Jump to content

यशवंत रांजणकर

यशवंत रांजणकर (जन्म : २३ जुलै १९३३; - १५ जून २०२०) हे मराठीतील पत्रकार, सुप्रसिद्ध साहित्यिक, कादंबरीलेखक, नाटककार, मराठी चित्रपट कथा-पटकथा-लेखक, अनुवादक आणि चरित्रलेखक होते. नाट्यलेखन, चित्रपट कथा-पटकथालेखन आणि संवाद लेखन करून त्यांनी त्यांच्या चौफेर व्यासंगाने व उपजत प्रतिभेने आपला वेगळा ठसा उमटवला होता. भयकथा, गूढकथा, विज्ञान-काल्पनिका, गूढ कादंबरी, फँटसी असे विविध विषयावरील कथा-कादंबऱ्या स्वरूपातील लेखनासाठी ते वाचकप्रिय होते. १९८० च्या दशकात गाजलेल्या अनेक मराठी चित्रपटांचे ते लेखक होते. त्यांनी किमान पन्नास पुस्तके लिहिली. त्यांची ५०हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

कौटुंबिक पार्श्वभूमी

रांजणकरांना एक मुलगा व एक मुलगी आहे. मुलाचे नाव प्रियदर्शन असून एका मुलीचे ज्योतिष्मती भरडकर आहे.[][]

कारकीर्द

यशवंत रांजणकर यांनी लेखन करण्यास प्रारंभ करण्यापूर्वी काही काळ एका बँकेत नोकरी केली. तेथे ते फार काळ रमले नाहीत. त्यानंतर मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात ते ग्रंथपाल होते. त्यानंतर त्यांनी लोकसत्ता मध्ये ते १९८० च्या दशकात चित्रपट विषयक साप्ताहिक 'लोकरंग'चे कार्यकारी संपादक होते. लोकसत्ता मध्ये त्यांनी वीस वर्षे काम केले.

रांजणकरांच्या हंस-मोहिनी मासिकांत प्रसिद्ध होत असलेल्या कथा व त्यांचे अन्य लेखन खूप लोकप्रिय होते.

रांजणकरांची साहित्य संपदा

वृत्तपत्रातील सदरे

  1. अ-पूर्व चित्रलेणी (अंतर्नाद १९९६-९७)
  2. सोनाटा (दै. प्रहार)
  3. Best of हॉलीवूड-निर्मितीकथा आणि रसास्वाद ('सोनाटा ' सदराचे पुस्तक, २-३ लेख नव्याने समाविष्ट)

चरित्रे

  1. आल्फ्रेड हिचकॉक : द मॅन हू न्यू टू मच (चरित्र)
  2. लॉरेन्स ऑफ अरेबिया-जिवंतपणीच आख्यायिका बनलेल्या एका कलंदराचं चरित्र
  3. व्हाॅल्ट डिस्ने- द अल्टिमेट फॅण्टसी (चरित्र)

नाटके

  1. गर्भश्रीमंत

कादंबऱ्या

  1. ऐश्वर्यकुंड
  2. कजलीचंदा
  3. कालकन्यका
  4. खानदान
  5. घातचक्र
  6. चण्डिमठ
  7. चेतन चक्रवर्ती
  8. जिद्द
  9. तर्जनी
  10. नकटीच्या लग्नाला (?)
  11. नो-एक्झिट
  12. पंचरंग
  13. पाऊण लाखाची गोष्ट
  14. त्रिज
  15. धाकटी सून
  16. नंदिनी
  17. नवलनगरी
  18. पंचरंग
  19. पिशाच्चवधू
  20. बैरागपाडा
  21. भैरवगड
  22. मर्दाची कहाणी
  23. मुकाबला
  24. मैफल
  25. रत्नदीप
  26. रवींद्रजीवन
  27. रांजणवाडा
  28. रात्र संमोहिनी
  29. रुद्रतक्षक
  30. रुद्रप्रहार
  31. वेताळकोठी
  32. वृश्चिकमुद्रा
  33. वृश्चिकसंहिता
  34. शतानिक
  35. शेवटचा दिस
  36. श्वेतरेखा
  37. सापळा
  38. सुकन्या
  39. सिकंदर शह
  40. सूडसंभ्रम
  41. सौदा
  42. क्ष
  43. ज्ञात-अज्ञात
  44. कालनिद्रा (दोन कादंबऱ्या एकत्रित)
  45. त्रिशूळ (तीन कादंबऱ्या एकत्रित)

