Jump to content

रिचर्ड निक्सन

रिचर्ड निक्सन

रिचर्ड निक्सन (इंग्लिश: Richard Milhous Nixon) (९ जानेवारी, इ.स. १९१३ - २२ एप्रिल, इ.स. १९९४) हा अमेरिकेचा ३७वा राष्ट्राध्यक्ष होता. याने २० जानेवारी, इ.स. १९६९ ते ९ ऑगस्ट, इ.स. १९७४ या कालखंडादरम्यान राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे सांभाळली. अध्यक्षीय कारकिर्दीअगोदर हा इ.स. १९५३ ते इ.स. १९६१ या कालखंडात ड्वाइट डी. आयझेनहॉवर याच्या अध्यक्षीय राजवटीत अमेरिकेचा ३६वा उपराष्ट्राध्यक्ष होता, तर तत्पूर्वी अमेरिकन संसदेत कॅलिफोर्नियाचा प्रतिनिधी (इ.स. १९४७ ते इ.स. १९५०) व सेनेटसदस्य (इ.स. १९५० ते इ.स. १९५३) होता. वॉटरगेट प्रकरणात याच्याविरोधात महाभियोग चालवला जाण्याची चिन्हे दिसल्यावर याने ९ ऑगस्ट, इ.स. १९७४ रोजी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. पदाचा राजीनामा देणारा हा अमेरिकी इतिहासातला एकमेव राष्ट्राध्यक्ष आहे.

कायद्याचा पदवीधर असलेल्या निक्सनाने आरंभी काही काळ वकिली केली. पुढे तो अमेरिकी नौदलात रुजू झाला व दुसऱ्या महायुद्धात प्रशांत महासागराच्या आघाडीवर लढला.

आपल्या पहिल्या अध्यक्षीय राजवटीत निक्सनाने व्हियेतनाम युद्धास वाढणारा वाढता देशांतर्गत विरोध लक्षात घेऊन व्हियेतनामातून अमेरिकन सैन्य माघारी बोलावण्याचा निर्णय घेतला, इ.स. १९७२ साली चीनच्या जनता-प्रजासत्ताकास अधिकॄत भेट देऊन अमेरिका-चीन राजनैतिक संबंध पुन्हा स्थापण्यात पुढाकार घेतला, तसेच त्याच वर्षी सोव्हिएत संघाशी क्षेपणास्त्रविरोधी क्षेपणास्त्रांवर मर्यादा घालून घेण्याचा तह केला. चंद्रावर मानव पाठवण्याच्या अमेरिकी प्रयत्नांना अपोलो ११च्या रूपाने निक्सन प्रशासनाच्या कार्यकाळातच यश लाभले; तरीही एकंदरीत दॄष्टिकोनातून पाहता निक्सन प्रशासनाने समानव अंतराळ मोहिमा सीमित करण्याचेच धोरण अनुसरले. इ.स. १९७२ सालातल्या अध्यक्षीय निवडणुकींत निक्सन मोठ्या मताधिक्याने अध्यक्षपदाच्या दुसऱ्या मुदतीसाठी निवडून आला.

दुसऱ्या मुदतीत मात्र निक्सन प्रशासनास अडचणींना सामोरे जावे लागले : योम किप्पुर युद्धात इस्राएलास अमेरिकेने पाठिंबा दिल्यामुळे अरब राष्ट्रांनी अमेरिकेशी तेलव्यापार बंद केला. याच सुमारास वॉशिंग्टन डी.सी.तील अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयात झालेल्या घुसखोरीतूनु उद्भवलेले प्रकरण मोठ्या थरापर्यंत वाढून वॉटरगेट प्रकरण उघडकीस आले. निक्सन प्रशासनाने हे प्रकरण दडपण्याचे प्रयत्न करूनही प्रकरण हाताबाहेर गेले व त्यामुळे निक्सन प्रशासनाने राजकीय आधार मोठ्या प्रमाणात गमावला. महाभियोग चालवला जाऊन अध्यक्षपदावरून हकालपट्टी होण्याची दाट शक्यता असल्यामुळे १८ एप्रिल, इ.स. १९७४ रोजी निक्सनाने अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर अध्यपदावर आलेल्या जेराल्ड फोर्ड याने मात्र निक्सनास उद्देशून वादग्रस्त ठरलेला माफीनामा जाहीर केला. निवॄत्तीनंतर निक्सनाने आपल्या राजकीय अनुभवांवरून पुस्तके लिहिली व परदेश दौरे केले. त्यामुळे आधीची डागाळलेली प्रतिमा धुऊन "अनुभवी, ज्येष्ठ मुत्सद्दी" म्हणून प्रतिमा सुधारण्यात त्याला यश आले. १८ एप्रिल, इ.स. १९९४ रोजी पक्षाघाताचा घटका येऊन त्याचा मॄत्यू झाला.

बाह्य दुवे

  • "व्हाइट हाउस संकेतस्थळावरील अधिकृत परिचय" (इंग्लिश भाषेत). 2015-01-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-10-01 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  • वरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती फेब्रुवारी ६, २०१० (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)
  • "रिचर्ड निक्सन: अ रिसोर्स गाइड (रिचर्ड निक्सन: संसाधनांची मार्गदर्शिका)" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)