रघुनाथ धोंडो कर्वे
रघुनाथ धोंडो कर्वे | |
---|---|
टोपणनाव: | र.धों. कर्वे |
जन्म: | जानेवारी १४, इ.स. १८८२ मुरुड |
मृत्यू: | ऑक्टोबर १४, इ.स. १९५३ |
चळवळ: | संततिनियमन |
पत्रकारिता/ लेखन: | समाजस्वास्थ्य |
वडील: | धोंडो केशव कर्वे |
आई: | राधाबाई धोंडो कर्वे |
रघुनाथ धोंडो कर्वे (जन्म : मुरुड-रत्नागिरी, १४ जानेवारी १८८२; - पुणे, १४ ऑक्टोबर १९५३) हे गणिताचे प्राध्यापक आणि महाराष्ट्रातील अग्रणी समाजसुधारक होते. हे धोंडो केशव कर्वे यांचे ज्येष्ठ पुत्र होत, महाराष्टात संततिनियमन या नासक्या समजल्या जाणाऱ्या गोष्टीला कुठलीही सामजिक मान्यता नव्हती. अशा काळामध्ये सामाजिक सुधारणांचा आग्रह धरून समाजामध्ये संततिनियमन होणे आवश्यक आहे, आणि त्यासंबंधी कायदा करून त्याचा उपयोग केला जावा, अशा प्रकारचे मत र.धों कर्वे यांनी मांडले. 'समाजस्वास्थ्य' या नावाने त्यांनी मासिक सुरू करून परिवर्तनाला दिशा देण्याचा प्रयत्न केला [१]
बालपण आणि तारुण्य
र.धों. कर्वे यांचा जन्म मुरुड येथे झाला. पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमधे ते शिकले. इ.स. १८९९ साली त्यांनी दहावीची परीक्षा दिली. इ.स. १९०४मधे ते फर्ग्युसन कॉलेजमधून बी. ए.झाले. आशा व पौर्णिमा नावाची साप्ताहिके इ.स. १९४० च्या सुमारास प्रसिद्ध होत असत, त्यांमध्ये ह.वि. देसाई या पत्रकाराने रघुनाथरावांच्या घेतलेल्या दोन मुलाखती प्रसिद्ध झाल्या आहेत. (असंग्रहित रधों' या पुस्तकात या मुलाखती प्रकाशित झाल्या आहे. आंतरजालावरही या मुलाखती वाचता येतात.) इ.स. १९१९ साली ते गणितातील पीएच.डी. पदवी घेण्याकरिता ते पॅरिसला गेले, परंतु ती न मिळवता एका पदविकेवर समाधान मानून त्यांना परत यावे लागले. त्यामागील घडलेल्या घटना त्यांनी या मुलाखतींमध्ये नोंदविल्या आहेत. याशिवाय अण्णांशी त्यांचे संबंध कसे राहिले, यावरही या मुलाखतींमध्ये प्रकाश टाकण्यात आला आहे. आणखी काही दुर्मिळ माहितीही तिथे निश्चितच मिळते.
इ.स. १९०६ साली रघुनाथराव मुंबईला ट्रेनिंग कॉलेजात शिक्षण घेण्याकरिता आले, तेव्हा तिथे त्यांना भेटलेले प्रो. नेल्सन फ्रेझर या गुरूंविषयी आणि फ्रेंच भाषा शिकायचे निश्चित झाले, तेव्हापासून दीर्घकालपर्यंत ज्यांच्या सानिध्याचा व साहाय्याचा लाभ रघुनाथरावांना मिळाला ते प्रो. पेल्तिए यांच्या संबंधातील त्यांनी जागवलेल्या आठवणी ‘एक विक्षिप्त इंग्रज- प्रो. नेल्सन पेल्तिए‘ या लेखात आहेत.
