Jump to content

मोतू गाय

मोतू गाय हा एक शुद्ध भारतीय गोवंश असून हा मुख्यतः ओरिसातील मलकनगिरी जिल्ह्यातील मोतू, कालीमेला, पोडिया आणि मलकनगिरी भागात आढळणारा बुटका गोवंश आहे. त्यांचे प्रजनन क्षेत्र मलकानगिरी जिल्ह्याच्या दक्षिण भागात तसेच छत्तीसगड आणि आंध्र प्रदेशच्या लगतच्या भागात आहे जेथील जमीन वालुकामय आणि चिकणमातीची आहे.[]

ओरिसातील कोया आदिवासी या जातीच्या विकासासाठी जबाबदार आहेत ज्याला 'देशी' नावाने देखील ओळखले जाते. जरी या जातीचा आकार लहान असला तरी, या मजबूत बांधलेल्या गुरांचा उपयोग डोंगराळ आणि वाळलेल्या प्रदेशात मसुद्यासाठी केला जातो. या जातीला उत्कृष्ट दुष्काळ आणि उष्णता सहन करण्याची क्षमता आहे आणि त्यामुळे हा गोवंश मशागत, दूध आणि खत यासाठी जोपासला जातो. कोया जमातींमध्ये या गुरांच्या संगोपनातून मिळणारे शेण हे महत्त्वाचे उत्पादन मानले जाते.

वैशिष्ट्य

  • मोतू गुरे आकाराने लहान असली तरी त्यांची शारीरिक क्षमता अतिशय मजबूत असते.
  • कातडीचा रंग लालसर तपकिरी आणि काही वेळा राखाडी असतो. अल्प प्रमाणात काही ठिकाणी पांढरा रंग देखील आढळतो.
  • या जातीच्या गोवंशाची शिंगे सहसा खुंटी सारखी लहान असतात. परंतु शिंगे मोठी असतील तर ती काळ्या रंगाची असतात आणि वरच्या दिशेने बाहेर येऊन गोलाकार टोकाने समाप्त होतात.
  • या गोवंशाचे कपाळ सरळ आणि प्रमाणात असते. जबडा आणि खुरांचा रंग काळा असतो.
  • डोळ्यांच्या पापण्या काळ्या रंगाच्या असून, कानाचा आकार मध्यम असतो.
  • गळ पोळी किंवा गळ कंबळ तसेच पाठीवरील वशिंडाचा आकार हा मध्यम असतो.
  • कासेचा आकार लहान आणि वाटोळा गोल असतो. स्तनाग्रे गोलाकार टोकासह दंडगोलाकार असतात.
  • बैलाची सरासरी उंची १०३ सेमी तर गायीची उंची ९९ सेमी पर्यंत असते.
  • बैलाच्या शरीराची सरासरी लांबी १०८ सेमी तर गायीची लांबी १०५ सेमी पर्यंत असते.
  • बैलाचे सरासरी वजन १७२ किलो तर गायीचे १३८ किलो पर्यंत असते.
  • बैलाच्या छातीचा घेर १२८ सेमी तर गायीचा ११६ सेमी असतो.
  • या गोवंशाच्या दोन वेतातील ४२० ते ४३० दिवसांचा कालावधी असतो.
  • दुधामध्ये फॅटचे प्रमाण सुमारे ५% असून दुग्धपानाचा कालावधी सरासरी ५ ते ६ महिने असतो.[]

'राष्ट्रीय डेरी विकास बोर्डाच्या (NDDB)' निकषानुसार हा मशागतीचा गोवंश म्हणून ओळखला जातो.[]

भारतीय गायीच्या इतर जाती

भारतीय गायीच्या इतर विविध जातींची माहिती मिळवण्यासाठी येथे टिचकी द्या ― भारतीय गायीच्या विविध जाती

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ "Breeds of cattle & buffalo" (इंग्रजी भाषेत). ६ जानेवारी २०२२ रोजी पाहिले.
  2. ^ "Motu". saveindiancows.org (इंग्रजी भाषेत). ६ जानेवारी २०२२ रोजी पाहिले.
  3. ^ "Breeds | nddb.coop" (इंग्रजी भाषेत). ६ जानेवारी २०२२ रोजी पाहिले.

बाह्य दुवे