Jump to content

मृत्यू समीक्षक

कोरोनर अपमृत्युनिर्णेता अधिकारी. अपघात, मारामारी किंवा तत्समान अनैसर्गिक कारणांनी मरण पावलेल्यांची चौकशी फर्माविण्याचा अधिकार अशा अधिकाऱ्याला असतो.

इंग्लंडमध्ये असा अधिकारी फार पूर्वीपासून असावा. अँग्लो-सॅक्सन राजांनी त्याच्या नेमणुकीस सुरुवात केली, असे काहींचे मत आहे. तेराव्या शतकारंभी मात्र कोरोनरचा उल्लेख निश्चितपणे मिळतो. ॲल्फ्रेड राजाच्या वेळी या अधिकाऱ्याची राजा नेमणूक करी, पण पहिल्या एडवर्ड (१२७२–१३००) काळी त्याची निवड होण्यास सुरुवात झाली. आरंभी या अधिकाऱ्याचे काम शांतता राखण्याचे असे. म्हणजे पोलीस सध्या जे काम करतात ते कोरोनर करी पण पुढे कामात बदल होत गेले. आता इंग्लंडमध्ये कोरोनरची कामे पुढीलप्रमाणे आहेत : (१) संशयास्पद, अपघाती वा गुन्ह्याच्या परिस्थितीत घडून आलेल्या मृत्यूची चौकशी. याला मरणान्वेषण म्हणतात. (२) सापडलेल्या धनाची किंवा गुप्तधनाची चौकशी. (३) शेरीफ गैरहजर असेल, तर त्याची कामे करणे व न्यायालयाचे हुकूम बजावणे. (४) लंडन शहरात आग लागल्यास त्या आगीची चौकशी करणे. अमेरिकेतही हा अधिकारी असून त्याची स्थानिक संस्थांतर्फे निवडणूक होते.

भारतात कोरोनरची व्यवस्था फक्त कलकत्ता व मुंबई येथे आहे. हे कोरोनर राज्यसरकार नेमतेपण इंग्लंडमध्ये स्थानिक संस्थांना कोरानर नेमण्याचा अधिकार आहे.

भारतात कोरोनरचा कायदा १८७१मध्ये झाला. कोणाही इसमाचा अपघाती मृत्यू झाला अथवा त्याने आत्महत्या केली किंवा तो तुरुंगात अथवा पोलीसांच्या ताब्यात असताना मरण पावला अथवा त्याचा खून झाला अथवा त्याचा संशयास्पद स्थितीत मृत्यू झाला, अशी बातमी किंवा तक्रार जर कोरोनरकडे गेली, तर तो चौकशीचा हुकूम करतो. ही चौकशी ज्यूरीसमोर कोरोनरच्या न्यायालयात चालते. चौकशीच्या वेळी फौजदारी न्यायालयाला असलेले सर्व अधिकार कोरोनरला असतात. तुरुंगात किंवा पोलीस कोठडीत एखाद्याचा मृत्यू झाला असेल, तर तेथील अधिकाऱ्याने ही वार्ता कोरोनरला कळविली पाहिजे. असे न करणे गुन्ह्यात मोडते. तसेच कोरोनरने चौकशी करू नये, म्हणून प्रेताची विल्हेवाट लावणे हेही गुन्ह्यात मोडते. पुरलेले प्रेत चौकशीसाठी उकरून काढण्याचा हुकूम कोरोनर देऊ शकतो.

चौकशी रविवारी अथवा सुट्टीच्या दिवशीसुद्धा चालू शकते. शवपरीक्षा जरूर आहे, असे वाटल्यास कोरोनर तसा हुकूम देतो. संशयित इसमासही साक्षदेता येते. ज्यूरीला कोरोनरमार्फत साक्षीदारांना प्रश्न विचारता येतात. चौकशी सुरू असता, जर कोरोनरला कळले, की दंडाधिकाऱ्यांपुढे याच विषयांसंबंधी आरोपीवर कारवाई चालू आहे, तर कोरोनर आपली चौकशी स्थगित करून दंडाधिकाऱ्याच्या निकालानंतर ती संपवितो. चौकशीनंतर कोरोनर ज्यूरीला पुराव्याचे समग्र स्वरूप सांगतो व नंतर ज्यूरी मृत्यू कसा झाला याबद्दल आपले मत देते. या मताप्रमाणे संशयिताने गुन्हा केला असे वाटल्यास कोरोनर त्या इसमास अटक करून दंडाधिकाऱ्यापुढे पाठवितो. ज्यूरीचा सभासद गैरहजर राहिला, तर त्याला दंड करण्याचा अधिकार कोरोनरला आहे.