व्यावसायिक कारकीर्द
र.धों.कर्वे यांनी गणिताचे प्राध्यापक म्हणून मुंबईच्या विल्सन महाविद्यालयात नोकरी केली, त्यातच त्यांनी कुटुंब नियोजन, लोकसंखेला आळा, आणि लैंगिक सुखाचे स्त्रियांचे अधिकार याचे महत्त्व ते लोकांना सांगत राहिले. तेव्हा महाविद्यालयाच्या रूढीवादी प्राचार्यांनी त्यांना पदाचा राजीनामा देण्यास सांगितले. त्यांनी तो दिला परंतु वरील प्रश्नांसाठी आपले आयुष्य समर्पित केले.
त्यांच्या जन्माच्या वेळी त्यांच्या मातोश्रींचा बाळंतपणातच देहान्त झाल्यामुळे गरोदरपणासंदर्भात स्त्रियांना व्यवस्थित शिक्षण आणि माहिती व्हावी असा त्यांचा आग्रह होता.
संततिनियमन
संततिनियमनाचे भारतातील आद्य प्रवर्तक म्हणून ज्यांची ओळख करून देता येईल असे आधुनिक संत म्हणजे रघुनाथ कर्वे. समाजस्वास्थ्यासाठी संततिनियमन व लैंगिक शिक्षण यांविषयी र. धों. कर्वे यांनी केलेले लोकांचे मत-विचार प्रबोधन, प्रवर्तन व प्रत्यक्ष कार्य फार मोलाचे आहे. ज्या काळात संततिनियमनाविषयी साधा उच्चारही करणे निषिद्ध मानले जायचे, त्या काळात रघुनाथरावांनी या विषयाचा प्रचार करून जनजागृती घडवून आणायचे ठरविले. वाचनाची अफाट गोडी आणि लहानपणापासून जडलेली अवांतर वाचनाची सवय यामुळे कर्वे यांनी अनेक शास्त्रीय पुस्तके वाचनालयांतून आणून वाचली.
स्त्री मुक्ती, स्त्री शिक्षण, स्त्री-पुरुष संबंध याबाबतही कर्व्यांचा दृष्टिकोन अतिशय पुरोगामी होता. वैद्यकीय नवविध संशोधनाने कमी होत चाललेले मृत्यूचे प्रमाण व अनिर्बंध वाढत चाललेली लोकसंख्यामुळे संततिनियमनाची गरज लक्षता घेऊन रघुनाथराव कर्वे यांनी इ.स. १९२१ साली इंग्रजीत एक पुस्तक प्रकाशित केले. ह्या विषयावर संशोधन करून आपल्या राहत्या घरीच संततिनियमनाची साधने बनवून देण्याचा आधुनिक उपक्रम त्यांनी सुरू केला. पत्नी मालतीलाही बरोबर घेऊन त्यांनी कुटुंबनियोजन केंद्र स्थापन केले. नागरिकांना मार्गदर्शन केले. लैंगिक रोगांची लक्षणे, कारणे त्यावरील उपाय यांबाबत लोकांना माहिती दिली. त्यासाठी त्यांनी ‘वेश्याव्यवसाय’, `आधुनिक आहारशास्त्र' ही पुस्तके लिहिली.
