Jump to content

रामदासी मठ, अकोला

अकोला येथील रामदासी मठ
चरणपादुका

आजही अकोल्यासारख्या शहरात समर्थ संप्रदायाची व त्या संप्रदायातील एक वेगळी परंपरा शहराच्या मध्यवस्तीतील माळीपुरा भागात श्रीबाबाजी मठाच्या रूपाने आढळते. अकोला दर्शनिक (गॅझेटियर) मध्ये या मठाचा इतिहास तीन शतकांपासून असल्याचं आढळते.

रामदासी परंपरा

या समर्थ संप्रदायी परंपरेचा प्रारंभ एकोबांपासून असल्याची माहिती मिळते. त्यांचे शिष्य तुकोबा. एकोबा आणि तुकोबा या नामसादृश्यामुळे हे संत वारकरी संप्रदायाचे तर नसावेत असे वाटण्याची शक्यता असली तरी वस्तुस्थिती मात्र तशी नाही. यातील एकोबा हे संत एकनाथ नसून एकोबा रामदासी होते व तुकोबा हे संत तुकाराम नसून एकोबाचे शिष्य तुकोबा रामदासी होते. त्यांचा काळ शके १६२५ (इ.स. १७०३) म्हणजे अठराव्या शतकाचा पूर्वार्ध मानतात. बाबाजी रामदासी हे त्यांचे शिष्य.

एकोबा आणि त्यांचे शिष्य तुकोबा रामदासी हे ब्रम्हचारी होते, त्यामुळं त्यांच्यानंतरची त्यांच्या वंशाची परंपरा नाही. त्यांचे वडील मुसलमानी राजवटीतील उदगीरचे अधिकारी होते तथापि त्यांच्याविषयी काही चुकीच्या गैरसमजामुळे त्यांचे आईवडील व अन्य कुटुंबीय मारले गेले व तुकोबा अकोल्याला आले. त्यांच्या संतत्त्वाची प्रचिती आल्याने तेथील गुलजारखान याने त्यांना सरोपा(शिरपाव) देऊन त्यांचा सन्मान केला व मठास अभय दिले. त्यामुळे हिंदू-मुसलमान समाजात एकोपा प्रस्थापित झाला.

तुकोबा रामदासी यांचे कार्य

तुकोबा रामदासी यांनी आत्मसिंधूनामक ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ तत्त्वविवरणपर आहे. त्याचे स्वरूप गुरू-शिष्य संवादात्मक असून ब्रम्ह सत्य, जगन्मिथ्या या शांकरमताचे अनुकरण व विवरण-विवेचन त्यात केल्याचं आढळते. समर्थांच्या आत्मारामाचा तुकोबा रामदासींच्या आत्मसिंधूवर जो प्रभाव आहे तो दोन्ही ग्रंथातील नामसादृश्यामुळे देखील जाणवतो.

ब्रम्ही सृष्टी जालीच नाही।
तेथ ज्ञान, अज्ञान, विज्ञान कायी ?
ब्रम्ह ठायीच्या ठायी ।
जैसे तैसे ।। (आत्मसिंधू प्र.४)

एवढ्या एकच मध्यवर्ती ओवीवरूनही आत्मसिंधूच्या आशयाची सहज कल्पना येईल.

आत्मसिंधू बरोबरच त्यांनी काही मराठी व दख्खनी पदरचनाही केली. समर्थांच्या हिंदी दख्खनी पदांविषयी त्यांच्या विषयीच्या एका ग्रंथात विवेचन केलेले आहे. त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य असे की त्यांनी विविध धर्मात एकात्मता मानली व तिचा पुरस्कारही केला. सौ.शांताबाई परसोडकरांनी बाबाजी महाराज चरित्रात त्यांचे पुढील दक्खिनी पद बाराव्या अध्यायात उद्धृत केले आहे.

खुन की खून पहिचान बा रे ।
मझ्जुद (मौजूद) भरा उसे हात नही उसे पॉव नही ।
उसे शीर नही। हुशियार रहो ।
वहॉं जात नही, वहॉ पात नही ।
वहॉं दिन नही, वहॉ रात नही ।
दास तुका के कान लगे ।
एको गोविंदने बात कही ।