चित्रपट लेखन

रांजणकर यांची कथा, पटकथा, संवाद असलेले काही महत्त्वाचे चित्रपट :-[]

  1. ते माझे घर (१९६३)
  2. करावे तसे भरावे (१९७५)
  3. शिक्का (१९७६)
  4. शापित (मराठी चित्रपट)(१९८२)
  5. अर्धांगी (१९८५)
  6. खरा वारसदार (१९८६)
  7. धाकटी सून (१९८६)
  8. कशासाठी प्रेमासाठी (१९८७)
  9. सर्जा (१९८७)
  10. आई पाहिजे (१९८८)
  11. झाकली मूठ सव्वा लाखाची (१९८९)
  12. जीवसखा (१९९१)

निधन

मुंबईतल्या हीरानंदानी रुग्णालयात १५ जून २०२० रोजी यशवंत रांजणकरांचे वृद्धापकाळाने निधन झाले.[][]

रांजणकरांचे योगदान

"रांजणकरांचे नेमके योगदान काय?' असा प्रश्न उपस्थित केल्यास भयकथा, गूढकथा, विज्ञान-काल्पनिका, गूढ कादंबरी, फँटसी अशा विविध विषयांवरील कथा-कादंबऱ्या लिहिणारी बाबुराव अर्नाळकर, रत्नाकर मतकरी, नारायण धारप, चंद्रकांत काकोडकर, गजानन क्षीरसागर अशा लोकप्रिय लेखकांच्या परंपरेतल्या रांजणकरांचा समावेश ‘टॉप टेन’ मध्ये होतो, असे मत 'अक्षरनामा' या मराठी वृत्तसंकेतस्थळाचे संपादक राम जगताप व्यक्त करतात. हिचकॉक, वॉल्ट डिस्ने आणि लॉरेन्स यांची चरित्रे आणि इंग्रजी क्लासिक सिनेमांविषयीची ‘अ-पूर्व चित्रलेणी’ आणि ‘BEST OF हॉलीवूड’ ही पुस्तके रांजणकरांच्या एकंदर लेखकीय कारकिर्दीतला सर्वोच्च आविष्कार आहे. या पुस्तकांची निर्मिती, त्यांचा लेखनदर्जा यांचे साहित्यिक मूल्य अनोखे आहे. ‘लोकसत्ता’मध्ये असताना, विशेषतः रविवार पुरवणीचे संपादन पाहत असताना त्यांनी अनेक कल्पक प्रयोग केले.

धारावाहिक कादंबरीचे लेखनतंत्र

रांजणकरांनी अंदाजे सात ‘धारावाहिक कादंबऱ्या’ लिहिल्या आहेत. २०१० साली प्रकाशित झालेली त्यांची ‘बैरागपाडा’ ही बहुधा शेवटची ‘धारावाहिक कादंबरी’ असावी. हा वाङ्मयप्रकार हाताळणाऱ्या मराठी कादंबरीकारांच्या पिढीचेही ते बहुधा शेवटचे प्रतिनिधी असावेत. ‘बैरागपाडा’ या कादंबरीला लिहिलेल्या प्रस्तावनेत त्यांनी ‘धारावाहिक कादंबरी’विषयी लिहिले आहे.[] ते म्हणतात,

