र.गो. सरदेसाई
रघुनाथ गोविंद सरदेसाई (७ सप्टेंबर, १९०५:कोल्हापूर, महाराष्ट्र - ११ डिसेंबर, १९९१) हे मराठी लेखक, पत्रकार, संपादक, कथाकार, नाट्यचित्र समीक्षक आणि क्रीडाविषयक पुस्तकांचे कर्ते होते.
सरदेसाईंचे शिक्षण कोल्हापुरात झाले. शिक्षण झाल्यावर त्यांनी पुण्याच्या स्फूर्ती व चित्रमय जगत या मासिकांचे संपादक व सहसंपादक म्हणून काम केले. पुढे मुंबईच्या चित्रा, तारका, नवयुग, विविधवृत्त, विहार, आदी साप्ताहिकांत, मराठा या दैनिकात आणि यशवंत या मासिकात संपादकीय विभागातही त्यांनी काम केले. नवाकाळ या दैनिकात सहसंपादक या पदावर ते काही काळ होते. वृत्तपत्रांतून त्यांनी क्रीडा, तसेच नाट्य आदी विषयांवर लेखन केले. र. गो. स. व हरिविवेक या टोपण नावांनीही त्यांनी लेखन केले. त्यांचे बहुतेक क्रीडाविषयक लिखाण 'हरिविवेक' या टोपण नावाने आहे.
पुस्तके
- आमचा संसार (विनोदी लेखसंग्रह)
- कागदी विमाने, चलती नाणी (लघुनिबंधसंग्रह)
- क्रीडा (खेळ खेळाडू यांचे चुटके)
- खेळ किती दाविती गमती (विविध खेळांच्या कथा)
- खेळाचा राजा (लॉन टेनिसचा संपूर्ण इतिहास सांगणारा ग्रंथ)
- खेळांच्या जन्मकथा भाग १, २. (भाग २ मध्ये ऑलिंपिक सामन्यांची माहिती आली आहे)
- चित्रा (कथासंग्रह)
- स्वाती (कथासंग्रह)
- बहुत दिन नच भेटती (ललित)
- महान क्रिकेट कर्णधार
- महाश्वेता (कथासंग्रह)
- माझ्या पत्र जीवनातील शैली (व्यक्तिचित्रणे)
- सुरसुरी (विनोदी लेखसंग्रह)
- हिंदी क्रिकेट (मराठीतले क्रिकेटसंबंधीचे पहिले पुस्तक)