राग खमाज
राग खमाज हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे.विष्णू नारायण भातखंडे यांच्या संगीतशास्त्रीय विचारानुसार खमाज या थाटात मुख्यत्वेकरून पुढील सोळा राग येतात : (१) झिंझोटी, (२) खमाज, (३) तिलंग, (४) खंबायती, (५) बडहंस, (६) नारायणी, (७) प्रतापवराळी, (८) नागस्वरावली, (९) सोरटी, (१०) जयजयवंती, (११) देस, (१२) तिलककामोद, (१३) गौडमल्हार, (१४) दुर्गा, (१५) रागेश्वरी, (१६) गारा.
निषाद कोमल व बाकीचे स्वर शुद्ध असे या थाटाचे स्वरूप असून प्राचीन ग्रंथांत याला ‘कांभोजी’ म्हणून उल्लेखलेले आढळते. या थाटाचा आश्रय राग झिंझोटी असूनही खमाज या रागाचे नाव थाटाला देण्याचा प्रघात आहे.
या थाटातील रागांचे स्थूलमानाने दोन वर्ग पडतात : गंधार स्वरास वादी मानणाऱ्या रागांचा पहिला व तसे नसणाऱ्या रागांचा दुसरा. पहिल्यात खमाज, झिंझोटी, रागेश्वरी, खंबायती, तिलंग इ. राग आणि दुसऱ्यात सोरटी, देस, तिलककामोद, जयजयवंती, नारायणी, प्रतापवराळी इ. राग अंतर्भूत होतात.
खमाज थाटातील खमाज, तिलंग, देस, तिलककामोद या रागांत ⇨ठुमरीसारख्या सुगम संगीतप्रकाराचे गायनवादनही बरेच होते.