मेरिदा (मेक्सिको)
हा लेख मेक्सिको मधील शहर याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, मेरिदा (निःसंदिग्धीकरण).
मेरिदा हे मेक्सिकोच्या युकातान राज्याच्या राजधानीचे शहर आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ९,७०,३७७ होती तर महानगराची लोकसंख्या १०,३५,२३८ होती. वस्तीनुसार मेरिदा मेक्सिकोतील १२व्या क्रमांकाचे शहर आहे.
युकातान द्वीपकल्पावर मेक्सिकोच्या आखातापासून ३५ किमी आत असलेल्या या शहराची स्थापना इ.स. १५४२ मध्ये फ्रांसिस्को दि मॉंतेहो इ लेऑनने केली. त्याने स्पेनमधील मेरिदा शहराचे नाव नवीन शहरास दिले. त्याआधी आसपासच्या प्रदेशात इच्कांझिहू (पाच टेकड्यांचे शहर) नावाचे माया शहर वजा वस्ती होती. या शहरावर माया संस्कृतीचा मोठा प्रभाव आहे. येथे राहणाऱ्यांपैकी ६०% लोक स्वतःला मायांचे वंशज समजतात. याशिवाय येथे स्पॅनिश, फ्रेंच, ब्रिटिश आणि डच प्रभावही आढळून येतो.