Jump to content

मुद्राविधि

मुद्राविधि :'तिरप्या मुद्राक्षरातील मजकूर शरीराच्या एखाद्या अवयावर धार्मिक श्रद्धेतून विशिष्ट चिन्हाचा वा आकृतीचा तात्पूरता वा कायमचा ठसा उठवून घेण्याचा विधी. ‘मुद्रा’ या विशेषणाचा ‘आनंद देणारी’ असा अर्थ होतो तर मुद्रा या नामाचा सामान्यतः चिन्ह, खूण, प्रतिमा, प्रतीक, ठसा, अवस्था असा अर्थ होतो.‘मु’ म्हणजे ग्रहादींच्या पीडेपासून मुक्त करणारी आणि ‘द्रा’ म्हणजे पापाचे द्रावण करणारी ही व्युत्पत्ती काल्पनिक असली, तरी मुद्राविधीचे काही उद्देश स्पष्ट करणारी आहे.

मुद्रा या शब्दाचे धार्मिक व लौकिक (धार्मिकेतर) असे विविध अर्थ होतात. हात, पाय, बोटे इत्यादींच्या विशिष्ट स्थितींना मुद्रा म्हणतात. उदा., भूस्पर्शमुद्रा, अभयमुद्रा इत्यादी. हिंदू, बौद्ध व जैन शिल्पांमधून या प्रकारच्या ध्यानमुद्रा, अभयमुद्रा, वरदमुद्रा मोठ्या प्रमाणात आढळतात. ⇨ हठयोगातील खेचरी, वज्रोली वगैरे क्रियांना आणि गोरखपंथी साधूंच्या विशिष्ट कर्णभूषणांना मुद्रा अशीच संज्ञा आहे. कानफाटे नाथ संप्रदाय]. तंत्रमार्गात तसेच बौद्ध तंत्रात साधकाशी अंगसंग करणाऱ्या स्त्रीला मुद्रा म्हणतात. तांत्रिकांच्या पंचमकारांपैकी मुद्रा हा एक ‘म’ कार असून त्याच्या अर्थाविषयी भिन्नभिन्न मते आढळतात. [⟶ तंत्रमार्ग व तांत्रिक धर्म]. नृत्यादी कलांमध्ये हातांच्या विशिष्ट अवस्थांना मुद्रा म्हणतात. मंत्रशास्त्रात त्या त्या देवतेच्या मंत्राशी विशिष्ट मुद्रांचा संबंध सांगितलेला आहे. उदा., गायत्री जपापूर्वी २४ मुद्रा व जपानंतर करावयाच्या ८ मुद्रा असतात. शरीरावर धारण केलेल्या शंखचक्रादींच्या चिन्हांनाही मुद्रा म्हणले जाते आणि प्रस्तुत नोंदीमध्ये मुद्रा या शब्दाचा प्रामुख्याने हाच अर्थ विचारात घेतला आहे.

वैष्णव, शैव, शात्क, गाणपत्य इ. संप्रदायांतून मुद्राविधिचे महत्त्व कमीअधिक प्रमाणात आढळते. विष्णूपूजेतील ११, शिवपूजेतील १०, गणपतीपूजेतील ७, देवीपूजेतील ९ अशा विशिष्ट मुद्रा सांगितल्या आहेत. बौद्ध व जैन धर्मातही विशिष्ट मुद्रा सांगितल्या आहेत. वैष्णव संप्रदायामध्ये ⇨ रामानुजांचा श्रीवैष्णव संप्रदाय, वारकरी संप्रदाय इ. मध्येही मुद्राविधी आढळत असला, तरी माध्य संप्रदायामध्ये या विधीला जसे विशेष महत्त्वपूर्ण व अत्यावश्यक असे स्थान आहे, तसे ते इतर कोणत्याही संप्रदायामध्ये आढळत नाही.

माध्व संप्रदायामध्ये स्थान केल्यानंतर मुद्रा धारण करण्याचा विशिष्ट विधी आहे. त्यालाच ‘अंकन’ असेही म्हणतात. प्रथम कपाळ (१), पोट(३), छाती (१), बाहू (२), कंठ (१), कर्णमूल (२), पाठ (१) व मस्तक (१) या अवयवांवर दंड, दीपज्योती, वेळूचे पान इ. आकारांचे बारा नाम (ऊर्ध्वपुंड्र) धारण केले जातात. त्यानंतर उगाळलेल्या गोपीचंदनात बुडविलेल्या चक्र, शंख, गदा, पद्म व नारायण या पाच मुद्रा त्या नामांवर लावल्या जातात. कोणती मुद्रा कोणत्या अवयवावरील नामामध्ये लावावयाची, तिचा क्रम कोणता, ती किती वेळा लावालयाची इत्यादींविषयी विशिष्ट नियम आहेत.

जिचा प्रभाव शरीरावर कायम टिकतो, अशी तप्तमुद्रा धारण करण्याचाही एक विधी माध्य संप्रदायात असून या मुद्रेमुळे मोक्ष मिळतो, अशी सांप्रदायिकांची श्रद्धा असते. उजव्या दंडावर चक्राची व डाव्या दंडावर शंखाची मुद्रा घेतात. स्त्रियांना लग्नानंतर मुद्रा घेता येते. मुलांना मुद्रा देताना ती फार तापवीत नाहीत. माध्व ब्राह्मण गुरूला भेटण्यासाठी मठात जातात, तेव्हा त्यांना मुद्रा घ्यावी लागते आणि दक्षिणा म्हणून गुरूंना एक ते तीन महिन्यांचे उत्पन्न द्यावे लागते.

गोंदणे, कान व नाक टोचणे, सुंता करणे इ. विधींचे मुद्राविधीशी आंशिक साम्य आहे, असे म्हणता येते.

हीरॉडोटसने ईजिप्तमधील हर्क्यूलीझच्या एका मांदिराचा उल्लेख केला आहे. मालकाच्या घरातून या मंदिरात पळून आलेल्या गुलामांनी हर्क्यूलीझबद्दलची भक्ती व्यक्त करणाऱ्या मुद्रा शरीरावर धारण केलेल्या असतील, तर त्यांना पुन्हा पकडून गुलाम करण्याचा अधिकार मालकांना नसे, असे हीरॉडोटस म्हणतो. आपण आपल्या शरीरावर येशू खिस्तांची मुद्रा धारण केली असल्याचा उल्लेख सेंट पॉल यांनी केला होता.कपाळावर पवित्र मुद्रा धारण करणाऱ्या ख्रिस्ती व्यक्तीचा निर्देश पाँटिअसने (तिसरे शतक) केला होता. तेराव्या शतकानंतराच्या काळात आढळू लागलेली एक घटना या संदर्भात महत्त्वाची आहे. क्रूसावरील येशू ख्रिस्तांच्या अंगावर ज्या जखमा होत्या, त्या प्रकारच्या जखमा काही श्रद्धाळू भक्तांच्या अंगावर प्रकट होऊ लागल्या, ही ती घटना होय. अशा प्रकारच्या जखमा प्रकट होण्याची शंभरहून अधिक उदाहरणे नोंदविण्यात आली असून त्यांमध्ये सेंट फ्रान्सिस यांचे उदाहरण सर्वांत अधिक महत्त्वाचे मानले जाते. या घटनेच्या खरेखोटेपणाविषयी तसेच या जखमा आपोआप निर्माण होत असत की निर्माण केल्या जात असत याविषयी, विविध मते मांडण्यात आली आहेत. या जखमा म्हणजे एक प्रकारच्या कायम राहाणाऱ्या मुद्राच होत.