य.ना. टिपणीस
यशवंत नारायण ऊर्फ अप्पा टिपणीस (३ डिसेंबर, १८७६:महाड, रायगड जिल्हा, महाराष्ट्र - २५ मार्च, १९४३, मुंबई, महाराष्ट्र) हे एक मराठी नाट्यनिर्माते, नाट्यलेखक, अभिनेते आणि वेषभूषाकार होते. चंद्रग्रहण या नाटकाद्वारे प्रथमच अस्सल ऐतिहासिक स्वरूपातला शिवाजीचा जिरेटोप रंगमंचावर आणण्याचे श्रेय टिपणिसांना जाते. टिपणिसांनी आपल्या आयुष्यात रंगमंचावरील पात्रांच्या रंगभूषा, केशभूषा आणि वेशभूषांना जास्तीत जास्त वास्तव बनवण्याचा प्रयत्न केला.
ते मूळचे महाडचे राहणारे असून अप्पांचे वडील नारायणराव यांचे नेहेर (महाबळेश्वर) येथे किराणा मालाचे दुकान होते. त्यांची घरची परिस्थिती चांगली होती.
अप्पा टिपणिसांचे मोठे बंधू माधवराव टिपणीस एक प्रसिद्ध अभिनेते होते. त्यांनी विष्णूपंत औंधकर, केशवराव दाते इ. सह काम केले होते. अप्पा टिपणिसांना त्यांच्या बंधूंकडून अभिनयाचे धडे मिळाले.
अप्पांचे जन्मस्थळ कोकणातळे महाड असून त्यांचे बालपण तेथेच गेले. विद्यार्थी असताना त्यांनी काही मित्रांसह हौसेखातर काही नाटके केली.
शालेय जीवनात नाटके करतांकरतां एक नाट्यसंस्थाच उभारण्याचा प्रयत्न केला.. ज्ञानप्रकाशचे काही काळ संपादक असलेले, आणि पुढे एलफिन्स्टन काॅलेजमध्ये प्राध्यापक झालेले गोविंदराव टिपणीस आणि मामा सुळे यांची त्यांनी मदत घेतली. गोविंदराव टिपणीस पुण्याला गेले आणि त्यांनी लागणाऱ्या सामानाची जुळवाजुळव केली. फर्ग्युसन काॅलेजात प्राध्यापक असलेले भानू यांचेही साहाय्य त्यांना मिळाले. या सर्वांनी सन १९०४मध्ये महाराष्ट्र नाटक कंपनीची स्थापना केली. अप्पा टिपणीस या नाटक कंपनीचे चालक झाले.
या नाट्यसंस्थेने सुरुवातीलाच 'शाहू नगरवासींनी केलेले, आणि पुढे लेखकाशी मतभेद झाल्याने व अन्य काही कारणाने बंद केलेल्या, कृ.प्र. खाडिलकर यांच्या 'कांचनगडची मोहिनी' या नाटकाने सुरुवात केली. अप्पा टिपणीस नायकाच्या भूमिकेत होते आणि त्यांचे बंधू माधवराव मॊहिनेची भूमिका करत होते. या नाटकच्या तालमी चालू असताना गॊविंद बल्लाळ देवल तेथे आले, दोन अंकांपर्यंत ते कसेबसे तालीम पहायला बसले आणि उठून गेले. जाताना ते प्रा.भानूंना म्हणाले, 'उगाचच तुम्ही या मंडळींसाठी तुमचा वेळ फुकट दवडत आहांत. हे नाटक चालणे शक्य नाही.' त्यानंतर मुंबईला येऊन देवलांनी या नाटकाचा पूर्ण प्रयोग पाहिला आणि ते म्हणाले, 'मी माझे पहिले मत परत घेतो. नटमंडळींनी प्रयोग फारच छान वसवला आहे.'[ संदर्भ हवा ] संस्थेचे 'कांचनगडची मोहना' खूप छान चालले.
महाराष्ट्र नाटक मंडळीने 'कमला' हे सामाजिक नाटक केले; तेही खूप नावाजले गेले. त्यावेळी अप्पा टिपणीस यांनी पुनर्विवाह केला होता. त्याबद्दल त्यांना एकाच वेळी लोकांच्या कौतुकाला आणि उपहासाला व टीकेला तोंड द्यावे लागले. त्यांचे 'संगीत प्रेमसंन्यास' हे तिसरे नाटक रंगभूमीवर आले, पण मंडळींच्या अंतर्गत भांडणांमुळे अप्पांना कंपनी सोडावी लागली.
अप्पा टिपणीस बाहेर पडले त्यावेळी काका रानडे, चिंतामणराव कोल्हटकर, त्र्यंबकराव प्रधान, कंपनीत नायिकेची भूमिका करणारे देखणे नट वामनराव पोतनीस आणि विष्णूपंत औंधकर हेही बाहेर पडले. त्यानंतर अप्पांनी 'भारत नाट्य मंडळी' काढली. तिच्यासाठी स्वतःच 'मत्स्यगंधा' नावाचे नाटक लिहिले. नाटकात भीष्माच्या भूमिकेत अप्पा असत, आणि नाटकाचे दिग्दर्शनही त्यांचेच होते.
