योगनिद्रा
विषय प्रवेश
योगनिद्रा म्हणजे योग्यांची निद्रा! शरीर हे आपले उपकरण आहे. 'शरीरम् आद्यं खलु धर्मसाधनम्' असे उपनिषदे सांगतात. तर शरीराला निद्रेची आवश्यकता आहे, जीवात्म्याला नाही. म्हणून आपले शरीर झोपलेले आणि जीवात्मा जागृत या ध्यान साधनेला योगनिद्रा, असे म्हणतात. योगनिद्रा करतांना अवयव-ध्यान केले जाते. प्रत्येक अवयवावर काही काळ ध्यान केंद्रित करून व नंतर त्याअवयवावरून ध्यान काढून दुसऱ्या अवयवावर ध्यान केंद्रित करायचे, याप्रमाणे शेवटी सहस्रार चक्रावर ध्यानमग्न होऊन जायचे. ही शरीर व मन शुद्ध करून ध्यानाकडे नेणारी सुलभ प्रक्रिया आहे.
योगनिद्रेचे लाभ
योगनिद्रेचे अनेक शारीरिक लाभ आहेत. अनेक आजार बरे होतात. तसेच आहार आपोआप कमी झाल्याने शरीर प्रमाणबद्ध व निरोगी राहते. शरीर व मन प्राकृतिक बनते. इच्छा कमी होतात. दिवसभर शरीर चैतन्यमय राहते. मनाला शांती, समाधान व तृप्ती मिळते. मन अतिशय मजबूत होते. कामामध्ये एकाग्रता वाढते. माणूस व्यसनी असल्यास पूर्णपणे व्यसनमुक्त होऊ शकतो. हे आहेत भौतिक लाभ!
आध्यात्मिक लाभ, मी जड शरीर नाही, जड शरीराच्या पलीकडील चैतन्य, निष्कल आत्मा आहे, ही मनाची निश्चिती होते. कुंडलिनी स्वप्रयत्नाने जागृत होते. आत्मज्ञान प्राप्त होऊन साधक योगी बनतो.
योगनिद्रा अशी करा ( कृती)
योगनिद्रा रिकाम्या पोटीच करावी. यासाठी आसन म्हणजे जमिनीवर सतरंजी टाकून त्यावर स्वच्छ धूत वस्र टाकून पाठीवर उताणे झोपावे, पायांच्या टाचा जोडलेल्या व बोटे दूर, दोन्ही हात मांड्यांना चिकटलेले परंतु तळहात वर आकाशाकडे वळविलेले असावेत. डोके सरळ ठेवावे किंवा डावीकडे वा उजवीकडे कलते ठेवायला हरकत नाही. शरीरावर कुठल्याही प्रकारचा ताण येऊ न देता पूर्ण शरीर सैल सोडावे. त्यानंतर अवयव ध्यान सुरू करावे, मनाचे पूर्ण एकत्रीकरण एकेका अवयवावर करावे. उजव्या पायाच्या अंगठ्यापासून सुरू करून एकेक अवयवाचे ध्यान करत कमरेपर्यंत यावे. त्यानंतर डावा पाय, उजवा हाथ, डावा हाथ व नंतर मूलाधारापासून सहस्त्रार चक्रा पर्यंत यावे. शेवटी सहस्रार चक्रावर ध्यानस्त झाल्याने आपोआप योगनिद्रा लागते.
अवयवांची नावे पुढीलप्रमाणे
उजवा पाय - उजवे पायांचा अंगठा - दक्षिणांगुष्ठ, पहिलं बोटं - तर्जनी, मधलं बोट - मध्यमा, त्या बाजूचे बोट - अनामिका, लहान बोट - कनिष्ठिका, उजवा तळपाय - दक्षिण पदतल, उजवी टाच - दक्षिण पार्षिणी, थोडं वर उजवा घोटा - दक्षिण गुल्फ, आणखी वर उजवी पोटरी - दक्षिण पिंडीका, उजवा गुडघा - दक्षिण जानू, आणखी वर उजवी मांडी - दक्षिण उरु, उजवी कंबर - दक्षिण कटी. पूर्ण ध्यान उजव्या कंबरेवर!