स्वतःला एकही मूल नसताना कर्वे यांनी शस्त्रक्रिया करून घेतली व त्यांच्या बायकोनेही त्याला थोर मनाने संमती दिली. इ.स. १९२३ साली पुण्याच्या वसंत व्याख्यानमालेत त्यांनी ‘संततिनियमन’ ह्या विषयावर भाषण केले. कर्वे यांनी स्वतःच्या प्रयत्नातून पहिले कुटुंब नियोजन केंद्र इ.स. १९२१ साली लंडनमधे सुरू केले,त्याच वर्षी ते भारतात सुरू झाले. स्वतःचे जीवनप्रयोजन म्हणून लैंगिक शिक्षणाचा आग्रह रघुनाथ धोंडो कर्वे यांनी अगदी इसवी सनाच्या दुसऱ्या दशकात धरला होता. लैंगिक शिक्षणाबद्दल जनजागृती करण्याचा त्यांनी ध्यासच घेतला होता. संभोग हा केवळ संतती उत्पादनासाठी नसून सुखासाठीदेखील असतो, असा त्यांचा विचार होता. पण संतती नियमनाची पुरेशी साधन/ शास्त्रीय माहिती व मुख्य म्हणजे सामाजिक जाणीव नसल्यामुळे भारंभार पोरे होत. त्यामुळे स्त्री-आरोग्यावर गंभीर परिणाम व्हायचे. कौटुंबिक आर्थिक परिस्थिती खालावायची. खूप मुले झाल्यामुळे शारीरिक सुखाची भीती वाटायला लागायची, अशा भीतीमुळे मानसिक विकृती निर्माण व्हायची, त्यातून बलात्कार, वेश्यागमन अशा गोष्टी घडत. ह्या वेश्यागमनातून बऱ्याच व्याधी निरोगी घरांमध्ये प्रवेश करायच्या. ह्या सर्व समस्यांमध्ये र. धों. कर्व्यांना त्यांच्या कट्टर शास्त्रीय दृष्टिकोनाचा खूप उपयोग झाला.
समाजस्वास्थ्य
संततिनियमन. संततिनियमनाचे उद्दिष्ट समोर ठेवून र.धों. कर्वे यांनी १५ जुलै इ.स. १९२७ला ‘समाजस्वास्थ्य’ या मासिकाची सुरुवात केली. कोणत्याही विषयाचा सखोल अभ्यास करून त्यावर स्वतंत्रपणे विचार करून आपली मते बनवणे व ती निर्भीडपणे मांडणे हे र. धों. कर्वे यांच्या व्यक्तिमत्त्वाचे ठळक वैशिष्ट्य होय. यासाठी त्यांना सरकारी खात्यातील नोकरीही प्रसंगी गमवावी लागली. इ.स. १९२७ ते इ.स. १९५३ अशी २६ वर्षे ४ महिने कर्वे यांनी ‘समाजस्वास्थ्य’ हे मासिक मोठ्या निष्ठेने, कमालीच्या निग्रहाने चालवले. त्याद्वारे लैंगिक शिक्षणाचा प्रसार केला. वक्तशीरपणा आणि व्यवस्थितपणा ही कर्व्यांच्या व्यक्तित्वाची ठळक वैशिष्ट्ये म्हणून सांगता येतील. समाजस्वास्थ्याचे अंक प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेला प्रेसमधून येत. स्वतः सर्व बंडले बांधून, पत्ते घालून चौदा तारखेला ती सर्व पोस्टात जाऊन पंधरा तारखेला ते अंक ग्राहकांच्या हातीही पडत.
केवळ संततिनियमनाचीच नव्हे तर सर्वच लैंगिक प्रश्नांच्या बाबतीत बुद्धीप्रामाण्यवादी भूमिकेतून निकोप व निर्भय चर्चा व्हावी असा रघुनाथरावांनी आग्रह धरला तेव्हा त्यांना कर्मठ, सनातनी, धर्माभिमानी आणि जुनाट समजुती कवटाळणाऱ्या डॉक्टरांच्या विरोधाला तोंड द्यावे लागले. कायद्याच्या कैचीत पकडून त्यांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न झाला. विरोधाची पर्वा न करता आपल्याला पटलेले विचार समाजाला पटवून देण्याचा रघुनाथरावांनी आयुष्यभर जिद्दीने प्रयत्न केला. त्यासाठी आर्थिक ओढगस्तीचे, अस्थिरतेचे आयुष्य पत्करले पण आपल्या जीवननिष्ठेबाबत तडजोड केली नाही.[२]
