Jump to content

मुरलीधर शाह

डाॅ. मुरलीधर बन्सीधर शहा (जन्म : ३१ ऑक्टोबर १९३७; - धुळे, ९ ऑक्टोबर २०१७) हे एक गांधीवादी हिंदी-मराठी साहित्यिक होते. ते एम.ए., पीएच.डी. होते. शहांनी आयुष्यभर गांधीवादी विचारांसह हिंदी भाषेचा प्रचार व प्रसार केला. बाबा आमटे यांच्या ‘भारत जोडो’चे काम करत असताना त्यांनी आंतरभारती, छात्रभारती, राष्ट्रभाषा सभा, राष्ट्र सेवा दल यांसह इतर अनेक संघटनांची जबाबदारी सांभाळली. हे करीत असतानाच त्यांनी ५०पेक्षा अधिक पुस्तकांचे लेखन केले. यांनी हिंदीतील उत्तम साहित्याची मराठीत, आणि मराठीतील साहित्याची हिंदीत भाषांतरे केली. समाजकार्य, भाषेवरील प्रभुत्व आणि वक्तृत्वावरील पकड यामुळे अनेकांना आपलेसे करून घेण्याची अनोखी शैली शहा यांच्याकडे होती.

शहा यांनी प्रारंभी धुळ्याच्या जयहिंद महाविद्यालयात हिंदीचे प्राध्यापक म्हणून काम केले. त्यानंतर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात हिंदी विभागप्रमुख म्हणूनही जबाबदारी सांभाळली. पुण्यातील महाराष्ट्र हिंदी राष्ट्रभाषा सभेचे उपाध्यक्ष आणि नाशिक विभागाचे अध्यक्ष म्हणून काम केले. संशोधनातील आवडीमुळे त्यांनी धुळे येथील इतिहासाचार्य वि.का. राजवाडे इतिहास संशोधन मंडळाचे विश्वस्त म्हणूनही काम पाहिले. त्यातूनच मंडळाच्या १३ खंडांचे तसेच खानदेशच्या सांस्कृतिक इतिहासाच्या सहा खंडांचे संपादनही त्यांनी केले. छात्रभारती या विद्यार्थी संघटनेचे ते संस्थापक अध्यक्ष. विद्यार्थ्यांची संघटना म्हणून शैक्षणिक समस्यांची सोडवणूक करताना, विद्यार्थ्यांना त्यांच्या सामाजिक दायित्वाची जाणीव करून देण्याचे काम त्यांनी केले. राष्ट सेवा दलाचे यदुनाथ थत्ते यांच्या कार्यात मु.ब. शहांचा सक्रिय सहभाग होता.

भारतातील चौदा भाषांमध्ये राष्ट्रीय गीत गायन करणाऱ्या २२ गायकांना सोबत घेऊन त्यांनी ‘हम हिंदुस्थानी’ची स्थापना केली. तसेच भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाची कहाणी त्यांनी गीतांद्वारे २० गायकांसह अनेक शहरांमध्ये सादर केली.

मु.ब. शहा यांनी लिहिलेली पुस्तके

  • अनुवाद विज्ञान
  • अमृता प्रीतम यांच्या ‘रसीदी टिकट’चा त्यांनी केलेला मराठी अनुवाद
  • अप्रकाशित वेडिया नागेश
  • अक्षरयात्रा
  • खानदेशचे गांधी- बाळूभाई मेहता
  • तुलसीदास के अज्ञात शिष्य,
  • नवजागरण और हिंदी साहित्य (हिंदी)
  • निबंध कौमुदी
  • भारतीय समाज क्रांती के जनक महात्मा जोतिबा फुले (हिंदी)
  • कुतुबन कृत मृगावती चौपाई
  • यदुनाथ थत्ते (चरित्र)
  • राष्ट्रीय एकात्मता का भव्य स्वप्न
  • विचार तीर्थ
  • श्यामची आई (नाट्य रूपांतर)
  • संत योद्धा सेनापती बापट
  • सत्यशोधक कुंभार गुरुजी
  • संवाद रूप शामची आईपाईई
  • संस्कृति
  • हिंदी निबंधों का शैलीगत अध्ययन (हिंदी)

हिंदीत अनुवादिलेली मराठी पुस्तके

  • अद्वितीय राजा शिवाजी
  • नरहर कुरुंदकर यांचे ‘विचार तीर्थ’
  • पु. ल. देशपांडे यांचे ‘मातृधर्मी सानेगुरुजी’
  • बालकवी आणि मी
  • रजिया पटेल यांचे ‘चाहूल’
  • संवाद रूप शामची आई
  • साधनाताई आमटे यांचे ‘समिधा’
  • हिन्दू समाज संगठन और विघटन

संपादित पुस्तके

  • वि.का. राजवाडे यांच्या लेखनाचे १३ खंड
  • खानदेशच्या सांस्कृतिक इतिहासाचे सहा खंड

पुरस्कार

  • हिंदी साहित्यातील मानाचा गंगाशरण पुरस्कार