मोनिका गजेंद्रगडकर
मोनिका गजेंद्रगडकर (जन्म : ९ ऑक्टोबर १९६५). या मराठी लेखक कै. विद्याधर पुंडलिक यांच्या कन्या. त्या एम.ए. एम.फिल. आहेत.
कारकीर्द
महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सकाळ इत्यादी वृत्तपत्रांतून स्तंभ लेखिका म्हणून तसेच 'लोकप्रभा'सारख्या नियततालिकांमधून आणि विविध दिवाळी अंकांमधून त्यांनी विपुल कथालेखन केले आहे. इ.स. १९९५ सालापासून त्यांच्या कथा दिवाळी अंकात सातत्याने प्रकाशित होत आहेत. इ.स. १९९४पासून मोनिका मौज प्रकाशन गृहात साहाय्यक-संपादक होत्या आणि आता मौज दिवाळी अंकासह त्या मुख्य संपादक आहेत. मौज प्रकाशनाने इ.स. २००४मध्ये त्यांचा पहिला कथासंग्रह 'भूप' हा प्रकाशित केला. त्यानंतर इ.स. २००८मध्ये 'आर्त', २०११मध्ये `शिल्प’ तर २०२१मध्ये आलेला `त्रिपर्ण’ हा दीर्घ कथांचा संग्रह असे त्यांचे मराठी साहित्य विश्वात स्वतःचं स्वतंत्र स्थान निर्माण केलेले आणि समीक्षक, जाणकार वाचकांकडून नावाजले गेलेले त्यांचे कथासंग्रह. 'आर्त' कथासंग्रहातून त्यांनी वेगवेगळ्या स्तरातील माणसांच्या जगण्यातील विकलता समोर आणली आहे. सूचक, संयत आणि अकृत्रिम शैली हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य आहे. व्याकुळता हीच त्यांच्या कथांचा गाभा आणि सौंदर्य ठरले आहे तर 'भूप' या पहिल्याच वेचक दीर्घकथांच्या संग्रहात लेखिकेने नातेसंबंधांचा विविध अंगांनी वेध घेतला आहे. त्यांच्या कथा स्त्रीकेंद्रीत आहेत परंतु त्यामध्ये स्त्रीवादाचा तीव्र आक्रोश नाही. धर्म, कला, वर्ण अशा विविध स्तरांवरून माणसांच्या जगण्यात निर्माण होत गेलेले ताण, त्यामुळे निर्माण होणारी आर्तता ह्या कथांमधून सामोरी येते. कथांनुभवांचे विविध पदर अस्सलपणे आणि तितक्याच सूक्ष्मपणे उलगडणारी त्यांची कथा माणसांच्या माणूसपणाचा अथांग वेध घेताना दिसते. माणसांच्या वेदनांचे ती संयतपणे अर्थसूचन करते म्हणून त्यांची कथा अंतर्मुखतेचा प्रत्ययही देते.
२०१५मध्ये मौज प्रकाशनानेच त्यांची `उगम’ ही कादंबरी प्रकाशित केली. या कादंबरीला ख्रिश्चन धर्माची व्यापक पार्श्वभूमी लाभली आहे. स्त्रीच्या मातृत्व शक्तीचा आणि तिच्यातील सर्जनशीलतेच्या अनुबंधाचा शोध मांडणारी त्यांची ही कादंबरीही लक्षवेधी ठरली.
यानंतर २०२२मध्ये शब्दांचा झुला’ हा त्यांचा आगळा वेगळा ललित लेखसंग्रहही ग्रंथालीकडून प्रकाशित झाला. यातील लेखांमध्ये आयुष्यातल्या छोट्या छोट्या पण उत्कट क्षणांची कलात्मक आणि चिंतनशील भावस्पंदनं टिपलेली जाणवतात.
