Jump to content

म.का. राजवाडे

म.का. राजवाडे (१९२२-२०१६) हे एक पुण्यातले उद्यानतज्ज्ञ होते.

राजवाडे यांचा जन्म काकती (बेळगाव) येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण सांगली येथे झाले. मृद्‌संधारण या विषयात पदविका घेतल्यानंतर १९४८ मध्ये त्यांनी तेव्हाच्या मुंबई सरकारमध्ये कामाला सुरुवात केली.

राजवाड्यांनी १९५० ते ५८ या काळात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील सगळ्या बगिचांचे व वृक्षलागवडीचे काम केले. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर राजवाडे यांची नियुक्ती सिंहगड परिसराचे सुशोभीकरण व इतर काही प्रकल्पांसाठी झाली.

पुढे १९६५मध्ये सरकारी नोकरी सोडून राजवाडे यांनी स्वतंत्र व्यवसायाला सुरुवात केली. त्यासाठी त्यांना त्या काळातील ज्ञानवृद्ध उद्यानतज्ज्ञ भा.वि. भागवत यांचे मार्गदर्शन लाभले. पंचेचाळीस वर्षांच्या कारकिर्दीत राजवाडे यांनी अनेक संस्था, उद्योगांमधील बगिचे विकसित केले तसेच वृक्षलागवड करून परिसर हिरवे केले.

पुण्यातील टाउन हॉल कमिटी, डेक्कन क्लब, हिराबाग या जुन्या संस्थांमध्ये मानद सचिव, अध्यक्ष अशा पदांवर राजवाडे यांनी काम केले होते.