राजा बढे
राजा नीळकंठ बढे (१ फेब्रुवारी, १९१२:नागपूर, महाराष्ट्र - ७ एप्रिल, १९७७:दिल्ली) हे एक मराठी कवी होते.
त्यांचे प्राथमिक शालेय शिक्षण मध्य प्रदेशात छिंदवाड्याला झाले, तर माध्यमिक शिक्षण नागपूरच्या टिळक विद्यालयात. राजा बढे १९३० साली पंजाब विद्यापीठातून मॅट्रिक झाले. पुढची पाच वर्षे अशीतशीच घालवून ते १९३५ साली त्यांनी पुण्याच्या दैनिक सकाळमध्ये उमेदवारी केली. एका वर्षानंतर ते नागपूरला परतले. नागपूरच्या दैनिक महाराष्ट्रमध्ये ते वर्षभर सहसंपादक होते. त्याचवेळी राजा बढे हे नागपूरच्या 'बागेश्वरी' मासिकाच्या संपादक मंडळात होते. तिथून निघून बढे यांनी साप्ताहिक 'सावधान'मध्ये मावकर-भावे यांच्याबरोबर काम केले. दरम्यानच्या काळात ते नागपूरच्या एका काॅलेजात दाखल झाले. १९३९ साली बी.ए.च्या वर्गात असताना राजा बढे यांनी काॅलेज सोडून दिले; ते पदवीधर झाले नाहीत. मात्र काॅलेजमध्ये असताना त्यांनी 'कोंडिबा' या टोपणनावाने बरेचसे स्फुटलेखन केले.
राजाभाऊ बढे हे चित्रपटात काम करायचे या विचाराने ते १९४० साली पार्श्वनाथ आळतेकर यांच्या आधाराने मुंबईत आले. त्यांचे शिष्यत्व पत्करून बढे यांनी आळतेकरांच्या 'सिरको फिल्म्स'मध्ये दोन वर्षे उमेदवारी केली. 'व्हाॅईस कल्चर'चे धडे त्यांनी आळतेकरांकडून घेतले.
त्यांना सुरुवातीला नागपूरमध्ये कवी म्हणून प्रसिद्धी मिळाली. नंतर ते मुंबईत आले. सन १९५६ ते १९६२ या काळात ते मुंबई आकाशवाणीवर सुगम संगीत विभागाचे निर्माते होते.
त्यांनी शिवाजी राजावर एक चित्रपट निर्माण केला.
राजा बढे यांची अनेक गाणी रेकाॅर्ड झाली होती. अश्यावेळी. जेव्हा 'प्रकाश पिक्चर्स' सावरकरांकडे 'राम-राज्य' चित्रपटासाठी गाणी लिहिण्याची मागणी करायला गेले, तेव्हा सावरकरांनी बढेंचे नाव सुचविले.
दिल्लीला असताना राजा बढे यांचा अकाली मृत्यू झाला. ते अविवाहित होते. त्यांचे त्यांच्या बकुल नावाच्या मोठ्या भावावर अतोनात प्रेम होते. तो वारल्यावर राजा बढे यांनी 'धाडिला राम तिने का वनी' या नाटकातले 'घाई नको बाई अशी, आले रे बकुळफुला' हे गीत रचले.
मुंबईतील 'कवी राजा बढे चौक' त्यांच्या नावावर आहे. नागपूरच्या महाल पेठेतील सी.पी.ॲन्ड बेरार महाविद्यालयासमोरील चौकासही राजा बढे यांचे नाव दिले आहे (९ एप्रिल २०१५).
महाराष्ट्राचा प्राचीन राजा हाल सातवाहन ह्याच्या काव्यांचे संकलन असलेल्या 'गाथा सप्तशती'चा मराठी अनुवाद हा राजा बढे यांच्या लेखनाची अत्युच्च कार्यसिद्धी समजली जाते.
लिहिलेली काही गाणी
- चांदणे शिंपीत जाशी, संगीतकार - हृदयनाथ मंगेशकर
- जय जय महाराष्ट्र् माझा, गायक - शाहीर साबळे
- घाई नको बाई अशी, आले रे बकुळफुला (नाट्यगीत, नाटक - धाडिला राम तिने का वनी, गायिका - आशा खाडिलकर, संगीतकार - जितेंद्र अभिषेकी, राग - मिश्र पहाडी)
- माझिया माहेरा जा
- सुजन हो परिसा राम-कथा, 'राम राज्य' (१९४३) ह्या चित्रपटातील गीत
- हंसतेस अशी का मनीं, गायिका - लता मंगेशकर
पुस्तके
- अशी गंमत आहे
- मंदिका
- मखमल
- माझिया माहेरा जा
- योजनगंधा
- रसलीना (महाकवी बिहारी यांच्या सतसईचा मराठी अनुवाद)
- लावण्य-लळित (काश्मिरी महाकवी बिल्हण विरचित 'चौर पंचाशिका' या काव्याचा काव्यानुवाद)
- वर्खाचा विडा
- शेफालिका (हाल सातवाहनची गाथासप्तशती, सहलेखक - अरविंद मंगरूळकर). याच नावाचा वसंत कुंभोजकर यांचा एक कथासंग्रह आहे.
- शृंगार श्रीरंग (जयदेव कवी विरचित 'गीत गोविन्दम्' या काव्याचा भावानुवाद
राजा बढे यांच्यावरील पुस्तके
- कविश्रेष्ठ राजा बढे : व्यक्ती आणि वाङ्मय (गंगाधर महाम्बरे
- राजा बढे : एक राजा माणूस (रवींद्र पिंगे, राम शेवाळकर, पु.भा. भावे आदी अनेक लेखकांच्या लेखांचे संकलन, संपादक - बबन बढे)
(अपूर्ण)