त्या काळात अनेक नट काम सोडून जात आणि नाटक कंपनी बंद पडे. भारत नाटक कंपनीचेही असेच झाले. सन १९1६ च्या सुमारास ती बंद पडली; त्यांच्याबरोबर काम करणारे नटही सोडून गेले. तेव्या अप्पांनी 'आर्यावर्त नाटक कंपनी' सुरू केली. कंपनीसाठी अप्पांनी शिवाजीच्या जीवनावरचे 'चंद्रग्रहण' नावाचे नाटक लिहिले. मोहन पालेकर, म्हापसेकर आदी नव्या नटांनी घेऊन ते या नाटकाचे प्रयोग करू लागले. हीही कंपनी काही काळातच बंद पडली, आणि अप्पांनी त्यापुढे फक्त नाटककार म्हणूनच राहायचे ठरवले. पण ते साध्य झाले नाही.
ललितकला नाटक कंपनीतील केशवराव भोसले यांनी अप्पा टिपणिसांना 'शहा शिवाजी' नावाचे संगीत नाटक लिहून दिले. नाटकातील काही पदे अप्पांनी, काही मामा वरेरकरांनी, तर काही बापूराव पेंढारकर यांनी रचली होती. या नाटकासाठी टिपणिसांनी पुण्यातील बाबासाहेब घोरपडे यांच्याकडील ऐतिहासािक पुस्तकांचा संग्रह वाचून काढला आणि आपल्या स्वतःच्या देखरेखीखाली अंगरखे, पगड्या शिवून घेतल्या. अप्पांनी बेतलेले हे कपडे पुढे कित्येक वर्षे, बहुधा आधुनिक काळातही नाटकांत आणि चित्रपटांत वापरले जात आहेत.
तात्यासाहेब केळकर यांना नाटककार बनवण्यात अप्पांची मोठीच मदत झाली. केळकरांचे 'तोतयाचे बंड' रंगभूमीवर आणण्यापूर्वी अप्पांनी प्रयोगाच्या दृष्टीने केलेल्या मोलाच्या सूचना, आणि नाटक प्रत्यक्ष लिहून झाल्यावर प्रेक्षकांच्या नजरेने त्यावर केलेले संस्करण यांचा तात्यासाहेबांना मोठाच फायदा झाला. नाटकात अप्पा टिपणीस हे नाना फडणविसांच्या भूमिकेत होते. त्यांची भूमिका म्हणजे त्यांच्या अभिनयकुशलतेची परमावधी होती.
तोतयाचे बंड या नाटकानंतर अप्पा टिपणिसांनी श्री.कृ. कोल्हटकरांचे वधूपरीक्षा रंगभूमीवर आणले. या नाटकात नायिकेचा विहिरीत उडी मारण्याचा प्रसंग होता. तिने उडी मारल्यावर झालेला धप्पकन आवाज होई. उडीनंतर वर उसळलेले पाणी पुढच्या रांगेतील प्रक्षकांच्या तोंडावर पडे.
अप्पा टिपणिसांची बहुतेक नाटके लोकप्रिय झाली, कमीअधिक प्रमाणात चालली. नाटके लिहिणे ती बसवणे, रंगभूमीवर आणणे, हैशी नटांना अभिनय शिकवणे, नाट्यसंस्था काढणे, ती बुडली तर नवीन काढणे हे सर्व अप्पांच्या रक्तातच होते. मराठी नाट्यसृष्टीची पुढे जी भरभराट झाली तिचा पाया अप्पा टिपणीस यांच्यासारख्या नाटकवेड्या कलावंतांनी घातला.
य.ना. टिपणिसांनी लिहिलेली नाटके
- आशानिराशा (सामाजिक,१९२३)
- कमला (सामाजिक,१९११)
- चंद्रग्रहण (ऐतिहासिक,१९१८)
- जरासंध (पौराणिक,१९१६)
- दख्खनचा दिवा (ऐतिहासिक,१९३६). हे अप्पांनी लिहिलेले अखेरचे नाटक; याचे प्रयोग मुंबईच्या 'चित्तरंजन नाटक समाजा'ने केले.
- नारद (पौराणिक)
- संगीत नेकजात मराठा (ऐतिहासिक)
- मत्स्यगंधा (पौराणिक,१९१३)
- राजरंजन (सामाजिक,१९२५)
- राज्यारोहण (ऐतिहासिक)
- राधामाधव (पौराणिक,१९१४)
- संगीत शहा शिवाजी (ऐतिहासिक,१९२५)
- शिक्काकट्यार (ऐतिहासिक,१९२७)
- शिवाजीला शह (ऐतिहासिक,१९३३)
- स्वस्तिक बँक (सामाजिक,१९३२)
य.ना. टिपणिसांची भूमिका असलेली नाटके आणि त्यांतील त्यांनी अभिनीत केलेल्या पात्राचे नाव
- ऑथेल्लो (ऑथेल्लो)
- कमला (नानासाहेब)
- कांचनगडची मोहना (प्रतापराव)
- कीचकवध (कंकभट, धर्म)
- चंद्रग्रहण (शिवाजी)
- जयध्वज (माधवगुप्त)
- तोतयाचे बंड (नाना फडणीस)
- त्राटिका (प्रतापराव)
- दुर्गा (?)
- प्रेमध्वज (सम्राटसिंह)
- प्रेमसंन्यास (विद्याधर)
- फाल्गुनराव (फाल्गुनराव)
- बायकांचे बंड (अर्जुन)
- भाऊबंदकी (राघोबा, सुमेरसिंह)
- मत्स्यगंधा (भीष्म)
- मानापमान (विलासधर)
- लोकशासन (यज्ञेश्वर)
- वधू परीक्षा (धुरंधर)
- शहा शिवाजी (?)
- सवाई माधवराव यांचा मृत्यू (नाना फडणीस)
सन्मान
पुणे येथे १९२१ साली भरलेल्या १७व्या मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद यशवंत नारायण टिपणीस यांनी भूषविले होते.
(अपूर्ण)