मुक्ती (तत्त्वज्ञान)
हिंदू किंवा भारतातील प्राचीन समजानुसार मानवाला चार प्रकारच्या मुक्ती मिळू शकतात.
मुक्ती म्हणजे काय?
मुक्ती म्हणजे बंधनापासून सुटका. अविद्येमुळे जिवाला आपल्या मूळ स्वरूपाचा म्हणजे ईश्वरत्वाचा विसर पडतो आणि तो स्वतःला सांत, मर्त्य समजू लागतो, त्या अविद्येपासून आणि मायेपासून सुटका म्हणजे मुक्ती.[१]
मुक्तीचे चार प्रकार
०१) समीपता - भक्त भगवंताच्या समीप, जवळ असतो. नित्य सान्निध्य असते.
ही मुक्ती उपासना अथवा पुण्याई मुळे मिळते, असे परंपरा सांगते.
०२) सलोकता - भक्त आणि भगवंत यांचे नित्य साहचर्य असते. इष्ट देवतेच्या लोकांत निवास करणे म्हणजे सलोकता.
विष्णूची उपासना करणाऱ्यांना वैकुंठ,रामाच्या उपासकांना साकेत धाम, कुष्णाच्या उपासकांना गोलोक प्राप्त होतो.ही मुक्ती तपामुळे मिळते.
तपाचे सामर्थ्ये तपिन्नला अमूप| चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे
वैकुंठा जावया तपाचे सायास | करणे लागे नाश जीवा बहु || - तुकाराम महाराज
०३) सरूपता किंवा सादृश्य - भक्ताच्या कृतीमध्ये आणि स्वभावामध्ये, प्रकृतीमध्ये भगवंताशी साधर्म्य आढळते. भक्ताला इष्ट देवतेचे रूप प्राप्त होते.
ही मुक्ती ध्यानामुळे प्राप्त होते.
ध्यानी ध्याता पंढरीराया| मनासहित पालटे काया || - तुकाराम महाराज
०४) सायुज्य - भक्ताचे भगवंताशी पूर्ण ऐक्य झालेले असते. [१] येथे जीव आत्मरुपात विलीन होऊन जातो. [२]
या चार मुक्तींचा एकत्रित विचार मुक्तिचतुष्टय असा केला जातो.
अधिक माहितीसाठी वाचा - समर्थ रामदास कृत दासबोध यामधील दशक चवथा, समास दहावा पाहावा.
मुक्ती आणि नाम
नामामुळे केवळ या चारही मुक्ती मिळतात असे नाही, तर नामापाशी त्या सेविका म्हणून उभ्या असतात असे संत सांगतात.
तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती | ऐसे बहुता ग्रंथी बोलियले ||
नारायण हरी नारायण हरी भुक्ती मुक्ती चारी घरी त्याच्या ||