Jump to content

यादवराज फड

यादवराव फड हे किराणा घराण्याचे गायक आहेत. त्यांचा जन्म १८ मार्च १९६२ रोजी मराठवाडय़ाच्या अंबेजोगाई तालुक्यातील वरवटी (जिल्हा बीड) या गावी झाला. घरात यादवराज फड यांचा जन्म झाला. वारकरी संप्रदायाचे संस्कार असलेल्या घरातील वातावरणामुळे ते लहानपणीच संगीताकडे ओढले गेले. यादवराज फड यांनी गोविंदगुरुजी, भीमराव पाटील यांच्याकडे रागदारीवर आधारित भजनांचे शिक्षण घेतले. त्यातूनच शास्त्रीय संगीत शिकण्याची ओढ लागली. गावात या शिक्षणाची सोय नव्हती. त्यामुळे यादवराव १९८२ मध्ये पुण्यात आले.

यादवराज फड यांची संगीत साधना

पुण्यातील तुकाराम पादुका मंदिर, गोखलेनगर भागातील हनुमान मंदिर वगैरे ठिकाणी वास्तव्य करून, माधुकरी मागून, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत यादवराजांनी संगीत साधनेला प्रारंभ झाला. १९८२ ते १९९० अशी आठ त्यांना किराणा घराण्याचे गायक पं. सदाशिवराव जाधव यांचे मार्गदर्शन मिळाले.

सदाशिवबुवांची षष्ट्यब्दी १९९० मध्ये पं. भीमसेन जोशी यांच्या उपस्थितीत साजरी झाली. त्यात यादवराज गायले. त्यामुळे त्यांचे पुणेकर रसिक आणि संगीत क्षेत्राला माहिती झाले.

१९९० मध्ये सदाशिवबुवांचे निधन झाल्यावर तीन वर्षांचा कालावधी अत्यंत कसोटीचा गेला. पण १९९३मध्ये यादवराजांचे भाग्य उजळले. त्यांना पं. भीमसेन जोशी यांचे मार्गदर्शन मिळण्याची संधी मिळाली. पुढची ७-८ वर्षे त्यांना भीमसेन जोशींचा सहवास, मार्गदर्शन आणि प्रत्यक्ष मैफिलीत साथ करण्याची अपूर्व संधी यादवराजांना मिळाली.

संगीतोन्मेष संस्था

मैफिली, साधना चालू असतानाच यादवराज यांनी संगीतविषयक अनेक उपक्रम सुरू केले. १९८७ मध्ये त्यांनी ‘संगीतोन्मेष’ या संगीतविषयक कार्य करणाऱ्या संस्थेची स्थापना केली. तरुण आणि प्रसिद्धिपराङ्‌मुख कलावंतांना संधी देणे हा त्यांचा त्यामागचा उद्देश होता. संस्थेमार्फत बाल, तरुण व वृद्ध कलाकारांना पुरस्कार देण्याचा उपक्रम राबवून तीसहून अधिक कलावंतांना संस्थेने गौरविले.

वारकरी संगीत संमेलनाची परंपरा सुरू करण्यात यादवराजांनी पुढाकार घेतला. २००३ मध्ये पहिले संमेलन त्यांच्याच अध्यक्षतेखाली पुण्यात झाले. २०१३ साली सातवे संमेलन झाले. सातापैकी तीन संमेलनांचे अध्य्क्ष यादवराज फड होते.

विद्यादानाचे कार्यही जोमाने करणाऱ्या यादवराजांनी स्वतंत्रपणे मैफिली करू शकतील, असे पंचवीसहून अधिक शिष्य तयार केले आहेत. या विद्यार्थ्यांचे ‘परंपरा संगीत संमेलन’ त्यांनी नुकतेच पुण्यात आयोजित केले होते.

संगीत साहित्य सेवा

गहिनीकल्याण, उमारंजनी, राजकंस व नंदश्री या चार नव्या रागांची निर्मिती यादवराज फड यांनी केली असून, अनेक बंदिशी, तराणे, दादरे यांच्या नवरचना केल्या आहेत. ‘सेतू ब्रह्मरस आवडीने’ हे वारकरी संगीतावर आधारित पुस्तकही यादवराजांच्या नावावर जमा आहे.

ख्याल गायनातील साधना चालू असतानाच यादवराज यांनी वारकरी संगीताची परंपरा पुढे नेत १९९० पासून हिंदी-मराठी भजनांना चाली लावून त्या श्रोत्यांसमोर सादर करण्यास सुरुवात केली. त्यातूनच यादवराजांचा ‘भक्ति-स्वरगंध’ हा कार्यक्रम उभा राहिला. त्याचे ७००हून अधिक कार्यक्रम महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर झाले आहेत.

घोटावडे(तालुका मुळशी, जिल्हा पुणे) येथे १२ व १३ सप्टेंबर २००९ रोजी यादवराज फड यांच्या अध्यक्षतेखाली संगीतोन्मेष संस्थेने पहिले ग्राम संगीत संमेलन भरवले होते.

यादवराज फड हे आकाशवाणी- दूरदर्शनचेही उच्च श्रेणीचे कलाकार आहे

पुरस्कार/सन्मान

  • सूरसिंगार संसदेचा सूरमणी किताब
  • संत तनपुरे महाराज ‘साहित्य-कला-संस्कृती’ पुरस्कार
  • वारकरी-संगीत भूषण पुरस्कार
  • नाते समाजाशी’ या राज्यस्तरीय व्यासपीठातर्फे दिलेला कलारत्न पुरस्कार
  • आपुलकी सांस्कृतिक संस्थेचा जीवनगौरव पुरस्कार


यादवराज फड यांच्या संगीत साधनेला तीस वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्यांचा पुण्यात दि. १० सप्टेंबर २०१० रोजी बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला होता.