Jump to content

मॅक्सीन बर्नस्टन

मॅक्सीन बर्नसन
जन्म ७ ऑक्टोबर १९३५

डॉ. मॅक्सीन बर्नसन (७ ऑक्टोबर, इ.स. १९३५:एस्कनाबा, मिशिगन, अमेरिका - हयात) या सातारा जिल्ह्यातल्या फलटण येथील प्रगत शिक्षण संस्थेच्या संस्थापिका होत. त्या फलटण, हैदराबाद आणि अमेरिकेत येथे वास्तव्य करतात. त्यांनी वयाच्या ८२व्या वर्षीही त्यांचे भाषा समृद्धी संशोधनाचे कार्य चालू ठेवले आहे.

डॉ. मॅक्सीन बर्नसन यांचा जन्म ७ ऑक्टोबर १९३५ला अमेरिकेतल्या मिशिगन राज्यातील एस्कनाबा येथे झाला. त्यांचे वडील नॉर्वेच्या तर आई फिनलंडच्या विस्थापित कुटुंबातून आल्या होत्या. मिनेसोटाच्या ऑग्सबर्ग कॉलेजमधून बी. ए. केल्यानंतर त्यांनी तेथील शाळेत एक वर्ष इंग्रजी शिकवले आणि त्यानंतर त्यांना न्यू यॉर्क येथील कोलंबिया विद्यापीठातून इंग्रजी विषयात एम्. ए. करण्यासाठी वुड्रो विल्सन फेलोशिप मिळाली. पदवी मिळाल्यानंतर डॉ. बर्नस्टन यांनी आयोवातील डेकोरा येथील ल्यूथर कॉलेजात दोन वर्षे इंग्रजी शिकवले.[][]

बर्नस्टन १९६१ मध्ये प्रथम भारतात आल्या. त्यांनी दोन वर्षे हैदराबादच्या विवेकवर्धिनी कॉलेजात इंग्रजी शिकवले. त्यानंतर त्या अमेरिकेत परतल्या व तेथील पेनसिल्व्हेनिया विद्यापीठात त्यांना भाषाशास्त्र व भारतीय भाषांमध्ये पीएच. डी. करण्यासाठी फेलोशिप मिळाली.[]

१९६६ मध्ये बर्नसन यांना पश्चिम महाराष्ट्रातल्या फलटण तालुक्यातील मराठी बोलीमधील सामाजिक विविधता या विषयावर काम करण्यासाठी फुलब्राइट-हेज फेलोशिप मिळाली. पुढे त्यांना अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन स्टडीज कडून भारतात राहून काम पूर्ण करण्यासाठी फेलोशिपही मिळाली. १९७३ मध्ये त्यांची पीएच.डी. पूर्ण झाली.

भाषाशास्त्रातील संशोधनाबरोबरच डॉ. बर्नसन यांनी त्यांच्या स्नेही जाई निंबकर यांच्यासोबत अमराठी प्रौढांना मराठी शिकवण्यासाठी नऊ पुस्तकांच्या संचावर काम सुरू केले होते. या पुस्तकांमध्ये एक व्याकरणाचे पुस्तक व एक शब्दकोश यांचाही समावेश होता. १९७१ पासून त्यांनी दर वर्षाआड अमेरिकेत जाऊन असोसिएटेड कॉलेजेस ऑफ द मिडवेस्ट इंडिया स्टडीज प्रोग्रॅम अंतर्गत पुण्यात येऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना स्प्रिंग ओरिएन्टेशन कोर्समध्ये मराठी शिकवणे सुरू केले.[] त्यासाठी त्यांनी ग्रामीण आणि शालाबाह्य मुलांसाठी रात्रीची शाळा काढली. या शाळेत मुलांप्रमाणेच स्त्रिया आणि प्रौढही येऊ लागले. सुरुवातीला मुलांना त्यांच्यात्यांच्या बोलीभाषेतून शिकलेली मुले पंचायतीच्या किंवा आणि नगरपालिकेच्या शाळेत जाण्यासाठी तयार झाली की त्यांना प्रमाण मराठी भाषा शिकवायची, अशा रीतेने मॅक्सीनबाईंनी हजारो मुलांना शिक्षणाची गोडी लावली.

एकोणीसशेच्या सत्तरच्या दशकाच्या मध्यातून त्या प्रादेशिक भाषा शालेय शिक्षणाचे माध्यम म्हणून वापरण्याचा पुरस्कार करणारे लेख इंग्रजी व मराठी वर्तमानपत्रांतून लिहू लागल्या. त्या मराठी अभ्यास परिषदेच्या संस्थापकांपैकीही एक होत.

प्रगत शिक्षण संस्थेची स्थापना

१९७८ मध्ये डॉ. बर्नसन यांनी आपले अमेरिकन नागरिकत्व रद्द केले व त्या भारतीय नागरिक बनल्या. त्याच वर्षी आपल्या एका मैत्रिणीबरोबर त्यांनी फलटणच्या दलित वस्तीतील शालाबाह्य मुलांना अनौपचारिकरीत्या शिकवण्यास सुरुवात केली. याच कामाची परिणती पुढे हळूहळू प्रगत शिक्षण संस्थेच्या स्थापनेत झाली.

सन्मान आणि पुरस्कार

  • १९९३ साली डॉ. बर्नसन यांना त्यांच्या भाषा व शिक्षण क्षेत्रातील कामासाठी सातारा येथील अभिजात साहित्य संमेलनात गौरविण्यात आले.
  • सामाजिक क्षेत्रांमध्ये नाविन्यपूर्ण कामगिरी करण्याऱ्याव्यक्तींची आंतरराष्ट्रीय संस्था-अशोका फौंडेशनच्या- त्या आजीव सदस्य आहेत.
  • आपापल्या कार्यासाठी प्रसिद्ध पावलेल्या महाराष्ट्रीय महिलांच्या जीवनाची ओळख करून देणाऱ्या ‘डॉटर्स ऑफ महाराष्ट्र’ या पुस्तकातही डॉ. बर्नसन यांचा समावेश आहे.

संदर्भ

संदर्भसूची

बाह्य दुवे