Jump to content

मुग्धभ्रांति

मुग्धभ्रांति : (डेलिरियम्). मेंदूच्या बोधनीय, प्रतिबोधनीय व बौद्धिक कार्यात कोणत्याही कारणामुळे जेव्हा तीव्र बाधा येते तेव्हा मुग्धभ्रांती हा मानसचिकित्सीय लक्षणसमूह नेहमी आढळून येतो. याला साध्या भाषेत ‘भ्रम’ किंवा ‘भ्रमिष्टपणा’ असे म्हणतात. पाश्चिमात्य देशांत रुग्णालयातील रुग्णांच्या शारीरिक विकारांत या लक्षणांचे प्रमाण ५% ते १०% असते तसेच तेथील वयाची साठी ओलांडलेल्या वृद्ध रुग्णांत हे प्रमाण ५०% पर्यंत आढळून आलेले आहे. भारतीयात मुग्धभ्रांतीचे प्रमाण कमी असायचे कारण येथील अल्प आयुर्मर्यादा हे होय.

लक्षणे

मुग्धभ्रांतीची मुख्य लक्षणे अशी आहेत: (१) जणिवेची पातळी खालावणे (गोंधळण्यापासून तंद्रावस्थेपर्यंत-स्टुपर-), (२) अवधान, एकाग्रता, आकलन, दिशाबोधक्षमता आणि स्मरणशक्ती यांची अकार्यक्षमता, (३) दृष्टीचे व श्रवणाचे ⇨ निर्वस्तुभ्रम (नसलेले दिसणे किंवा ऐकू येणे) आणि ⇨ भ्रम (वस्तूचा चुकीचा प्रतिबोध) आणि त्यांच्यावर आधारलेले संभ्रम (चुकीच्या कल्पना), (४) भावनिक गोंधळ, भावनेची सहजता आणि तीव्रता, (५) अस्वस्थता, निरुपयोगी हालचाली आणि निद्रानाश. (६) वातावरणाशी व वास्तवतेशी असलेला संपर्क खंडित होणे.


मुग्धभ्रांतीची कालमर्यादा मेंदूला झालेल्या बाधेच्या प्रमाणावर अवलंबून असते. हा काळ साधारणपणे काही मिनिटांपासून काही आठवड्यांपर्यंत असतो. पण बहुधा तो ७-८ दिवसांचा असतो.

मुग्धभ्रांतीचे वर्गीकरण तिच्या तीव्रतेनुसार केले जातेः (१) सौम्य, (२) अल्प तीव्र आणि (३) तीव्र.


सौम्य प्रकारात रुग्णाचे एकंदर लक्ष व आकलन तसेच हल्लीच्या घटनांचे स्मरण कमी होऊन विचार भरकटत जातात. भाषेवरील व वर्तनावरील नियंत्रण क्षीण झाल्यामुळे दैनंदिन काम करणे कठीण जाते. हा प्रकार बहुधा अल्पकाळ टिकतो म्हणून तो समजूनही येत नाही. अल्प तीव्र (सब् ॲक्यूट) मुग्धभ्रांतीमध्ये जाणिवेची पातळी व कार्यक्षमता कमीजास्त होते. त्यामुळे काही काळ रुग्ण मुग्धभ्रांतीच्या अंमलाबाहेर येऊन व्यवस्थित बोलतो आणि वागतो. लक्षणांची तीव्रता रात्री जास्त असते. अशा वेळी त्याच्या बरोबर संभाषण करणे व त्याच्या उफाळलेल्या भावना किंवा वर्तनातील धडपड यांना आवर घालणे जाते. निर्वस्तुभ्रम अधुनमधून होतात. हा विकार उपचाराने पूर्ण बरा होऊ शकतो. तीव्र मुग्धभ्रांतीमध्ये व्यक्तीचा भोवतालच्या वातावरणाशी संपर्क पार तुटतो व ती व्यक्ती एका अद्‌भुत, भयानक आणि स्वप्नमय अशा सृष्टीत वावरते. आप्तेष्टांना ओळखत नाही. निर्वस्तुभ्रम आणि भ्रम अनेक व सतत होत असल्याने त्यांच्या संभ्रमी कल्पनेतल्या दुर्जनांशी ती सतत झगडत राहते अथवा त्यांच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करते. निरर्थक व निरुपयोगी हालचाली सतत होत राहतात. खाण्यापिण्याची आबाळ होते. लघवी व शौचक्रियेवर ताबा राहत नाही आणि शारीरिक प्रकृती झपाट्याने खालावते. वेळीच उपचार न झाल्यास मृत्यू किंवा बुद्धिभ्रंश (डिमेंशिया) यांची शक्यता वाढते.

