रोजकीर्द
रोजकीर्द हे व्यापारातील व्यवहारांच्या मूळ नोंदीचे किंवा प्राथमिक नोंदीचे पुस्तक आहे. रोजकीर्दीसाठी असणारा इंग्लिश शब्द Journal हा फ्रेंच Jour म्हणजे दिवस या शब्दावरून आलेला आहे. व्यवसायातील सर्व व्यवहारांच्या नोंदी रोजकीर्दीमध्ये तारीखवार आणि द्विनोंदी पद्धतीने ठेवल्या जातात.
व्याख्या
खातेवहीत नोंद करणे सहजसुलभ व्हावे असे वर्गीकरण करणारे पुस्तक म्हणजे रोजकीर्द होय - एल सी क्रॉपर
या वरून असे लक्षात येते की रोजकीर्द ही खातेवहीत नोंद होण्यापूर्वी वापरली जाते. तसेच रोजकीर्दीमध्ये व्यवहारांचे वर्गीकरण केले जाते.
महत्त्व
१) रोजकीर्द हे पुस्तक सर्व लहान मोठे व्यावसायिक पुस्तलेखनासाठी वापरतात
२) व्यवहारांची संपूर्ण माहिती येथे उपलब्ध होते
३) रोजकीर्दीमधील व्यवहारांच्या तपशीलवार वर्णनाने व्यवहार समजण्यास मदत होते.
४) खातेवहीत होणारे व्यवहार बरोबर नोंदवले गेले की नाही हे बघण्यासाठी रोजकीर्द उपयोगी पडते.
५) रोजकीर्दीमध्ये जमा आणि नावे रकमा नोंदवल्या जात असल्याने दोन्ही बाजूंच्या रकमांची खात्री करता येते.
६) रोजकीर्दीमधील नोंदी प्रमाणकांवर आधारित असल्याने न्यायालयात पुरावा म्हणून सादर करता येतात.
७) वर्षांच्या शेवटी आर्थिक स्थिती समजून घेताना अंतिम खाती बनवावी लागतात त्यावेळी रोजकीर्दीमधील नोंदी उपयोगी पडतात.
रोजकीर्दयन म्हणजे रोजकीर्दीत नोंद करणे
व्यवहारांची नोंद रोज्कीर्दीमध्ये करणे म्हणजे रोजकीर्दयन (इंग्लिश : Journalising). लेखांकनाच्या द्विनोंदी पद्धतीप्रमाणे प्रत्येक व्यवहाराचे जमा आणि नावे असे दोन परिणाम होतात. रोजकीर्दीमध्ये नोंद करताना खालील प्रकारे केली जाते.[१]
१) नोंद केल्या जाणाऱ्या व्यवहारात कुठली खाती सहभागी आहेत याची ओळख पटवणे.उदा. श्री अबक यांनी रोखीने खरेदी केली या व्यवहारात श्री अबक यांचे खाते येणार नाही पण रोख खाते आणि विक्री खाते या वर नक्कीच परिणाम होईल.
२) ही खाती कोणत्या प्रकारची आहेत हे निश्चित करणे.
३) या प्रकारच्या खात्यांना लागू होणारे द्विनोंदी लेखांकनाचे नियम लक्षात घेऊन त्या प्रमाणे कुठले खाते नावे होईल व कुठले खाते जमा होईल ते ठरवणे.
४) तपशील रकान्यात नावे होणारे खाते प्रथम लिहिले जाते. त्या खालच्या ओळीवर काही अंतर सोडून जमा होणाऱ्या खात्याचे नाव लिहितात.
५) नावे खात्याचे नाव लिहून शेवटी 'नावे' असे लिहिले जाते. जमा खात्याच्या मागे -ला हा प्रत्यय जोडून या खात्याला रक्कम जमा झाली असे दर्शवतात.
६) अशा प्रकारे नोंद करून कंसात व्यवहाराचे संक्षिप्त वर्णन केले जाते. वर्णनात शेवटी बद्दल असे लिहून ही नोंद का केली हे सांगितले जाते
७) प्रत्येक नोंदी नंतर एक सरळ रेघ ओढून दोन व्यवहारातील स्पष्टपणे दर्शविला जातो.
८) खातेवही मध्ये ज्या पानावर संबंधित खाते उघडले जाते त्या खात्याचा पान क्रमांक त्वरित संदर्भासाठी लिहिला जातो.
रोजकीर्दीचे स्वरूप
रोजकीर्दीची आखणी[२] खालीलप्रमाणे असते
अ ब क आणि मंडळी यांची रोजकीर्द
दिनांक | तपशील | खाते पान क्र. | नावे रक्कम रुपये | जमा रक्कम रुपये |
---|---|---|---|---|
दिनांक | नावे करायच्या खात्याचे नाव ......जमा करावयाच्या खात्याचे नाव | पान क्र. पान क्र. | XX ००.०० | ००.०० XX |
२८ फेब्रु २०१८ | रोख खाते........नावे विक्री खात्याला (मालाच्या रोख विक्री बद्दल ) | २२ ३५ | ५५०० ००.०० | ००.०० ५५०० |
रोजकीर्दीची अचूकता
प्रत्येक व्यवहाराचे जमा आणि नावे परिणाम समान रकमेचे असल्याने जमा स्तंभाची एकूण रक्कम ही नावे स्तंभाच्या एकूण रकमेइतकिच यायला हवी. रोजकीर्दीच्या प्रत्येक पानाच्या शेवटी रकमेच्या रकान्याची बेरीज करून तपशीलात "बेरीज पुढे नेली ' असे लिहिण्यात येते. पुढील पानावर सर्वप्रथम तपशिलाच्या रकान्यात 'रक्कम पुढे आणली ' असे लिहून मागील पानावरील बेरीज लिहिली जाते.
संदर्भ
- ^ http://www.yourarticlelibrary.com/accounting/journal/rules-of-journalising-with-specimen/50007
- ^ "संग्रहित प्रत". 2018-02-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-02-28 रोजी पाहिले.