रुद्राध्याय
हिंदू धर्मग्रंथावरील लेखमालेचा भाग | |
वेद | |
---|---|
ऋग्वेद · यजुर्वेद | |
सामवेद · अथर्ववेद | |
वेद-विभाग | |
संहिता · ब्राह्मणे | |
आरण्यके · उपनिषदे | |
उपनिषदे | |
ऐतरेय · बृहदारण्यक | |
ईश · तैत्तरिय · छांदोग्य | |
केन · मुंडक | |
मांडुक्य ·प्रश्न | |
श्वेतश्वतर ·नारायण | |
कठ | |
वेदांग | |
शिक्षा · छंद | |
व्याकरण · निरुक्त | |
ज्योतिष · कल्प | |
महाकाव्य | |
रामायण · महाभारत | |
इतर ग्रंथ | |
स्मृती · पुराणे | |
भगवद्गीता · ज्ञानेश्वरी · गीताई | |
पंचतंत्र · तंत्र | |
स्तोत्रे ·सूक्ते | |
मनाचे श्लोक · रामचरितमानस | |
शिक्षापत्री · वचनामृत |
कृष्ण यजुर्वेदाच्या तैत्तिरीय संहितेच्या ४थ्या कांडात हा मंत्रसमूह आलेला आहे. याला श्री रुद्रम, रुद्र किंवा शतरुद्रीय असेही म्हणतात. रुद्राचे नमक विभाग व चमक विभाग असे दोन भाग असून, प्रत्येकात ११ अनुवाक आहेत. पहिल्या विभागात नमः शब्द वारंवार येत असल्यामुळे त्याला नमक असे म्हणतात व दुसऱ्यात च मे हे शब्द वारंवार येत असल्यामुळे त्याला चमक असे म्हणतात.
शांतिमंत्र
रुद्राध्यायाला पुढील शांतिमंत्राने प्रारंभ होतो -
- हरि: ॐ इडा देवहुर्मनुर्यज्ञनीर्बृहस्पतिरुक्थामदानि श(ॅं्)सिषद्विश्वेदेवा: सूक्तवाच: पृथिविमातर्मा मा हि(ॅं्)सीमर्धु मनिष्ये मधु जनिष्ये मधु वक्ष्यामि मधु वदिष्यामि मधुमतीं देवेभ्यो वाचऽमुद्यास(ॅं्) शुश्रूषेण्यां मनुष्येभ्यस्तं मा देवा अवन्तु शोभायै पितरोऽनुमदन्तु ।। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ।। (तैत्तिरीय संहिता ३.३.२)
अर्थ
इडा - ब्रह्मरूपिणी विद्या, देवहू - देवांना बोलावणारी, मनुर्यज्ञनी - यज्ञाला प्रवृत्त करणारी मंत्ररूप वाग्देवता, बृहस्पतिः - कर्मसाक्षी परमेश्वर. हा परमेश्वरच उक्थामदानि - कर्मजन्य सुखे प्राप्त करून देतो. हे शुभ वाणीच्या विश्वेदेवांनो, तुम्ही माझी हिंसा करू नकोस, याकडे लक्ष द्या. हे धरणीमाते, तू माझी हिंसा करू नकोस; (यासाठी) मी तुझ्या मधुर रूपाचे चिंतन करतो, तुझे मधुर स्तवन करतो. मी मधुर बोलेन, मी संबंधी लोकांशी मधुर व्यवहार करीन, देवांना उद्देशून मधुर बोलेन. मी मनुष्यांशी त्यांना श्रवणसुख होईल असे बोलेम. असे माझे देव रक्षण करोत. (आणि) माझी कीर्ती वाढावी म्हणून माझे पूर्वज माझ्या कामांवर संतुष्ट होवोत.
रुद्राध्यायाला ही शांती म्हणावी असे वेदांत सांगितलेले नाही. परंतु रुद्रानुष्ठान सांगणाऱ्या नंतरच्या ग्रंथांत या शांतिमंत्राचा उल्लेख केलेला आहे. हा रुद्राध्याय कृष्णयजुर्वेदाच्या इतर संहितांमध्येही पठित आहे. त्याचप्रमाणे शुक्ल यजुर्वेदातही हा अध्याय आढळतो.