"केवळ पुस्तकासाठी किंवा नियतकालिकाच्या एकाच अंकात पूर्णपणे देण्यासाठी लिहिलेली कादंबरी आणि धारावाहिक कादंबरी या दोहोंच्या लेखनतंत्रांत मोठाच फरक आहे. पहिल्या प्रकारातली कादंबरी संपूर्ण लिहून झाल्यावरच प्रसिद्ध होत असल्यानं त्या लेखनात वारंवार बदल करता येणं, त्याचं पुनर्लेखन करता येणं, लेखन अखेरच्या टप्प्यात येत असताना आरंभीच्या प्रकरणांतील काही भाग विसंगत वा जाचक वाटल्यास तो पुढील कथा-विकसनाशी सुसंगत वा रद्द करता येणं शक्य असतं. म्हणजेच अशा लेखनावरून, ते प्रसिद्धीस पाठवेपर्यंत पुनःपुन्हा हात फिरवता येणं लेखकाला शक्य होतं.

धारावाहिक कादंबरीच्या लेखकाला मात्र या सुविधेपासून वंचित राहावं लागतं. हे लेखन क्रमश: प्रसिद्ध होत असलं तरी त्याची एकूण जातकुळी एखाद्या सदराच्या लेखनाहून पार वेगळी आहे. सदरासाठी दर आठवड्याला एक योग्य विषय मिळेपर्यंत काय ती मनाची उलघाल. त्या विषयावर एकदा लिहिलं, की नंतर त्याचा विचार करण्याची वा संदर्भ लक्षात ठेवण्याची सहसा आवश्यकता भासत नाही. परंतु धारावाहिक कादंबरीचं तसं नसतं. त्यातही रहस्य, भय, संदेह, थरार, अदभुत असे घटक असलेल्या धारावाहिक कादंबरीच्या लेखनाचं तंत्र, तसंच लेखनप्रक्रियाही वेगळीच असते.

धारावाहिक कादंबरी-लेखन करण्यात एक अनोखा थ्रिल अनुभवायला मिळतो. आणि त्यातला आनंदही काही वेगळाच असतो. सुप्रसिद्ध जादूगार हौदिनी याला साखळदंडांनी जखडून एका लोखंडी पेटीत कुलूपबंद करून ती समुद्रात वा मोठ्या जलाशयात सोडत आणि तो मग अवघ्या काही मिनिटांतच आपली मुक्तता करून घेऊन पाण्यातून सुखरूप बाहेर येई, असं सांगतात. धारावाहिक कादंबरीकाराचं काहीसं असंच असतं. फरक एकच : जादूगाराला इतर लोक जखडून टाकत, तर इथं कादंबरीकाराला स्वतःच स्वतःच्या कोड्यांनी स्वतःलाच जखडून त्यांतून सहीसलामत बाहेर यायचं असतं. आणि विशेष हे की, ती कोडी टाकण्याच्या वेळी किंवा नंतरही काही काळ त्याला त्यांच्या उलगड्याची काहीच कल्पना नसते.

वाचकाची उत्कंठा ताणून धरण्याकरिता वेळ मारून नेण्यापुरती गूढ, संदेह, रहस्य, भय, थरार यांची निर्मिती एक वेळ सोपी असेल; पण पुढं ते सारं नीट किनाऱ्याला लावणं हे खरं कसोटी पाहणारं असतं. त्याकरता लेखनाच्या किमान उत्तरार्धाच्या टप्प्यापासून तरी पुढचा विचार करताकरताच पूर्वार्धातील कोणते प्रश्न वा कोडी वाचकासाठी (आणि स्वतःसाठीही) अनुत्तरित राहिली आहेत, याचा सतत धांडोळा घेत राहणं फार गरजेचं असतं. अशा प्रकारच्या लेखनालाही त्याचं असं एक ‘लॉजिक’ असतंच. आणि त्याला धरूनच कादंबरी संपवण्याआधी उपरिनिर्दिष्ट गोष्टींची प्रयोजनं स्पष्ट व्हावयास हवीत. त्यांचे धागेदोरे हवेत अधांतरी ठेवून चालणार नाही. तसं केल्यास कादंबरी तर बिघडतेच; पण त्याहूनही मुख्य म्हणजे ती वाचकाची फसवणूक आणि त्याच्या सुजाणतेचा अपमानही ठरते."[]

