Jump to content

मोलियेर

मोलियेर
Molière
जन्मजानेवारी १५, इ.स. १६२२
पॅरिस
मृत्यूफेब्रुवारी १७, इ.स. १६७३
पॅरिस
राष्ट्रीयत्व फ्रेंच
पेशा नाटककार, अभिनेता

ज्यां-बाप्तिस्ते पोकेलिन (फ्रेंच: Jean-Baptiste Poquelin; जानेवारी १५, इ.स. १६२२ - फेब्रुवारी १७, इ.स. १६७३; टोपणनावः मोलियेर) हा एक फ्रेंच नाटककार व अभिनेता होता. मोलियेरला पश्चिमात्य विनोदामधील सर्वोत्तम कलाकारांपैकी एक मानले जाते.

【【मराठीत मोलिअर】]

‘समाजस्वाथ्य’कार रघुनाथ धोंडो कर्वे यांनी फ्रेंच नाटककार मोलिअर यांच्या एका नाटकाचे (Tartuffe) रूपांतर मराठीत केले आहे! मोलिअर यांचे ते नाटक फ्रेंच रंगभूमीवर 1664 मध्ये प्रथम आले. र. धों.नी स्वतः त्याचे रूपांतर 1937 साली प्रकाशित केले. प्रस्तावनेत ते सांगतात, की हस्तलिखित त्यांच्याकडे अठरा वर्षें पडून होते. कोणी तरी त्यांच्याकडे क्लबात करण्यासारखे एखादे नाटक आहे का अशी विचारणा केली तेव्हा त्यांनी ते हस्तलिखित पृच्छा करणाऱ्याला दाखवले. परंतु त्याचा प्रयोग झाला नाही. मात्र ‘संबंधितांनी ते एखाद्या नाटिकाकंपनीने करण्याजोगे आहे असा अभिप्राय दिल्यामुळे ते छापून तरी काढावे’ या उद्देशाने कर्वे यांनी स्वतः ते प्रकाशित केले. त्याची किंमत आठ आणे एवढी ठेवली होती. त्या नाटकाचे नाव ‘गुरूबाजी’.

नाटकाच्या नावावरून ते दांभिक गुरूसंबंधी असावे असा एक अंदाज वाचक बांधू लागतो. तो तसा चुकीचा नाही. ते नाटक रूपांतरीत झाले ते मूळ लिहिल्यानंतर दोनशेपन्नास वर्षांनी व तेही फ्रेंच नाटकावरून असे लक्षात घेतले तर मराठीमधील ‘बुवा तेथे बाया’ या नाटकातील गुरूच्या ठिकाणी त्या काळी चर्चमधील धर्मोपदेशक होता हे सुसंगत वाटते.

मराठीत ‘बुवा तेथे बाया’ लोकप्रिय झाले, तर मोलिअर यांच्या नाटकाला तेथे प्रचंड विरोध झाला व तो धर्मगुरूंकडून. तितकेच नव्हे, तर मोलिअर यांच्या नाटकांपैकी सर्वात जास्त वादळ उठले ते त्या नाटकामुळे. त्यामुळे त्या नाटकाचे प्रयोग पहिली तीन वर्षें तुरळक होत असत. मॉलिअर यांनी संहितेत फेरफार 1667 मध्ये केले - मूळ तीन अंकी असलेले नाटक पाच अंकी केले. कर्वे यांनी रूपांतर केले ते त्या दुसऱ्या संहितेचे असावे असे इंग्रजी संहिता वाचल्यावर दिसते. नाटककाराने त्याच्या प्रस्तावनेत त्यासंबंधी काही तपशील दिलेले नाहीत.

नाटकात केंद्रीय भूमिकेत एक गुरू आहे. एका सुखवस्तू जमीनदाराने त्याला त्याच्या घरी आणून बसवले आहे. जमीनदाराला सुस्वरूप अशी दुसरेपणावर आलेली बायको आणि पहिल्या बायकोची दोन मुले आहेत. जमीनदाराने त्यांपैकी त्याच्या मुलीचे लग्न तिच्या प्रियकराशी लावून देण्याचे त्याने वचन दिले होते, परंतु तो गुरूच्या नादी लागल्यावर त्याने त्याचे वचन बदलून तिचे लग्न गुरूशी लावून देण्याचा निर्णय जाहीर केला. मुलगी त्यासाठी अर्थात तयार होत नाही, परंतु त्याच वेळी तिच्यात वडिलांच्या विरोधात जाण्याचे बळही नसते. पण घरची मोलकरीण जमीनदाराची कानउघाडणी करते, इतरही लोक तसा प्रयत्न करतात, पण व्यर्थ. गुरू जमीनदाराच्या पत्नीवरच नजर ठेवून असतो. पत्नी त्याचा पर्दाफाश करते. जमीनदाराला त्याची चूक कळते, पण त्यासाठी फार उशीर झालेला असतो. कारण पर्दाफाश होण्यापूर्वीच, जमीनदाराने त्याची सर्व संपत्ती - घरासकट गुरूच्या नावे केलेली असते. गुरू जमीनदाराला घराबाहेर काढण्यासाठी बेलीफ आणतो. जमीनदाराने गुरूच्या हाती विश्वासाने एक कागद सोपवलेला असतो त्यावरून जमीनदाराचे संबंध बंडखोरांशी आहेत असे राजाला वाटते -(तो कागद गुरूनेच राजाला दिलेला असतो)- त्यामुळे शिपाई जमीनदाराला अटक करण्यास येतात. अखेर चमत्कार व्हावा तसे गुरूचे खरे रूप उघडकीला आल्याने राजा जमीनदाराची सुटका, त्याची अगोदरची राजनिष्ठा लक्षात घेऊन करतो. म्हणजे जे नाटक शोकांतिका होणे स्वाभाविक असे वाटते ते सुखांत होते.

कर्वे यांना तो अनपेक्षित शेवट पटला होता की नाही ते सांगता येणार नाही. तो त्यांनी स्वीकारला हे महत्त्वाचे. त्याच प्रमाणे त्यांनी मूळ नाटकाचे रूपांतर करताना शब्द इतके नेमके वापरले आहेत की नाटक पाच अंकी असूनही कंटाळवाणे होत नाही. मोलकरणीने जमीनदाराचे मन वळवण्याचा केलेला प्रयत्न वाखाणण्यासारखा आहे. तसेच, तिने जमीनदाराची मुलगी व तिचा प्रियकर यांचे मिलन घडवून आणण्यासाठी योजलेले स्वभावस्वरूपाचे ज्ञान लक्षणीय आहे. मूळ इंग्रजी संहिता वाचली की कर्वे यांचे रूपांतराचे कौशल्य मनावर जास्त ठसते. मूळ नाटकात असलेली जमीनदाराची आई - तीही गुरूचा पक्ष धरणारी - रूपांतरातही आहे. तिचे मतपरिवर्तन जरा अचानकच झाले आहे असे दिसते, पण त्याला रूपांतरकाराचा नाईलाज होता. रूपांतराचा एक उत्तम आविष्कार असे या नाटकाचे वर्णन करता येईल. संदर्भ:- (मुकुंद वझे-थिंक महाराष्ट्र)


बाह्य दुवे

  • "मोलियेर - व्यक्तीचित्र" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)