रुद्रानुवाक
रुद्राचे नमक विभाग व चमक विभाग असे दोन भाग असून, प्रत्येकात ११ अनुवाक आहेत. पहिल्या विभागात नमः शब्द वारंवार येत असल्यामुळे त्याला नमक असे म्हणतात व दुसऱ्यात च मे हे शब्द वारंवार येत असल्यामुळे त्याला चमक असे म्हणतात. [१]
नमकम्
- रुद्राचा पहिला अनुवाक ‘नमस्ते रुद्र....’ या मंत्राने सुरू होतो. या अनुवाकात १५ मंत्र आहेत. यात रुद्राच्या क्रोधाला नमस्कार असून, रुद्राने आपल्या कल्याणप्रद तनूने अज्ञान दूर करावे, अशी प्रार्थना आहे. ‘तुझ्यासाठी आम्ही चांगल्या शब्दांनी तुझी प्रार्थना करतो’ असे तिथे म्हणले आहे. यात रुद्राला नीलग्रीव, सहस्राक्ष, इ. नावांनी आळवले आहे. तसेच त्याच्या शस्त्रांचेही वर्णन केले आहे.
- दुसरा अनुवाक नमकाने सुरू होतो. यापुढच्या अनुवाकात रुद्राला विविध नावांनी नमन केलेले आहे. यातले ‘नमः’ शब्द दोन प्रकारचे आहेत. काही अनुवाकांत ‘नमः’ शब्द मंत्राच्या आरंभी व अंती असा दोन्ही वेळा येतो. काही ठिकाणी तो मंत्राच्या आरंभीच येतो. दुसऱ्या अनुवाकात सूत, स्थपती, मंत्री वणिज, इ. स्वरूपात रुद्राचे नमन आहे.
- तिसऱ्या अनुवाकात तस्करांचा (चोर) पती, आरण्याचा पती, रात्रिचरांचा पती, इ. स्वरूपात रुद्राला प्रणाम केले आहे.
- चौथ्या अनुवाकात वैद्य, व्रात, गण, विरूप, महान, शुल्लक, रथकार, कुलाल, निषाद, पारधी, इ. गणांचा पती व कारुनारुंचा पती या स्वरूपात रुद्राचे नमन आहे.
- पाचव्या अनुवाकाच रुद्राची भव, शर्व, रुद्र, पशुपती, इ. नावे सांगितली आहेत.
- सहाव्या अनुवाकात ज्येष्ठ, कनिष्ठ, श्रेष्ठ अशा रूपांत रुद्राचे वर्णन करून पुढे त्याचा रथ, कवच, शिरोवेष्टण, इ. गोष्टींचे उल्लेख केले आहेत.
- सातव्या अनुवाकात निसर्गात रुद्राची स्थाने कुठे कुठे आहेत. ते सांगितले आहे.
- आठव्या व नवव्या अनुवाकात रुद्राचे सोम, उग्र, ताम्र, भीम, शिव, इ. नावे उल्लेखिली आहेत.
- दहाव्या अनुवाकात रुद्राचे सर्वव्यापित्व सांगून स्वतःला, कुटुंबियांना, मुलांना व गुराढोरांना त्याने मारु नये, अशी त्याची प्रार्थना केली आहे. ती पुढीलप्रमाणे-
मा नस्तोके तनये मा न आयौ मानो गोषु मानो अश्वेषु रीरिषः । वीरान् मानो रुद्र भामितो वधीर्हविष्मन्तः सदमित् त्वा हवामहे ।।
- अकराव्या अध्यायात विविध ठिकाणी राहणाऱ्या रुद्रांचे वर्णन केले आहे.
चमकम्
चमकाच्या पहिल्या सहा अनुवाकांच मला अन्न मिळो, मला धान्ये मिळोत, मला सत्ता मिळो, मला वैभव मिळो, भूमी मिळो, पर्वत मिळोत, इंद्रादी देव अनुकूल होवोत, अशी याचना आहे. सात, आठ व नऊ या अनुवाकांत सगळे यज्ञप्रक्रियेतील शब्द आले आहेत आणि शेवटी माझी इंद्रिये, प्राण, मन किंबहुना सर्व जीवनच यज्ञमय होवो, अशी प्रार्थना केली आहे. ती पुढीलप्रमाणे -
आयुर्यज्ञेन कल्पतां प्राणो यज्ञेन कल्पतामपानो यज्ञेन कल्पतां व्यानो यज्ञेन कल्पतां चक्षुर्यज्ञेन कल्पता श्रोत्रं यज्ञेन कल्पतां मनो यज्ञेन कल्पतां वाग्यज्ञेन कल्पतामात्मा यज्ञेन कल्पतां यज्ञो यज्ञेन कल्पताम् ।
बाह्यदुवे
संदर्भ
संदर्भसूची
जोशी, पं. महादेवशास्त्री. भारतीय संस्कृति कोश - आठवा खंड - राजस्थान ते विहार. p. २७१-२७२. रुद्राध्याय