव्हता; तथापि वरील निर्बंध थोड्या प्रमाणात सौम्य करण्यात आल्यामुळे लक्षद्वीपला जाणाऱ्या स्थानिक तसेच परदेशी पर्यटकांच्या संख्येत वाढ होण्यास चालना मिळालेली आहे. पर्यटकांना वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. सन १९८७-८८मध्ये ३१६ परदेशी पर्यटकांनी तसेच भारताच्या मुख्य भूमीवरील १,६३० पर्यटकांनी लक्षद्वीप बेटांना भेट दिली. खारकच्छच्या उथळ व नितळ पाण्यात वाढणारे प्रवाळ हे पर्यटकांचे मुख्य आकर्षण असते. अगत्ती बेटावर धावपट्टी तयार करण्यात आली असून एप्रिल १९९८पासून भारताची मुख्य भूमी व अगत्ती यांदरम्यान वायुदूतसेवा कार्यान्वित झाली आहे. बंगारम बेटावर मनुष्यवस्ती नसली, तरी तेथे वेगवेगळ्या सुविधा पुरवून पर्यटन केंद्र म्हणून त्याचा विकास करण्यात आला आहे.

प्रमुख शहरे

कवरत्ती हे लक्षद्वीपमधील एकमात्र मोठे शहर आहे.

संदर्भ

१) मराठी विश्वकोश