डावा पाय - डावे पायाचा अंगठा, वामांगुष्ठ, पहिलं बोट - तर्जनी, मधलं बोट - मध्यमा, बाजूचं बोट - अनामिक, लहान बोट - कनिष्ठिका, डावा तळपाय - वाम पदतल, डावी टाच - वाम पार्षिणी, डावा घोटा - वामगुल्फ, आणखी वर, डावी पोटरी - वाम पिंडीका, डावा गुडघा - वाम जानू, डावी मांडी - वाम उरू, डावी कंबर - वाम कटी. पूर्ण ध्यान डाव्या कंबरेवर!
उजवा हात - उजवे हाताचा अंगठा - दक्षिणागुष्ठ, पहिलं बोट - तर्जनी , मधलं बोट - मध्यमा, त्यानंतरचे बोट -अनामिका, लहान बोट - कनिष्टिका, उजवा तळहात - दक्षिण करतल, उजव मनगट - दक्षिण मणीबंध, आणखी वर - प्रकोष्ठ, उजवे कोपर - दक्षिण कूर्पर, उजवा बाहू, उजवा खांदा - दक्षिण स्कंध.
डावा हात - डावे हाताचा अंगठा - वामांगुष्ठ, पहिलं बोट - तर्जनी, मधले बोट - मध्यमा, बाजूचे बोट - अनामिका, लहान बोट - कनिष्ठिका, डावा तळहात - वाम करतल, डाव मनगट - वाम मणीबंध, त्यानंतर प्रकोष्ठ, डाव कोपर - वाम कूर्पर, आणखी वर, डावा बाहू, डावा खांदा - वाम स्कंध,
मुख्य शरीरावरील अवयव - शिवणीच्या स्थानावर - मूलाधार, त्यानंतर पोट - उदर, नंतर नाभी - नाभीचक्र, आणखी वर - ह्रदयम्, नंतर कंठ, हनुवटी, उजवा गाल - दक्षिण कपोल, डावा गाल - वाम कपोल, उजवा कान - दक्षिण कर्ण, डावा कान - वाम कर्ण, उजवा डोळा - दक्षिण नेत्र. डावा डोळा - वाम नेत्र, कपाळ - कपालम्. आता शेवटच स्थान, सहस्रार, मस्तकांच्या मधोमध!
या ठिकाणी ध्यान एकाग्र करताना पुढील प्रमाणे विचार ठेवावा.
ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापर:।।
ब्रह्म सत्य आहे आणि जग मिथ्या आहे. जीव आणि ब्रह्म एकच आहे, आत्मा आणि परमात्मा एकच आहे. काही निराळे नाही!
ब्रह्मार्पणं ब्रह्म हवीः ब्रह्माग्नौ ब्रह्मणा हुतम् ।
ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्मसमाधिना ।।
असा यज्ञ, ज्यात अर्पण ब्रह्म आहे, हवन द्रव्य ब्रह्म आहे, ब्रह्मरूप कर्त्या द्वारा ब्रह्मरूप अग्निमधे आहुती द्यायची क्रिया सुद्धा ब्रह्म आहे. अशाप्रकारे प्राप्त होणाऱ्या समाधिद्वारे मिळणारे फल ब्रह्मच आहे.
सारं ब्रह्ममय झालं आहे. मी विश्वात्मक आहे.
अवघ्या चराचरात मीच व्यापून आहे. आता मी जड़ शरीर नसून, तो निष्कल आत्मा आहे.
प्रातः स्मरामि हृदि संस्फुरदात्मतत्त्वं ।
सच्चित्सुखं परमहंसगतिं तुरीयम् ।।
यत्स्वप्नजागरसुषुप्तिमवैति नित्यं ।
तद्ब्रह्म निष्कलमहं न च भूतसंघ:।।
मी ब्रह्म आहे, अहं ब्रम्हास्मी ! मी ब्रह्म आहे, अहं ब्रह्मास्मी! मी ब्रह्म आहे, अहं ब्रह्मास्मी!
हरी: ओम तत्सत, हरी: ओम तत्सत, हरी: ओम तत्सत।
आता आपापल्या ठिकाणी डावीकडे वळून हळूच उठून बसायचं. योगनिद्रा समाप्त झाली.
मी जड शरीर आहे पासून सुरुवात करत करत अंतिमतः संपूर्ण विश्व मीच आहे, मी विश्वात्मक आहे, असा अनुभव घ्यायचा, ही अवयव ध्यान प्रक्रिया आहे.[१]
- ^ हरकरे, योगीराज मनोहर (२२ डिसेंबर २०११). साधना, साधक आणि दिव्यानुभूती. नागपूर: वैदिक विश्व प्रकाशन. pp. ४१, ४२, ४३.