Jump to content

रीकास्टिंग विमेन:एस्सेज इन कलोनियल हिस्टरी

रिकास्टिंग विमेन:एस्सेज इन कलोनियल हिस्टरी हे १९८९ चे पुस्तक आहे. हे पुस्तक कुमकुम संगारी व सुदेश वैद यांनी संपादित केलेले असून काली फॉर विमेन इन इंडिया आणि Rutgers University press in the United States यांनी प्रकाशित केलेले आहे. या लेख संग्रहांच्या माध्यमातून राजकीय अर्थव्यवस्था,कायदा,धर्म आणि संस्कृती यांचा पितृसत्तेशी असणारा सहसंबंध तसेच, परिवर्तनवादी चळवळींचा वेगळा इतिहास आणि वर्ग व लिंगभाव यांचे नाते स्पष्ट होते. भारतातील स्त्रीवादी चळवळीचे एक महत्त्वपूर्ण योगदान म्हणून हे पुस्तक बघितले जाते. स्त्रीवादी दृष्टीकोनातून इतिहास पुर्नलेखनावर झालेल्या कुठल्याही चर्चेतून हे म्हणले गेले की, इतिहास लेखन ही अचूक आणि पारदर्शी प्रक्रिया नसते. इतिहास लेखन ही प्रस्थापित प्रक्रिया असून इतिहासकार त्यामध्ये मध्यस्थाची भूमिका बजावतात.

प्रस्तावना/ पुस्तकाची पार्शाभूमी

इतिहासाचे पुनर्लेखन करण्याबद्दल स्त्रीवादी परिप्रेक्ष्यातून झालेली मांडणी महत्त्वाची आहे कारण त्यातून इतिहास लेखन ही प्रक्रिया सहज होणारी किंवा पारदर्शी नसते हे मांडले गेले. इतिहास लेखन ही प्रस्थापित प्रक्रिया असून इतिहासकार त्यामध्ये माध्यस्थाची भूमिका बजावतात. इतिहासकारचे सामाजिक स्थान (जात, लिंगभव, वर्ग), त्याची/ तिची सैद्धांतिक भूमिका आणि समकालीन संदर्भ यामधून इतिहास किंवा ऐतिहासिक नक्की कशाला म्हणायचे आणि इतिहास म्हणून कशाचे लेखन करायचे हे निश्चित होत असते.

जॉन स्कॉट याच्या मते स्त्रियांच्या इतिहासाचा अभ्यास तीन पद्धतींने करता येऊ शकतो.

१. समावेशनाचा इतिहास :- या पद्धतीमध्ये इतिहासाला प्रश्न विचारले गेलेले नाहीत. या इतिहासामध्ये कर्तृत्त्ववान स्त्रियांचा समावेश झालेला दिसतो. सुरुवातीच्या स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये कर्तृत्त्ववान स्त्रियांचाच समावेश करत, स्त्री योद्ध्या व कवयित्री यांवर प्रकाश टाकत,स्त्रियांना अवकाश मिळाल्यास त्याही पुरूषांप्रमाणे कृती करू शकतात हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

२. योगदानाचा इतिहास :- या पद्धतीमध्ये अशी मांडणी करण्यात आली आहे कि,स्त्रिया या केवळ इतिहासामध्ये उपस्थित नव्हत्या तर इतिहास निर्माण करणाऱ्या होत्या जसे कि, क्रांतिकारी व राष्ट्रवादी चळवळीतील स्त्रियांचे योगदान.

३. दडपनुकीचा इतिहास - यामध्ये दडपनुकीतूनच आदर्श स्त्रीची प्रतिमा उभी केली जाते. स्त्रिया हा इतिहासातील विश्लेषणाचा स्वतंत्र कोटीक्रम म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या.

ठळक मुद्दे

स्त्रीवादी इतिहास लेखन हा निवडीचा मुद्दा नाही. रीकास्टिंग वुमेन हे सदर पुस्तक याचे उत्तम उदाहरण असून यामध्ये वसाहतकालीन भारताचा अभ्यास करण्यासाठी लिंगभाव ही संकल्पना विश्लेषणाच्या पातळीवर वापरली आहे. सामाजिक सुधारणांच्या आपल्या समजुती देखील त्यातून दूर होण्यास मदत होते. रिकास्ट म्हणजे तपास; वसाहतीक भारतातील सामाजिक सुधारणांबद्दल असणाऱ्यात समजुती पुन्हा तपासून बघण्यासाठी स्त्रीवादी इतिहासकारांनी तत्कालीन स्त्रीयांचे प्रश्न या मुद्द्यापासून सुरुवात केली. ज्यामधून एक वेगळ्याच प्रकारचा लिंगभाव इतिहास पुढे येण्यास सुरुवात झाली. जसे की या मांडणी मधून प्रकाशात आणले गेले की, तत्कालीन सामाजिक सुधारणावादी चळवळचे नेतृत्व हे मध्यमवर्गीय उच्च जातीयांचे तसेच लिंगाभाव संवेदनहिन होते. तसेच खाजगी व सार्वजनिक क्षेत्रांचे जे विभाजन केले गेले होते त्याला देखील प्रश्नांकीत केले गेले. यासाठीच स्त्रीवादी इतिहासकारांनी लिंगाभाव हा विश्लेषणाचा कोटीक्रम आणि वर्णन करण्याची संकल्पना यामध्ये फारकत केली आहे. यामुळेच इतिहासाचे विश्लेषण करताना स्त्रिया हा एक संपूर्णतः वेगळा कोटीक्रम असणे आवश्यक असल्याचे प्रस्थापित झाले.

पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये लेखकांनी स्पष्टपणे नमूद केले आहे की, वसाहतकालीन भारतातील पितृसत्तेची संरचना समजून घेण्यासाठी जी आवश्यकता निर्माण झाली त्यातून हे पुस्तक करण्याची गरज भासली. तसेच त्याची पुढील इतर दोन महत्त्वाची करणे आहेत.

१. हे पुस्तक येण्याआधी दोन दशकांपर्यंत जी समजूत होती की, वसाहतोत्तर भारतामध्ये स्त्रीयांची परिस्थिति सुधारेल त्याला तडा दिला गेला.

२. सुधारणा व विकास यांचे जे राष्ट्रवादी मॉडेल होते त्याच्या वैधतेला प्रश्नांकीत केले गेले.

बदलत्या काळानुसार झालेल्या सामाजिक बदलांचे राजकारण अभ्यासाने हा स्त्रीवादी विश्लेषणाचा महत्त्वाचा विषय ठरला. म्हणूनच स्त्रियांचा इतिहास आणि स्त्रीवादी इतिहास यातील फरक लेखकांनी स्पष्टपणे मांडला आहे. ज्यामधून पुढे जाऊन त्यांनासुद्धा हे लक्षात आले की, प्रत्येक सामाजिक वास्तव ही लिंगाभाव आधारित विषमतेने युक्त आहे.

वर्ग संरचना आणि वर्चस्ववादी विचारसारणी मजबूत करण्यासाठी लिंगभाव हा कळीचा मुद्दा ठरतो आणि त्यामधूनच विविध पित्तृसत्तांमध्ये असणारा फरक आणि त्याचा वर्गाशी असणारा संबंध हे या पुस्तकातून मांडले आहे. सामाजिक पुनर्रचनेची प्रक्रिया व विविध पितृसत्ता पुनर्स्थापित करण्याची प्रक्रिया या दोन्ही समांतर होत्या. वसाहतकालीन भारतामध्ये जमीन पुनरवाटप धोरण राबविले गेले ज्यामुळे जमीनदार हे अधिक ताकदवान बनले तर शेतमजुर हे अजून दारिद्रयात लोटले गेले. या दोन्ही वर्गातील स्त्रियांना त्याचे परिणाम भोगावे लागले; ज्यामुळे त्यांचा पुढील काळात झालेल्या शेतकरी चळवळींमध्ये सहभाग दिसून येतो. पुरूषांचे जमीनीवरील मालकी हक्क व उत्पादनाच्या स्त्रोतांवर नियंत्रण हे कायम राहीले. यामध्यमातूनच वसाहतकालीन कायद्यांमधून विवाह, परंपरा आणि दत्तक प्रथा यासंदर्भातील पितृसत्ताक चालीरितींना वैधता बहाल केली गेली.

लेखक अधोरेखित करतात की, तत्कालीन मध्यम वर्गीय स्त्रियांसाठी केल्या गेलेल्या सुधारणा या प्रत्यक्षात सांस्कृतिक राष्ट्रवाद आणि त्यासोबत जोडलेली वर्ग-जातीची अस्मिता यांच्यासाठी होत्या. खाजगी व सार्वजनिक जग कशाला म्हणायचे याची देखील पुनर्व्याख्या केली गेली. राष्ट्रवाद्यांसाठी पाश्चिमात्य भौतिकता याविरुद्ध एतद्देशीय खाजगी जग हे पर्यायी होते. या पुस्तकाचे अजून एक महत्त्वाचे योगदान म्हणजे आदर्श स्त्रीची प्रतिमा ही पुन्हा रचली गेली जी प्रामुख्याने उच्च जातीय स्त्री केंद्री व साहजिकच कनिष्ठ जातीय स्त्रियांच्या विरोधी होती. त्यामुळे या दोन्ही समूहातील स्त्रियांसाठी सार्वजनिक जग म्हणजे नक्की कोणते, त्याची उपलब्धता हे पुन्हा ठरविले गेले. लेखक पुन्हा नमूद करतात की, परंपरा आणि आधुनिकता या दोन्ही पितृसत्ताक विचारधारेने युक्त असतात. त्यामुळे त्यांना एकमेकांच्या विरोधातील द्वैत म्हणून बघण्यापेक्षा त्यातील गुंतागुंत ही विश्लेषण करण्यात महत्त्वाची समजणे आवश्यक आहे.