जुलै १९२७ मध्ये ‘समाजस्वास्थ्या’चा पहिला अंक निघाला. या या अंकात हे मासिक सुरू करण्यामागचा आपला उद्देश रघुनाथरावांनी सांगितला आहे. ‘व्यक्तींच्या व समाजाच्या शारीरिक व मानसिक आरोग्याची व त्यासंबंधी उपायांची चर्चा करणे हा या मासिकाचा उद्देश आहे. विशेषतः ज्या विषयासंबंधी लेख इतर पत्रकार छापत नाहीत असे विषय कितीही महत्त्वाचे असले तरी त्यासंबंधी माहिती मिळवण्यास सामान्य वाचकांस अतिशय अडचण पडते. व ही अडचण दूर करण्याचा आमचा विचार आहे. यात तत्त्वज्ञानाचा खल न करता व्यवहारोपयोगी माहितीही दिली जाईल.’[३]
समाजस्वास्थ्यातील प्रचारामुळे त्यांच्यावर खटलेही भरले गेले. जवळजवळ सत्तावीस वर्षे रघुनाथरावांनी समाजस्वास्थ्य हे मासिक चालवले. अश्लीलता हा कोणत्याही लेखाचा, सदराचा किंवा इतर वस्तूचा गुण नसतो, तो फक्त तसा आरोप करणाऱ्याच्या मनाचा गुण आहे, हे सांगणाऱ्या रघुनाथरावांच्या या कार्याचे परिणाम तत्कालीन समाजस्वास्थ्यावरही झाले. अनेक वाद झाले, खटल्यांमध्ये रघुनाथरावांना शिक्षा झाली, बराच तोटा सहन करूनही ते आपल्या मूळ कार्यापासून ढळले नाहीत.
समाजाकडून होणारी अवहेलना सोसूनही आपल्या सदसद्विवेकबुद्धीला जे पटते ते निर्भीडपणे मांडण्याच्या रघुनाथरावांच्या वृत्तीमुळे अनंत आर्थिक अडचणींतूनही त्यांनी ‘समाजस्वास्थ्य’ चालवले. होईल ते नुकसान सोसण्याची आणि मासिकाचे काम करण्याची ताकद आहे तोपर्यंत ते चालू ठेवण्याचा बेत आहे. कोणी काहीही म्हणले तरी या मासिकाचे एकच ध्येय आहे. ते ध्येय सर्व समंजस माणसांना मान्य झालेच पाहिजे- मग त्यांचे मार्ग माझ्यापेक्षा वेगळे असले तर असोत! 'सर्वेऽपि सुखिनः सन्तु। सर्वे सन्तु निरामया:। सर्वे भद्राणि पशन्तु न कश्चित् दुःखभाग् भवेत।' या ध्येयाकरिता माझ्या अकलेप्रमाणे मी काम करीत राहणार. मग लोक काहीही म्हणोत![४]
आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी लोकांना सांगायच्या आहेत. आणण कसेही करून त्या सांगितल्याच पाहिजेत, असे वाटून हे मासिक काढायचे ठरवले. पण त्यात केवळ बुद्धिप्रामाण्याची तत्त्वेच सांगून मला थांबायचे नव्हते, तर ती हरघडी आचरणात आणणे, प्रत्येक विषयाला लावून त्या दृष्टीने मतप्रचार करण्याचा माझा उद्देश होता. आपले अंतिम ध्येय काय, याचा विचार मासिकाचे नाव ठरवताना करावा लागला; आणण समाजाचे कल्याण हेच ध्येय ठरवून त्याला 'समाजस्वास्थ्य' असे नाव दिले.. पण समाजाचे कल्याण साधताना सत्याकडे म्हणजे बुद्धिप्रामाण्याकडे दुर्लक्ष करून भागत नाही. कारण निसर्गाचे नियम कोणालाही बाधत नाहीत; तेव्हा त्यांना धाब्यावर बसवण्याचा फोल प्रयत्नही न करता त्यांचा समाजाला उपयोग कसा करून घेता येईल, हेच लिहणे जरूर आहे. [५]