मोनिका गजेंद्रगडकर यांच्या विविध कथांचे हिंदी, कोंकणी, कानडी, गुजराती, उडिया आणि इंग्रजी भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. त्यांना आजपर्यंत महत्त्वाचे असे पस्तीसहून अधिक पुरस्कार लाभले आहेत. यामध्ये महाराष्ट्र शासन पुरस्कार, प्रिय जीए कथापुरस्कार, प्रियदर्शनी अकादमीचा राष्ट्रीय पुरस्कार, अण्णाभाऊ साठे साहित्य रत्न पुरस्कार, पहिला राजाराम बापू पाटील ललित अकादमी राष्ट्रीय पुरस्कार तर उत्कृष्ट संपादनासाठी प्राप्त झालेला पहिला पुण्यभूषण पुरस्कार यांचा समावेश आहे. एस.एन.डी.टी. कॊलेजच्या स. गं. मालशे संशोधन वृत्तीच्याही त्या मानकरी आहेत. याशिवाय साहित्य संस्कृती मंडळाचं सदस्यत्व, जनस्थान पुरस्कार निवड समिती, जीए कुलकर्णी अनुवाद पुरस्कार, मुंबई मराठी साहित्य संघ नियमक मंडळ आदी समित्यांवर त्यांची नियुक्ती झालेली आहे. २०२२ च्या को. म.सा.प. महिला साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या. शिवाय त्या उत्कृष्ट सतार वाजवतात.
मोनिका गजेंद्रगडकर हे आजच्या लिहित्या कथाकारांपैकी एक महत्त्वाचे नाव आहे. अनेक सभा-संमेलनांत आणि दूरचित्रवाणीच्या कार्यक्रमांत त्यांचा सहभाग असतो. मोनिका गजेंद्रगडकर कथालेखनाव्यतिरिक्त नाट्यविषयक आणि समीक्षणात्मक लिखाण करतात.
'बापलेकी' या विद्या विद्वांस, दीपा गोवारीकर आणि पद्मजा फाटक यांनी संपादित केलेल्या पुस्तकातल्या लेखात, मोनिकाबाईंनी आपल्या अश्विन नावाच्या भावाचा अपघाती मृत्यू ज्या दिवशी झाला, त्या दिवसाबद्दल आणि त्या दुर्दैवी घटनेचा वडील-लेकीच्या नात्यावर झालेल्या परिणामांबद्दल लिहिले आहे.
मोनिका गजेंद्रगडकर यांच्या भूप या कथेवर आधारीत जगणे व्हावे गाणे हे मंदार जोशी यांनी लिहिले नाटक आहे. नाट्यसंपदाने ते नाटक रंगभूमीवर २०१३मध्ये आणले होते. त्या नाटकासाठी सुधीर मोघे यांनी ११ गाणी लिहिली होती. नाटकाचे संगीत दिग्दर्शन पं. रघुनंदन पणशीकर यांचे होते. ही गाणी म्हणजे कै. सुधीर मोघे यांची अखेरची काव्यरचना होती.
साहित्य
- भूप (कथासंग्रह २००४)
- आर्त (कथासंग्रह २००८)
- शिल्प (कथासंग्रह २०११)
- त्रिपर्ण (दीर्घ कथासंग्रह २०२२)
- उगम (कादंबरी, २०१५)
- शब्दांचा झुला (ललित लेख संग्रह २०२२)
मोनिका गजेंद्रगडकर यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान
- अण्णाभाऊ साठे साहित्य रत्न पुरस्कार
- कथाकार अ.वा. वर्टी पुरस्कार
- गदिमा प्रतिष्ठानचा चैत्रबन पुरस्कार (२०११)
- दैनिक सकाळची कथा पारितोषिके (१९९५-१९९७)
- नागपूरच्या विदर्भ साहित्त्य संघाचा शांताराम कथा पुरस्कार
- मराठी कथा साहित्यातील योगदानाबद्दल २५ हजार रुपयांचा प्रियदर्शनी साहित्य पुरस्कार (२५ जून २०१०)
- मराठी साहित्य संघाचा आश्वासक कथाकार पुरस्कार
- महाराष्ट्र साहित्य परिषदेचा २००० सालचा उत्कृष्ट कथेसाठीचे दि.य. सोनटक्के पारितोषिक
- 'शिल्प' या कथासंग्रहास महाराष्ट्र राज्य सरकारचा दिवाकर कृष्ण पुरस्कार (२०१३)
- स.गं. मालशे संशोधनवृत्तीच्या मानकरी
- सोलापूरचा भैरूरतन दमाणी पुरस्कार मोनिका गजेंद्रगडकर यांच्या शिल्प या कथासंग्रहास जाहीर झाला आहे.
संदर्भ
- महाराष्ट्र साहित्य पत्रिका, अंक ३४०, एप्रिल ते जून २०१२
- मोनिका-गजेंद्रगडकर Archived 2016-04-11 at the Wayback Machine.