कारणे : मुग्धभ्रांतीच्या कारणांचे वर्गीकरण ढोबळपणे दोन वर्गात केले जातेः (अ) प्रत्यक्ष कारणे : (१) इजा-मुकामार, संक्षोभ (कन्कशन) आणि विदारण (लॅसेरेशन) (२) अर्बुद (३) रक्त-वाहिन्यांचे विकार-रक्तस्राव (हॅमरेज), आंतरक्लथन (थ्राँबोसीस), आंतरकीलन (एंबॉलिझम) (४) संक्रामणे (इन्फेक्शन) – मस्तिष्कशोथ अथवा मस्तिष्कावरणशोथ (५) अपस्माराचे तीव्र अथवा सतत झटके आणि (६) बुद्धिभ्रंशाच्या रुग्णात शारीरिक विकार अथवा तीव्र मानसिक ताण.


ब) अप्रत्यक्ष कारणे : (१) विषबाधा-औषधांचा अतिरेक उदा., बार्बिच्युरेट इ. शामके आणि मादक पदार्थांचा अतिरेक (मद्य, गांजा, अफू) (२) मद्यासक्ती किंवा इतर मादक पदार्थांच्या आसक्तीमध्ये सेवनखंडामुळे होणारे मस्तिष्ककार्यातील बिघाड (३) संक्रामणामुळे होणारी जंतुविषबाधा-उदा., विषमज्वर, व्हायरसजन्य ज्वर, न्यूमोनिया वगैरे (४) चयापचयी विकार-ब जीवनसत्त्वाची न्यूनता ( विशेषतः ब १, ब ६, ब १२), मधुमेहातील रक्तशर्कराधिक्य तसेच रक्तशर्करान्यूनता, ऑक्सिजनन्यूनता (रक्तक्षयामुळे), अंतस्त्रावी ग्रंथीचे विकार उदा., अवटु-आधिक्य (हायपर थायरॉयडिझम), यकृत, मुत्रपिंड, फुप्फुसे, स्वादुपिंड यांच्या कार्यात खंड, विद्युतविश्लेष्य असंतुलन (इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स) उदा., उपासमार अथवा तीव्र थकवा (५) हृदयकार्यात होणारी तीव्र बाधा उदा., हृदरोहिणीरोध (६) वीर्धक्यात ज्ञानेंद्रियांच्या संवेदनांमध्ये दीर्घकाळ बाधा येणे (सेन्सरी डिप्रीव्हेशन) उदा., अंधत्व, बहिरेपण इत्यादी.

उपचार : मुग्घभ्रांतीचा उपचार तिच्या कारणांवर अवलंबून असतो. बहुतेक तीव्र प्रकारांचा उपचार रुग्णालयात ठेवूनच करावा लागतो. कारणांचा अंमल कमी करण्यासाठी आधी प्रयत्न केला जातो. उदा., विषबाधा असल्यास शरीरातील विष किंवा रक्तविष (टॉक्सिन्स) धुऊन टाकण्यासाठी लवणद्राव-फांट (सलाइन इन्फ्यूजन) देतात. ब समूहातील जीवनसत्त्वेही जास्त प्रमाणात ह्या फांटातून दिली जातात कारण त्यामुळे मस्तिष्ककार्य पुनर्स्थापित होण्यास मदत होते. शांत झोप व पुरेशी विश्रांती मिळण्यासाठी निवडक अशी शामके योग्य प्रमाणात देणे अत्यंत जरुरीचे असते. योग्य आहार देण्याची खबरदारी तसेच इतर शारीरिक शुश्रूषा व्यवस्थित करणे आवश्यक असते. रुग्णाच्या खोलीचे वातावरण शक्यतो नेहमीसारखे आणि शांत ठेवून रुग्णांना धीर देणे तसेच त्यांना सुरक्षित वाटेल अशी काळजीही घेणे जरूरीचे असते.