फ्रान्स येथील वास्तव्यामध्ये र.धों कर्वे यांनी बरेच वाचन, अभ्यास केला. तेथून येताना सोबत ट्रंका भरून संततिनियमनाची साधने व पुस्तके घेऊन आले. स्वतःच्या बिऱ्हाडातच त्यांनी पहिले संततिनियमन केंद्र चालू केले. लोकांनी खूप हेटाळणी केली, कुचेष्टा केली, पण कर्वे आपल्या ध्यासापासून हटले नाहीत. एका वसंत व्याख्यान मालेत त्यांनी स्त्रियांनादेखील लैंगिक भावना असतात हे प्रकटपणे मांडले. त्यांचे हे प्रकट बोलणे बऱ्याच मान्यवरांना पचले नाही, पण स्वतःवर असलेल्या विश्वासाच्या जोरावर ते आपले हे नैसर्गिक विचार निदान काही लोकांपर्यंत तरी पोचवू शकले. त्या मोजक्या लोकांमध्ये पेरलेल्या विचारांचा बराच मोठा वृक्ष आज आपल्या समोर उभा आहे. त्यांच्या जन्माच्या वेळी त्यांच्या मातोश्रींचा बाळंतपणातच देहान्त झाल्यामुळे गरोदरपणा या संदर्भात व्यवस्थित शिक्षण आणि माहिती व्हावी असा त्यांचा आग्रह होता. २१व्या शतकातील भारतातल्या सज्ञान लोकसंख्येमध्ये निदान १०% लोक तरी संततिनियमन करीत असावेत. र. धों. कर्व्यांच्या हयातीत त्यांना केवळ कुचेष्टाच मिळाली, तरीदेखील ते केवळ स्वतःवरच्या विश्वासावर लढत राहिले, त्यांना हा आत्मविश्वास त्यांच्या पत्नीने, व आई-वडिलांनी पूर्ण खंबीरपणे त्यांच्यामागे उभे राहून दिला. जेव्हा केव्हा परिस्थिती हाताबाहेर जायची त्यात्या वेळी त्यांना रॅंग्लर परांजपे ह्यांसारखे हितचिंतक लाभायचे. अनेक अश्लीलतेच्या कोर्ट खटल्यांमध्ये त्यांना दंड झाला. एकदा त्यांची केस बाबासाहेब आंबेडकरांनी लढवली होती. दुर्दैवाने ती केस ते केस हरले पण तरीही त्यांना बाबासाहेबांसारखा आयुष्यभरासाठीचा मित्र मिळाला.
फ्रेंच भाषेचे र.धों. कर्व्यांना विशेष ज्ञान होते. त्या भाषेतील अनेक नाटके व गोष्टी त्यांनी रूपांतरित केली आहेत. नाटक, सिनेमा, ललित वाङ्मय ह्यावर 'समाजस्वास्थ्या'त टीकात्मक लेख व परीक्षणे येत. साहित्य, संगीत, अन्य कला यांची त्यांना तहान होती. देशात व जगात काय चालले आहे ह्याचे त्यांचे अवलोकन तिखट होते. एका थोर समाजसुधारकाच्या पोटी जन्म घेऊनही त्यांची वाढ खुंटली नाही. त्यांनी वडिलांच्या - महर्षी कर्वे यांच्या - पुढे अनेक पावले जाऊन समाजप्रबोधन करण्याचा प्रयत्न केला. एकवेळ परकीयांशी लढणे सोपे असते;पण स्वकीयांबरोबर झुंज घेणे अवघड असते. रघुनाथरावांनी गोपाळ गणेश आगरकरांप्रमाणेच वैचारिक मार्ग पत्करला होता. लोकशिक्षणाचा मार्ग पसंत असलेल्या रघुनाथरावांनी सतत सत्तावीस वषे एकाकी लढत दिली, लैंगिगकतेपवषयी मूलगामी विश्लेषण केले. एका अर्थी रघुनाथराव कर्वे हे ‘सुधारक’कार आगरकरांचे एकटेच वारस होते.
प्रकाशित साहित्य
- आधुनिक आहारशास्त्र
- आधुनिक कामशास्त्र
- गुप्त रोगांपासून बचाव
- त्वचेची निगा
- वेश्याव्यवसाय
- संततिनियमन
- संतति नियमन - विचार व आचार, इत्यादी.
