रॉबर्ट अँड्रुझ मिलिकन
रॉबर्ट अँड्रुझ मिलिकन | |
रॉबर्ट अँड्रुझ मिलिकन | |
पूर्ण नाव | रॉबर्ट अँड्रुझ मिलिकन |
कार्यक्षेत्र | भौतिकशास्त्र |
पुरस्कार | भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक |
रॉबर्ट अँड्रुझ मिलिकन हे शास्त्रज्ञ आहेत.
जीवन
(२२ मार्च १८६८–१९ डिसेंबर १९५३). अमेरिकन भौतिकीवज्ञ. इलेक्ट्रॉनाचा विद्युत् भार व ⇨ प्रकाशविद्युत् परिणाम यांविषयीच्या कार्याबद्दल त्यांना १९२३ सालच्या भौतिकीच्या नोबेल पारितोषिकाचा सन्मान मिळाला.
मिलिकन यांचा जन्म मॉरिअसन (इलिनॉय) येथे झाला. ओबर्लिन कॉलेजातून (ओहायओ) १८९१ मध्ये पदवीधर झाल्यावर दोन वर्षे त्यांनी प्राथमिक भौतिकीच्या अध्यापनाचे काम केले. १८९३ मध्ये मास्टर ही पदवी मिळविल्यावर कोलंबिया विद्यापीठात भौतिकीचे अधिछात्र म्हणून त्यांची नेमणूक झाली. १८९५ मध्ये त्यांनी प्रदीप्त पृष्ठभागांनी उत्सर्जित केलेल्या प्रकाशाच्या ध्रुवीकरणावर (एकाच प्रतलात कंपने होण्याच्या क्रियेवर) संशोधन करून पीएच्. डी. पदवी संपादन केली. त्यानंतर १८९५–९६ मध्ये वर्षभर त्यांनी जर्मनीत बर्लिन व गर्टिगेन येथे पदव्यूत्तर शिक्षण घेतले. १८९६ मध्ये शिकागो विद्यापीठातील भौतिकी प्रयोगशाळेत साहाय्यक म्हणून त्यांची नेमणूक झाली व पुढे त्या विद्यापीठातच १९१० मध्ये ते प्राध्यापक झाले. पहिल्या महायुद्धात ते अमेरिकेच्या राष्ट्रीय संशोधन मंडळाचे उपाध्यक्ष होते. त्यावेळी त्यांनी पाणबुडी प्रतिरोधक व वातावरणविज्ञानीय साधने विकसित करण्यात महत्त्वाची कामगिरी केली. १९२१ मध्ये पॅसाडीना येथील कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधील भौतिकीच्या नार्मन ब्रिज लॅबोरेटरीच्या संचालकपदावर, तसेच या संस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षपदावर त्यांची नेमणूक झाली. १९४६ मध्ये या दोन्ही पदांवरून ते निवृत्त झाले.
मिलिकन यांनी मुख्यत्वे विद्युत् प्रकाशकी व रेणवीय भौतिकी या विषयांत संशोधन केले. त्यांचे सर्वांत प्रसिद्ध कार्य म्हणजे त्यांनी १९१० मध्ये इलेक्ट्रॉनाचा विद्युत् भार अचूकपणे मोजण्यासाठी योजनेला अतिशय सुलभ असा तेलाच्या थेंबाचा प्रयोग हे होय. [⟶ इलेक्ट्रॉन]. सर्व इलेक्ट्रॉनांसाठी हा विद्युत् भार सारखाच असतो, असेही त्यांनी सिद्ध केले. त्यानंतर १९१२–१५ याकाळात त्यांनी आइन्स्टाइन यांचे अत्यंत महत्त्वाचे प्रकाशविद्युतीय समीकरण प्रायोगिक रीत्या पडताळून पाहिले आणि फ्लाँक यांच्या स्थिरांकाचे मूल्य प्रकाशविद्युतीय रीतीने प्रथमच निर्धारित केले. वायूंच्या ⇨ ब्राऊनीय गतीसंबंधी त्यांनी केलेल्या कार्यामुळे द्रव्याच्या आणवीय व गत्यात्मक सिद्धांतांना [⟶ द्रव्याचा गत्यात्मक सिद्धांत] असलेला शास्त्रीय जगातील विरोध संपुष्टात आला. वातावरणात शिरून पृथ्वीकडे येणाऱ्या कणाच्या गतीसंबंधीचा मिलिकन यांचा सिद्धांत व विद्युतीय घटनासंबंधीचे त्यांचे संशोधन यांतूनच पुढे ⇨ विश्वकिरणांसंबंधीच्या (बाह्य अवकाशातून पृथ्वीवर येणाऱ्या भेदक किरणांसंबंधीच्या) त्यांच्या महत्त्वाच्या कार्याला चालना मिळाली. स्तरावरणापासून (भूपृष्ठापासून सु. १५ किमी. उंचीपासून ते सु. ५५ किमी. पर्यंतच्या भागापासून) ते खोल हिमसरोवरांच्या तळापर्यंत निरनिराळ्या उंचीकरिता, तसेच वेगवेगळ्या अक्षांशांवर व रेखांशांवर त्यांनी विश्वकिरणांचे निरीक्षण केले. याकरिता त्यांनी प्रामुख्याने आयनीकरण कोठीचा [⟶ कण अभिज्ञातक] उपयोग केला. त्यांनी विश्वकिरणांच्या मापनासाठी योजलेल्या प्रयोगामुळे हे किरण पृथ्वीवर वा वातावरणाच्या खालच्या थरात उगम पावत नसून बाह्य अवकाशातून (विश्वातून) येतात, हे सिद्ध झाले. हे किरण विश्वाच्या पुनर्रचनेतील एक महत्त्वाची प्रेरणा असून त्यांच्या उत्पत्तीत परमेश्वराचा हात असावा व परमेश्वराचे कार्य अव्याहत चालू असल्याचा हा एक पुरावा आहे, असा त्यांचा दृष्टिकोन होता.