पुरस्कार

यशवंत रांजणकरांचे ‘गर्भश्रीमंत’ हे नाटक त्याकाळी खूपच गाजले होते. ह्या नाटकासाठी, अर्धांगी (१९८५) चित्रपटाच्या पटकथेसाठी, तसेच 'अ-पूर्व चित्रलेणी' व 'वॉल्ट डिस्ने- द अल्टिमेट फॅण्टसी' या चरित्र लेखनासाठी महाराष्ट्र राज्य शासनाने पुरस्कार प्रदान करून रांजणकरांच्या कार्याचा गौरव केला. व्हाॅल्ट डिस्ने- द अल्टिमेट फॅण्टसी'ला महाराष्ट्र राज्य शासनाचा २००९चा 'उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती'साठीचा लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार लाभला.[]

हेही वाचा

  • यशवंत रांजणकर : ‘धारावाहिक कादंबरी’लेखन करण्यात एक अनोखे थ्रिल अनुभवायला मिळाले. आणि त्यातला आनंदही काही वेगळाच असतो.[]
  • राम जगताप : यशवंत रांजणकर हा हॉलवुडविषयीचे गारूड उकलून सांगणारा चरित्रकार आणि आस्वादक चित्रपटसमीक्षक होता.[]

हे सुद्धा पहा

  • चित्तरंजन तोषक यशवंत रांजणकर - पूर्वार्ध[१०]
  • चित्तरंजन 'तोषक ' यशवंत रांजणकर-उत्तरार्ध[११]

संदर्भ

  1. ^ "यशवंत रांजणकर यांचे निधन". Navshakti (इंग्रजी भाषेत). 2020-06-16. 2020-06-20 रोजी पाहिले.[permanent dead link]
  2. ^ News, Loktantra (2020-06-17). "ज्येष्ठ साहित्यिक, चित्रपट पटकथाकार यशवंत रांजणकर यांचे निधन ..." लोकतंत्र (इंग्रजी भाषेत). 2020-06-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-06-20 रोजी पाहिले.
  3. ^ Correspondent, Our. "Screenwriter, author, journalist, columnist Yashwant Ranjankar dies at 87". Cinestaan. 2020-06-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-06-16 रोजी पाहिले.
  4. ^ "ज्येष्ठ साहित्यिक यशवंत रांजणकर यांचे निधन | eSakal". www.esakal.com. 2020-06-16 रोजी पाहिले.
  5. ^ "Screenwriter, author, journalist, columnist Yashwant Ranjankar dies at 87 - Cinestaan". Dailyhunt (इंग्रजी भाषेत). 2020-06-20 रोजी पाहिले.
  6. ^ a b "'धारावाहिक कादंबरी'लेखन करण्यात एक अनोखा थ्रिल अनुभवायला मिळतो. आणि त्यातला आनंदही काही वेगळाच असतो". www.aksharnama.com. 2020-06-23 रोजी पाहिले.
  7. ^ "राज्य वाङ्मय पुरस्कार जाहीर". Maharashtra Times. 2020-06-20 रोजी पाहिले.
  8. ^ "'धारावाहिक कादंबरी'लेखन करण्यात एक अनोखे थ्रिल अनुभवायला मिळाले. आणि त्यातला आनंदही काही वेगळाच असतो". www.aksharnama.com. 2020-06-20 रोजी पाहिले.
  9. ^ "यशवंत रांजणकर : हॉलिवुडविषयीचं गारूड उकलून सांगणारा चरित्रकार आणि आस्वादक चित्रपटसमीक्षक". www.aksharnama.com. 2020-06-20 रोजी पाहिले.
  10. ^ "चित्तरंजन तोषक -#यशवंत रांजणकर# - पूर्वार्ध". युट्युब. २० जून २०२०.
  11. ^ "YouTube". www.youtube.com. 2020-06-20 रोजी पाहिले.