डॉ. अनंत देशमुख यांनी र.धों. कर्वे यांच्या
१) असंग्रहित र.धों. कर्वे
२) निवडक 'शारदेची पत्रे'
३) बुद्धिप्रामाण्यवाद
४) मोपांसाच्या कथा
५) र.धों. कर्वे : मते आणि मतांतरे
६) शेष समाजस्वास्थ्य
७) 'समाजस्वास्थ्य'कार
८) 'समाजस्वास्थ्य'मधील निवडक लेख
या आठ पुस्तकांच्या सेटचे संकलन आणि संपादन केले आहे.
र.धों. कर्वे यांनी लिहिलेली काही अप्रकाशित पत्रे
र.धों. कर्वे यांनी कुणा अनामिक व्यक्तीला २८ पत्रे लिहिली होती, त्यांतली २४ पत्रे २०१६ सालच्या एप्रिलमध्ये सापडली. त्या पत्रांबद्दलची ही माहिती :-
या पत्रांत र.धों. कर्वे यांनी धर्म, अध्यात्म, बुद्धिप्रामाण्य, साहित्य, लैंगिकता, ब्रह्मचर्य, नैतिकता, मानसशास्त्र, ज्योतिष याविषयीची आपली मते लख्खपणे मांडली आहेत. यांत रधोंनी विवेकानंद, गांधीजी, अरविंद घोष, रवींद्रनाथ टागोर, सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावर कठोर प्रहार केले आहेत.
रधों म्हणतात, 'कोणताही धर्म तर्कशास्त्राला धरून नाही. आणि बुद्धिमान माणूस तर्कानेच विचार करतो. अध्यात्म बुद्धीतून नव्हे तर श्रद्धेतून निघालेले आहे. त्याला शास्त्रीय आधार नाही. त्यामुळे विवेकानंदांच्या मताला मी किंमत देत नाही.'
अरविंद घोष, टागोर हे त्यांना ढोंगी वाटतात. टागोर उत्तम कथालेखक आहेत, पण त्यांचा नोबेल पारितोषिक मिळालेला काव्यसंग्रह त्या योग्यतेचा नव्हता. त्यांच्यापाशी मनाचा मोठेपणा नव्हता, असे ते म्हणतात.
'क्वेट्टा'त झालेल्या भूकंपाचे कारण माणसांची पापे आहेत, असे म्हणणे हा गांधींचा मूर्खपणा होता आणि त्यांच्या ब्रह्मचर्याच्या कल्पनेला काहीही शास्त्रीय आधार नसल्यामुळे धार्मिक वेड या पलीकडे त्याला महत्त्व नाही, असेही ते म्हणतात .
रधोंच्या परखडपणाचे तडाखे ना.सी. फडके, अत्रे यांनाही बसले आहेत. मामा वरेरकर हे फडक्यांपेक्षा जास्त चांगले कादंबरीकार व अत्र्यांपेक्षा अधिक चांगले नाटककार होते असे म्हणतानाच, मराठीत उत्तम कादंबरीकार नाहीत, असेही ते सांगून टाकतात.
विवाहबाह्य संबंध आणि चारित्र्यहीनतेवर त्यांनी आपली मते स्वच्छपणे नोंदवली आहेत आणि सामाजिक सुधारणेणांत लोकांचा अडाणीपणा आणि सरकारचे अडथळे याच मोठ्या अडचणी आहेत, असेही सांगून टाकले आहे.
वारसा
- 'रघुनाथाची बखर' ही श्री. ज. जोशींची रघुनाथ धोंडो कर्वे या थोर व स्वाभाविकपणे उपेक्षिलेल्या एका सामाजिक क्रांतिकारकाच्या जीवनावरची एक वेधक कादंबरी आहे. या कादंबरीवर आधारित दृक्श्राव्य कार्यक्रम, श्याम भुर्के आणि गीता भुर्के रंगमंचावर सादर करतात.
