Jump to content

राघवेंद्र स्वामी

श्री राघवेंद्र स्वामी (इ.स. १५९५-१६७१) हे हिंदू धर्मातील मध्व संप्रदायातील एक संत आणि तत्त्वज्ञानी होत. ते इ.स. १६२४ ते १६३६ या कालावधीमध्ये तमिळनाडूतील कुंभकोणम् येथील श्री मठाचे मुख्याधीश होते. द्वैत तत्त्वज्ञानातील ‘न्याय सुधा’ ह्या श्रीमध्वाचार्य लिखित ग्रंथावर त्यांनी ‘सुधा परिमल’ हा टीकात्मक संवाद लिहिला. आंध्र प्रदेशातील मंत्रालयम् येथील त्यांची समाधी भाविकांसाठी एक तीर्थक्षेत्र आहे. राघवेंद्रस्वामींच्या कीर्तीने भारावलेल्या भाविकांची आजही त्यांच्या समाधीकडे गर्दी असते.

श्री राघवेंद्र तीर्थरू यांचे जन्मनांव वेंकटनाथ असून, त्यांचा जन्म सध्याच्या तमिळनाडू राज्यातील भुवनगिरी गावात एका कानडी भाषिक देशस्थ मध्व ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांच्या जन्मवर्षाविषयी पुरेसा आधार नसल्याने तो इ.स. १५९५ ते १६०१ दरम्यान झाला असावा असे अनुमान आहे. त्यांना प्राथमिक शिक्षण, त्यांचे मेहुणे लक्ष्मीनरसिंहाचार्य ह्यांनी दिले. पुढे ज्ञानार्जनासाठी त्यांना कुंभकोणम् येथे पाठवले गेले. त्याच गावी संन्यास घेऊन त्यांनी ‘राघवेंद्र तीर्थ’ हे नाव ग्रहण केले. राघवेंद्रांनी आपले गुरू सुधींद्र तीर्थांकडून, श्री मठाचे मुख्य म्हणून धुरा स्वीकारली. मध्वाचार्यांचे विचार सर्वदूर पोहोचवण्यासाठी राघवेंद्रांनी संपूर्ण दक्षिण भारतात प्रवास केला. प्रवासादरम्यान त्यांनी अनेक पूर्वानुभूत चमत्कार केले. १६७१ साली त्यांनी मंत्रालय येथे जिवंत समाधी घेतली. तत्पूर्वी त्यांच्या शिष्यांना त्यांनी पुढील ८०० वर्षे आत्मारूपाने शाश्वत राहण्याचे वचन दिले.