Jump to content

या मंडळी सादर करू या (नाट्यसंस्था)

जे. जे. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्टच्या आजी-माजी विद्यार्थ्यांची या मंडळी सादर करू या ही नाट्य संस्था २८ सप्टेंबर १९७६ रोजी इन्स्टिट्यूटमधले प्राध्यापक षांताराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अध्यक्षतेखाली स्थापन झाली.

जेजेचे निम्मे विद्यार्थी तिथे 'कारकीर्द इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट’ ही संस्था बंद पडल्याने आले होते. त्यांतले विद्यार्थी (अशोक साळगांवकर, हेमंत शिंदे, विजय ताडफळे, मधुसूदन नानिवडेकर आणि इतर) आणि जेजेचे मूळ विद्यार्थी (रघुवीर कुल, नलेश पाटील, अशोक वंजारी, हेमंत शिंदे, राकेश शर्मा आणि काही इतर) हे सर्व एका वर्गात होते. या विद्यार्थ्यांनी कॉलेजच्या वार्षिक स्नेहसंमेलनात होणाऱ्या आंतरवर्गीय एकांकिका स्पर्धेत एकाऐवजी दोन एकांकिका दाखल करायचे ठरवले. त्यासाठी षांताराम पवार सरांनी संस्थेचे उप-प्राचार्य प्रा. दामू केंकरे यांची खास परवानगी काढली. परीक्षक म्हणून केंकरे सरांनी अमोल पालेकर, दीप श्रीराम यांना बोलावले, तर पवार सरांनी जयंत धर्माधिकारी यांना बोलावले.

स्पर्धेसाठी रघुवीर कुलकर्णी या विद्यार्थ्याने 'अभद' नावाची एकांकिका लिहिली, तर मधुसूदन नानिवडेकर याने ’टुरटूर’. त्यांतल्या ’टुरटूर’ला पुढे खूप प्रसिद्धी मिळाली, आणि त्यामुळे मुलांच्या या गटालाही.

कॉलेज संपल्यावर त्याच गटातील मुलांनी कॉलेजबाह्य एकांकिका स्पर्धांत भाग घेण्यासाठी 'या मंडळी सादर करू या' या नाट्यसंस्थेची स्थापना केली. संस्थेचे ब्रीदवाक्य होते, "नाट्यानंद केवळ रंगमंचावर नसतो... केवळ प्रेक्षकात नसतो, असतो तो दोहोंच्या परस्पर संबंधात!".

संस्थेतील मधुसूदन नानिवडेकर यांनी लिहिलेल्या ’अलवारा डाकू' ह्या नाटकाचा पहिला प्रयोग, नोव्हेंबर १९७८मध्ये मुंबईच्या रवींद्रमध्ये मंचावर यथासांग सादर झाला. नाटकाचा जवळजवळ सर्व खर्च व्ही. टी. स्टेशनसमोरच्या कॅनन या दुकानाचे मालक अप्पा दांडेकर यानी केला होता.

पुढे १९८४-८५ पर्यंत ही नाट्यसंस्था चांगलीच कार्यरत होती व गाजत होती. मात्र, १९८५ साली 'बंद'ची घोषणा करून सगळे सभासद आपापल्या उद्योगाला लागले.