- ध्यासपर्व हा अमोल पालेकरांनी त्यांच्यावर काढलेला एक अत्युत्तम चित्रपट आहे. त्यात रघुनाथ धोंडो कर्वे यांची मध्यवर्ती भूमिका किशोर कदम (कवी सौमित्र) ह्यांनी अत्यंत जीव ओतून केली आहे. त्यांच्या पत्नीची (मालतीबाई कर्वे) भूमिका सीमा विश्वास ह्या अक्षरशः जगल्या आहेत. बाकीची पात्रे ही जाणीवपूर्वक साहाय्यक व छोटी ठेवली आहेत. कुठेही मुख्य विषयापासून चित्रपट भरकटलेला नाही. अशा विषयावर ह्या आधुनिक युगात साधा चित्रपट काढताना/बघताना इतका त्रास/संकोचल्यासारखे होते, तर त्या काळात तसे काम करताना काय काय सहन करावे लागले असेल हे जाणवते. हा समाज, एका स्त्रीने साधे शिक्षण घेण्या-देण्यावरून महात्मा फुले व सावित्रीबाईंना इतका त्रास देऊ शकतो, तर र.धों. कर्व्यांचा विषय त्याच्या पचनी पडणे शक्यच नव्हते.
र.धों. कर्व्यांसंबंधी पुस्तके
- महाराष्ट्रातील समाजसुधारक - अन्य महनीय व्यक्ती - के सागर प्रकाशन.
- आधुनिक भारताचे शिल्पकार - संपादक-बाळ सामंत, प्रकाशक - लोकवाङ्मय गृह
- र.धों. कर्वे, - लेखक-य..दि. फडके; ह. वि. मोटे प्रकाशन
चित्रपट
ध्यासपर्व (र.धों. कर्वे यांच्या जीवनावरील अमोल पालेकर व चित्रा पालेकर निर्मित चित्रपट)
नाटक
- ‘वादळातील दीपस्तंभ’ (तीन अंकी नाटक) महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धा व कामगार नाट्य स्पर्धेतील पारितोषिक प्राप्त नाटक. लेखिका - सौ.सुलभा राजीव कुळकर्णी (जळगाव)
- कर्वे, .बाय द वे (एकपात्री नाटक, लेखन, दिग्दर्शन आणि कलावंत अभिषेक देशमुख)
- र.धों. कर्वे यांच्या जीवनकार्यावर अजित दळवी यांनी समाजस्वास्थ्य नावाचे नाटक लिहिले असून, अतुल पेठे यांनी ते दिग्दर्शित केले आहे. या नाटकाचा एक प्रयोग संगीत नाटक अकादमीतर्फे रंग संगम या नाट्योत्सवात चंदीगड येथे २०-९-२०१७ रोजी झाला. महाराष्ट्रात आजवर अनेक प्रयोग (उदा० २५-१२-२०१७चा पुण्यातील प्रयोग) झाले आहेत. या नाटकासाठी अजित दळवी यांना महाराष्ट्र फाऊंडेशनचा सर्वोत्कृष्ट लेखन पुरस्कार मिळाला आहे.
- 'रघुनाथाची बखर' ह्या कादंबरीवर आधारित दृक्श्राव्य कार्यक्रम (श्याम भुर्के आणि गीता भुर्के)
अधिक वाचन
- म. वा. धोंड. जाळ्यातील चंद्र.
बाह्य दुवे
- [१][permanent dead link]
संकेतस्थळ
संदर्भ
- ^ धर्माधिकारी, अविनाश (२००४). महाराष्ट्रातील समाजसुधारक. पुणे: चाणक्य मंडल. pp. १६८.
- ^ फडके, य. दि., र. धों. कर्वे, ह. वि. मोटे प्रकाशन, पुणे, १९८१, पृ. ५३
- ^ फडके, य. दि., र. धों. कर्वे, ह. वि. मोटे प्रकाशन, पुणे, १९८१, पृ. ५९
- ^ मनोहर जानेवारी १९४६ समाजस्वास्थ्याची समाजसेवा. र. धों. कर्वे.
- ^ मनोहर जानेवारी १९४६ समाजस्वास्थ्याची समाजसेवा. र. धों. कर्वे.