नोबेल पारितोषिकाखेरीज मिलिकन यांना नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे कॉमस्टॉक पारितोषिक, अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल एंजिनियर्सचे एडिसन पदक, लंडनच्या रॉयल सोसायटीचे ह्यूज पदक वगैरे बहुमान मिळाले. पंचवीस विद्यापीठांच्या सन्माननीय डॉक्टरेट पदव्या त्यांना मिळालेल्या होत्या आणि अनेक अमेरिकन व परदेशी वैज्ञानिक संस्थांचे ते सदस्य होते. ते अमेरिकन फिजिकल सोसायटीचे अध्यक्ष व अमेरिकन ॲसोसिएशन फॉर द ॲडव्हान्समेंट ऑफ सायन्सचे अध्यक्ष (१९२९) होते. राष्ट्रसंघाच्या बौद्धिक सहकार्य समितीत त्यांनी अमेरिकेचे सदस्य म्हणून काम केले (१९२२–३२). तसेच ब्रूसेल्स येथे १९२१ मध्ये भरलेल्या आंतरराष्ट्रीय भौतिकी परिषदेमध्ये (सॉल्व्हे काँग्रेसमध्ये) त्यांनी अमेरिकेचे प्रतिनिधित्व केले. दुसऱ्या महायुद्धात रॉकेटे व ⇨ झोत प्रचालन यासंबंधी त्यांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांना अमेरिकेच्या अध्यक्षांचे प्रशंसा पदक मिळाले.
मिलिकन यांनी अनेक शास्त्रीय नियतकालिकांतून लेखन केले. तसेच भौतिकीच्या विविध शाखांवर एच् जी. गेल, सी. आर.मान, जे. मिल्स वगैरे लेखकांबरोबर व स्वतंत्रपणेही पाठ्यापुस्तके लिहिली आणि भौतिकीच्या अध्यापनात सुलभता आणण्यात बहुमोल मदत केली. या त्यांच्या पाठ्यपुस्तकांच्या सुधारित आवृत्त्या कित्येक वर्षे वापरात होत्या. विश्वकिरणांवर त्यांनी केलेल्या कार्यावर आधारलेला त्यांचा इलेक्ट्रॉन्स (+ अँड -), प्रोटॉन्स, फोटॉन्स, न्यूट्रॉन्स, मेसोट्रॉन्स अँड कॉस्मिक रेज (१९४७; पूर्वीच्या त्यांच्या १९१७ मध्ये प्रसिद्ध झालेल्या द इलेक्ट्रॉन या ग्रंथाची तिसरी सुधारित आवृत्ती) हा ग्रंथ सुप्रसिद्ध आहे. विसाव्या शतकातील ते एक अग्रगण्य वैज्ञानिक होते आणि त्याचबरोबर वृत्तीने ते धार्मिक असल्याने विज्ञान व धर्म हे एकमेकांना पूरक असून त्यांचा समन्वय साधण्याची त्यांची उत्कट तळमळ त्यांच्या पुढील काही ग्रंथाद्वारे प्रत्ययास येते : सायन्स अँड लाइफ (१९२४); इव्होल्यूशन इन सायन्स अँड रिलिजन (१९२७); सायन्स अँड द न्यू सिव्हिलायझेशन (१९३०); टाइम, मॅटर अँड व्हॅल्यूज (१९३२). यांखेरीज त्यांचे आत्मचरित्र १९५० मध्ये प्रसिद्ध झाले. ते सान मारीनो (कॅलिफोर्निया) येथे मृत्यू पावले.