Jump to content

रेल्वे साहित्य संमेलन

घुमान संमेलनाच्या परतीच्या प्रवासादरम्यान रेल्वेतील असुविधा, उद्विग्नतेला वाट करून देण्यासाठी उपरोधिक भावनेतून साहित्यप्रेमींनी ५ ते ७ एप्रिल २०१५ या काळात धावत्या रेल्वेतील पहिले मराठी साहित्य संमेलन 'साजरे' केले. या संमेलनात घुमान संमेलनाने काय दिले याचे ऑडिट परखडपणे करण्यात आले.

तसेच, संमेलन झाल्यानंतर सर्वसामान्य साहित्यरसिक अखिल भारतीय साहित्य महामंडळ, संयोजक संस्था आणि राज्य सरकारकडून वाऱ्यावर कसे सोडले जातात, याचाही ऑंखो देखा हाल या ६० तासांहून अधिक काळ रखडलेल्या रेल्वे प्रवासातून आला.

साहित्य रसिकांसाठीच्या सोयींमधील निष्काळजीपणाच्या निषेधार्थ उद्विग्न आणि उपरोधिक भावनेतून घेण्यात आलेल्या या संमेलनाचे स्वागताध्यक्ष संजय मयेकर व तानाजी दिवेकर निमंत्रक होते. ज्येष्ठ साहित्यिक प्रा. हरी नरके संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते. तर ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांच्या हस्ते संमेलनाचे उदघाटन झाले. टाळ-मृदंग-अभंगाच्या गजरात काढण्यात आलेली ग्रंथदिंडी, ग्रंथप्रदर्शन, कवी संमेलन, परिसंवाद, अध्यक्षीय भाषण असे सर्वकाही या संमेलनात होते.

एरवी, साहित्य संमेलनातील परिसंवाद-चर्चा कंटाळवाणे होतात. या ठिकाणी कंटाळवाण्या प्रवासात पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र अशा पाच राज्यांमधील अभिव्यक्ती रुळांवर घेत घेत परिसंवाद रंगले. तेही. 'मराठीची गाडी रूळ सोडून धावत असताना या संमेलनामुळे मराठीला रुळावर आणण्याचा प्रयत्‍न झाला. बाकी साहित्य संमेलनांमध्ये केवळ ज्येष्ठांचा सहभाग असताना तरुणांची मोठी संख्या हे या संमेलनाचे वैशिष्ट्य होते. संमेलनांमध्ये तरुण वर्ग जोडला गेल्यास मराठी भाषेला मरण नाही. घुमान संमेलनात इतिहासाचा धांडोळा घेतला गेला. मात्र, वर्तमानाचा टप्पा या रेल्वे संमेलनात दिसून आला,' असे प्रा. नरके यांनी सांगितले.

साहित्यविषयक चर्चेला फाटा

'घुमान साहित्य संमेलनाने मराठीला काय दिले? या विषयावर झालेल्या परिसंवादात पं. वसंतराव गाडगीळ, उमा कुलकर्णी, हेमंत जोगदेव आदी सहभागी झाले होते. साहित्य महामंडळ साहित्यिकांच्या ताब्यात आहे, की राजकारणी व्यक्तींच्या, असा प्रश्न पं. वसंतराव गाडगीळ यांनी उपस्थित केला. साहित्य महामंडळात साहित्यबाह्य व्यक्तींचा वावर वाढल्याने घुमान येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनात साहित्यविषयक चर्चा न झाल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. 'वेगवेगळ्या प्रांतात मराठी जागवायचे काम करणारे लोक अशा काही वेगळ्या गोष्टींचा अंतर्भाव संमेलनात करणे शक्य होते. त्यांना या व्यासपीठावर बोलावून त्यांच्या समस्या जाणून घेता आल्या असत्या. त्यांचे सुख-दुःख जाणून घेता आले असते, असे कुलकर्णी यांनी सांगितले.

'मराठीची ज्योत आज अनेक राज्यांतून या अनोख्या संमेलनाच्या माध्यमातून जाणे ही अभिमानाची गोष्ट आहे. जगभरात मराठी माणसाने आपल्या कर्तृत्त्वाने झेंडा फडकाविला आहे. पण महाराष्टात मात्र मराठीची हेळसांड होतांना दिसत आहे,' असे नायगावकर म्हणाले.

'मराठीच्या दारी कारे क्षणभरी,
लाज वाटे कारे माऊलीची,
दारावर पाटी मराठीच लावू,
भाजीपाला घेऊ मराठीत,
ज्ञानराज स्फुंदे समाधी आतून,
परभाषा मुळी गळा आली..' या नायगावकरांनी सादर केलेल्या कवितेला उत्स्फूर्त दाद मिळाली. ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे यांच्या मनोगताने या पहिल्या रेल्वे मराठी संमेलनाचा समारोप झाला.


पहा साहित्य संमेलने