पुस्तकातील पहिला लेख उमा चक्रवर्ती यांचा असून त्यांनी राष्ट्रवाद्यंच्या वसाहतकालीन इतिहासामध्ये आलेल्या प्राचीन भारतामध्ये स्त्रीयांचे स्थान हे गौरवस्पद होते या मिथकाला छेद दिला आहे. त्या नमूद करतात की, हे मिथक जारी मान्य केले तरी ते फक्त आर्य स्त्रियांसाठी सत्य होते;ना की वैदिक दासींसाठी. १९ व्या शतकातील राष्ट्रवाद्यंसाठी हिंदू उच्च जातीय स्त्रिया या ‘आदर्श स्त्री’ कोटिक्रमात बसणाऱ्यात होत्या.

वसाहत काळात याप्रकरच्या ज्या पुनरचना केल्या गेल्या त्यावर तत्कालीन राष्ट्रवादाचा प्रभाव होता जसे की, राष्ट्राची व्याख्या, सत्ता इ. स्वातंत्र्यपूर्व भारतीय राष्ट्रवादामध्ये स्त्रियांचं राजकीय सहभाग हा महत्त्वाचा मानला गेला. १९ व्या शतकाच्या शेवटी सांस्कृतिक राष्ट्रवादावर अधिक भर दिला गेला. समाजात सांस्कृतिक वर्चस्व असणारे समूह व त्याआधारे त्यांची स्वतःची सत्ता कायम करणे यातून राष्ट्राची संकल्पना ठरवली जाऊ लागली. या काळामध्ये सांस्कृतिक वर्चस्व हे अधिक महत्त्वाचे ठरल्याने सामाजिक सुधारणांना विरोध केला जाऊ लागला. जसे की, त्या पूर्वीच्या शतकामध्ये सामाजिक सुधारणांच्या केंद्रस्थानी स्त्रीयांचे प्रश्न होते. जणू काही त्यापूर्वी स्त्रीयांचे प्रश्न हे अस्तित्वातच नव्हते. याला पार्थ च्याटर्जी यांनी त्यांच्या लेखामध्ये स्त्रियांच्या प्रश्नांवरील राष्ट्रवादी उपाय असे म्हणाले आहे.

पुस्तकाच्या लेखकांनी प्रस्तावनेमध्ये स्वतहून नमूद केले आहे त्याप्रमाणे; ही पुस्तक सर्वांचे प्रतिनिधित्व करत नाही ही त्याची कमतरता आहे. त्यातील लेख हे प्रामुख्याने हिंदू वर्चस्ववादी विभिन्न समुहाशी संबंधित असून मुख्यत्वाने उत्तर भारतातील व मध्यम वर्गीयांचे आहेत. या पुस्तकाच्या मर्यादा असल्या तरी देखील स्त्रीयांचे सामाजिक स्थान, त्याचे भौतिक संदर्भ, अभ्यास क्षेत्रातील व्यस्त/विरोधी प्रतिनिधित्व यासंदर्भात स्त्रीयांचे बदलत जाणारे स्थान याची महत्त्वपूर्ण मांडणी केली आहे. पितृसत्तेची नव्याने पुनर्स्थापना कशी केली जाते हे अभ्यासण्यासाठी हे पुस्तक पुस्तक उपयुक्त आहे.

योगदान

David Kopf यांनी The Journal of Interdisciplinary HistoryDavid Kopf या जर्नल मध्ये या पुस्तकाची चिकित्सा केलेली आहे. Recasting women या पुस्तकाने १९ व्या शतकातील बंगालमधील पुनरुत्थानाच्या इतिहास लेखनाचे नवे पद्धतीशास्त्र मांडले आहे. तसेच, सती बंदी, बाल विवाह बंदी, बहुपत्नीत्व बंदी,विधवा पुर्नविवाहास उत्तेजन, स्त्री शिक्षण यांसारखे कायदे ब्रिटिशांनी केलेय़ा कायद्यांची चिकित्सा जहाल स्त्रीवादी कश्या पद्धतीने करतात हे या पुस्तकातून पुढे येते.

महत्त्वाच्या संकल्पना

राजकीय अर्थव्यवस्था

पितृसत्ता

लिंगभाव

स्त्रीवादी इतिहास

संदर्भ सूची

Sangari Kumkum; Sudesh Vaid, eds. (1989), Recasting Women: Essays in Colonial History, Kali for Women, ISBN 9788189013790


Kopf, David (1992). "Reviewed Work: Recasting Women: Essays in Indian Colonial History" (PDF). The Journal of Interdisciplinary History (MIT Press) 22: 563–565

हे सुद्धा पहा

पितृसत्ता

लिंगभाव

उमा चक्रवर्ती