Jump to content

रामराव जगन्नाथराव गुंजकर कुलकर्णी

हैदराबाद मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक. जुलमी निजाम सरकारच्या विरोधातील विविध सत्याग्रहांमध्ये सक्रिय सहभाग.

जन्म आणि शिक्षण

सध्याच्या जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात गुंज येथे जन्म.

रामराव गुंजकर कुलकर्णी यांचे शिक्षण औरंगाबाद येथील सरकारी शाळेत दहावीपर्यंत झाले होते. विद्यार्थी दशेत असताना सत्याग्रही म्हणून त्यांनी गुप्त नोंदणी केली.

हैदराबाद मुक्ती संग्रामातील प्रत्यक्ष सहभाग

१९३७ मध्ये महाराष्ट्र  परिषदेचे पहिले अधिवेशन परतुर येथे झाले, या परिषदेतील देशभक्तीपर प्रेरणादायी जहाल वक्तृत्वाने प्रेरित होऊन रामराव गुंजकर कुलकर्णी मुक्ती लढ्यात सहभागी झाले. महाराष्ट्र परिषदेच्या कार्यकर्ता म्हणून त्यांनी कार्य करण्यास सुरुवात केली. १९३८ मध्ये त्यांनी जालना येथे झालेल्या सत्याग्रहात खादीचा खेड्यापाड्यातून प्रचार केला. १९४२ मधील भारत छोडो आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता.

१९४४ साली तीर्थपुरी येथील गोदामातील धान्य अडवून त्यांनी निजाम सरकारला विरोध केला. केळीगव्हाण येथे तहसील कचेरीवर शेतकऱ्यांना संघटित करून मोर्चा नेत असताना त्यांना अटक करण्यात आली. लेव्ही वसुलीच्या आणि पोलिसांच्या दडपशाहीच्या विरोधात हा मोर्चा होता.

जंगल सत्याग्रहातील सहभाग

जंगल सत्याग्रह हा हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा एक महत्त्वाचा लढा होता. सध्याच्या घनसावंगी तालुक्यातील मूर्ती, सिंदखेड, तीर्थपुरी या ठिकाणी रामराव जगन्नाथराव गुंजकर कुलकर्णी यांनी जंगल सत्याग्रह केला व शिंदीचे एकही झाड शिल्लक ठेवले नाही.

देऊळगाव कॅम्पचे कार्यकर्ते

मुक्ती संग्रामाच्या शेवटच्या टप्प्यात उभारण्यात आलेल्या देऊळगाव राजा येथील कॅम्पचे ते सक्रिय सदस्य होते. पटवाऱ्याचे दप्तर जाळणे, रेल्वे मार्गावरच्या तारा तोडणे, करोडगिरी नाके उध्वस्त करणे ही कामे त्यांनी केली. याच वेळी त्यांनी जालनाच्या सेंट्रल बँकेवर हल्ला चढवला.

अटक व तुरुंगवास

मनमाड कॅम्पच्या बैठकीला जाण्यासाठी वेषांतर करून बैलाच्या टांग्यातून जात असताना गेवराई तालुक्यातील चकलंबा स्टेशनजवळ सुकळी टाकळीच्या पांदणीमध्ये दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्यांना व सहका-यांना पकडले. पुढे त्यांना गेवराई कोर्टासमोर चौकशीसाठी हजर करण्यात आले. पोलिसांनी त्यांचा अतोनात छळ केला पण त्यांनी आपल्याकडे असलेल्या शस्त्रास्त्रांची व कार्याची माहिती पोलिसांना दिली नाही.‌ विशेष न्यायालयापुढे खटला होऊन त्यांना पाच वर्षाची शिक्षा झाली. काही दिवस बीडच्या मध्यवर्ती कारागृहात आणि नंतर औरंगाबादच्या कारागृहात त्यांना ठेवण्यात आले.

सन्मान व पुरस्कार

पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या हस्ते हैदराबाद मुक्तिसंग्रामातील कार्यासाठी रामराव गुंजकर यांना ताम्रपत्र बहाल करण्यात आले.

संदर्भ

हैदराबाद मुक्ती संग्रामातील पूर्णवेळ कार्यकर्ते चरित्र व कार्य भाग एक

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्था औरंगाबाद