Jump to content

यशवंत दिनकर फडके

यशवंत दिनकर फडके
जन्म नाव यशवंत दिनकर फडके
जन्मजानेवारी ३, १९३१
सोलापूर, महाराष्ट्र, भारत
मृत्यूजानेवारी ११, २००८
मुंबई, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्वभारत भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य, इतिहास
भाषामराठी
साहित्य प्रकार चरित्रलेखन
विषय इतिहास
प्रसिद्ध साहित्यकृती विसाव्या शतकातील महाराष्ट्र
स्वाक्षरीयशवंत दिनकर फडके ह्यांची स्वाक्षरी

यशवंत दिनकर फडके (साधारणपणे यदि म्हणून ओळखले जाणारे) (जन्म : सोलापूर, ३ जानेवारी १९३१; - ११ जानेवारी २००८) हे एक मराठी चरित्रलेखक, इतिहाससंशोधक होते. ते २००० साली बेळगाव साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.

जीवन

फडक्यांचे वडील स्वातंत्र्य चळवळीत उतरले होते. स्वातंत्र्य चळवळीमुळे वडिलांचे कुटुंबाकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे फडक्यांना शिक्षणासाठी बरीच धडपड करावी लागली. सोलापुरातील ’हरिभाऊ देवकरण हायस्कूल’ शाळेत त्यांचे शालेय शिक्षण झाले. हे शिक्षण चालू असताना त्यांनी द्वा.भ. कर्णिकांच्या ’संग्राम’ वृत्तपत्रातून त्यांनी लेखनही केले. १९४७ साली मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर महाविद्यालयीन शिक्षणाकरता ते पुण्यास गेले. राज्यशास्त्र हा विषय घेऊन पुणे विद्यापीठातून त्यांनी १९५१ साली बी.ए. व १९५३ साली एम्‌.ए. या पदव्या मिळाल्या. पुढे १९७३ साली ते मुंबई विद्यापीठाचे पीएच्‌.डी.धारक झाले.

वाद प्रतिवाद

१९७० ते १९९७ ह्या थोड्या-अधिक कालखंडात यदिंनी खेळलेल्या काही वादांचे संकलन पुस्तकरूपात प्रकाशित झाले आहे. त्या पुस्तकातील वाद वैचारिक आहेत. ते खेळणाऱ्या व्यक्ती विद्याव्यासंगी आहेत. फक्त त्यांचे दृष्टिकोन भिन्न आहेत. वाद हे भारतीय संस्कृतीला नवीन नाहीत. द्वैत, द्वैताद्वैत, चार्वाक इत्यादी वाद पूर्वी खेळले गेले. साहित्यिक वादही खेळले गेले. वेगवेगळ्या राजकीय भूमिका असलेले वाद नित्य खेळले जात असतातच. वाचन व व्यासंग यामुळेच या वादांत भाग घेणाऱ्या व्यक्ती एकमेकांसमोर ठाकल्या. त्यांचे व्यवसाय भिन्न आहेत. मात्र विचारांचा मुकाबला विचारानेच करायचा हा विचार यामध्ये ठाम दिसून येतो. डॉ. अरुण टिकेकरांनी हंटरवाले फडके हे मार्मिक विशेषण यदिंसाठी वापरले आहे. या वादात उत्तरे प्रत्युत्तरे झडली. कधी लिहिणाऱ्यांचा तोल गेला. मात्र त्यांतून त्या त्या विषयाचे भिन्न पैलू जसे समोर आले तसेच वाद खेळणाऱ्यांचे वादकौशल्यही प्रकट झाले. 'वाद प्रतिवाद-य.दि. फडके' हे वेगळ्या पठडीतले पुस्तक या संकलनातून सिद्ध झाले आहे.पुस्तकाचे संपादन डाॅ. वासंती फडके यांनी केले आहे. प्रकाशक - अक्षर प्रकाशन.

प्रकाशित साहित्य

चरित्रलेखन

  • अण्णासाहेब लठ्ठे (१९९०)
  • आगरकर (१९९६)
  • र. धों. कर्वे (१९८१)
  • केशवराव जेधे (१९८२)
  • कहाणी नेताजींची भाग १,२.
  • न्यायालयात मधु लिमये
  • राष्ट्रपती डाॅ. राजेंद्रप्रसाद ते प्रतिभाताई पाटील (२०१७)
  • लोकमान्य टिळक आणि क्रांतिकारक (१९८५)
  • विष्णूशास्त्री चिपळूणकर (१९८६)
  • शाहू छत्रपती आणि लोकमान्य
  • शोध : बाळगोपाळांचा (१९७७)
  • शोध सावरकरांचा (१९८४)
  • कहाणी सुभाषचंद्रांची (१९९४)
  • सेनापती बापट (१९९९)

ऐतिहासिक

  • डॉ. आंबेडकर आणि काळाराम मंदिर सत्याग्रह (१९८६)
  • डॉ. आंबेडकर आणि इंडियन नॅशनल काँग्रेस (१९८६)
  • डॉ. आंबेडकरांचे मारकरी : अरुण शौरी (१९९९)
  • Constitution of India (इंग्रजी, सहलेखक -राजन श्रीनिवासन (१९८०)
  • Politics and Language (इंग्रजी, १९८०)
  • विसाव्या शतकातील महाराष्ट्र (१९०१ ते १९६३) - खंड १ ते ८
  • स्वातंत्र्य आंदोलनातील मुसलमान

ललित/वैचारिक/माहितीपर

  • आजकालचे राजकारणी
  • आंबेडकरी चळवळ
  • केला धर्माचा लिलाव
  • खरी ही न्यायाची रीति
  • जम्मू -काश्मीर : स्वायत्तता की स्वातंत्र्य?
  • दृष्टादृष्ट (१९९२)
  • नथुरामायण
  • नाही चिरा नाही पणती (२०००)
  • पक्षांतराचे राजकारण
  • पुरस्कारांचे राजकारण (राजकीय)
  • भारतीय नागरिकत्व
  • माहितीचा अधिकार
  • मुंबईचे खरे मालक कोण? (सहलेखिका - डाॅ. वासंती फडके)
  • लोकसभा निवडणुका
  • विसाव्या शतकातील महाराष्ट्र : खंड १ ते ८
  • व्यक्ती आणि विचार
  • व्यक्तिरेखा (१९९८)
  • शोधता शोधता (संदर्भग्रंथ)१९९५)
  • समान नागरी कायदा
  • संसद : तेव्हा आणि आत्ता
  • स्मरणरेखा (१९९८)

य.दि. फडके यांच्याविषयीची पुस्तके

  • आधुनिकता आणि परंपरा - एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र : प्रा. य.दि. फडके गौरवग्रंथ (२०००) - संपादक राजेंद्र व्होरा
  • वाद प्रतिवाद - य.दि. फडके (संपादक -डाॅ. वासंती फडके)

हेही वाचा

बाह्य दुवे