Jump to content

मुंबई विद्यापीठ

मुंबई विद्यापीठ
ब्रीदवाक्यशीलवृतफला विद्या
मराठीमध्ये अर्थ
विद्येचे फळ म्हणजे चांगले शील होय.
Type सार्वजनिक
स्थापनाजुलै १८, इ.स. १८५७
संकेतस्थळmu.ac.in



मुंबई विद्यापीठ हे भारतातील सर्वात जुन्या तीन विद्यापीठांतील एक आहे. मद्रास, कलकत्ता आणि मुंबई येथील विद्यापीठांची स्थापना इ.स. १८५७ मध्ये झाली होती. यांपैकी मुंबई विद्यापीठाची स्थापना १८ जुलै, इ.स. १८५७ रोजी झाली.[]

मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेली अनेक महाविद्यालये मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रत्‍नागिरी, रायगड, कोकण, आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहेत. या जिल्ह्यांतील बहुतेक सार्वजनिक महाविद्यालये मुंबई विद्यापीठाच्या अधिपत्याखाली येतात. मुंबई विद्यापीठातून विविध ज्ञानशाखांत पदवीपूर्व, पदवीचे, पदविकांचे आणि पदवी पश्चातचे शिक्षण दिले जाते. या जिल्ह्यातील अभियांत्रिकी आणि इतर व्यावसायिक शिक्षण देणारी बहुतेक खासगी महाविद्यालयेसुद्धा मुंबई विद्यापीठाशी संलग्न आहेत. मुंबई विद्यापीठातील बहुतांश अभ्यासक्रम इंग्रजीतून शिकविले जातात.हे खूप मोठे विद्यापीठ आहे. मुंबई विद्यापीठाला तथागत गौतम बुद्धाचे नाव देण्यात यावे यासाठी पत्रकार सामाजिक कार्यकर्ते रवींद्र जगताप या संदर्भात शासन दरबारी पाठपुरावा करत आहेत.

इतिहास

सन १९९६ पर्यंत हे विद्यापीठ "बॉंम्बे विद्यापीठ" (युनिव्हर्सिटी ऑफ बॉंम्बे) म्हणून ओळखले जात होते. १९९६ साली बॉंम्बे शहराचे नाव बदलून मुंबई करण्यात आले. ४ सप्टेंबर १९९६ रोजी महाराष्ट्र शासनाने प्रकशित केलेल्या राजपत्रानुसार बॉंम्बे विद्यापीठाचे नामकरण मुंबई विद्यापीठ करण्यात आले.

सर चार्ल्स वुडच्या इ.स. १८५४ च्या शिक्षणविषयक खलित्यानुसार डॉ.जॉन विल्सन यांनी १८५७ साली मुंबई विद्यापीठाची स्थापना केली. मद्रास व कलकत्ता विद्यापीठांबरोबर मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली होती. डॉ.विल्सनची पत्‍नी मार्गरेट बन विल्सन हिने मुंबईत सेंट कोलंबाज आणि इतर १५ शाळा व विल्सन महाविद्यालय हे कॉलेज स्थापन केले.

इ.स. १८६८ साली मुंबई विद्यापीठाशी संलग्न झालेले मुंबईमधील सेंट झेव्हियर्स महाविद्यालयाला इ.स. २००९ मध्ये स्वायत्तता मिळाली.

पुढे मुंबई विद्यापीठ कायदा (द बॉंम्बे युनिवर्सिटी ॲक्ट) सन १९५३ नुसार विद्यापीठाचे अधिकार आणि कार्ये ठरविण्यात आली. सुरुवातीला एल्फिन्स्टन महाविद्यालयाची इमारत मुंबई विद्यापीठासाठी वापरण्यात आली होती.

संकुलं

मुंबईत विद्यापीठाची दोन संकुले आहेत. मुंबईच्या सांताक्रूझ विभागात २३० एकर परिसरात विद्यापीठाचे शैक्षणिक व प्रशासकीय संकुल आहे. मुंबईच्याच फोर्ट भागात विद्यापीठाचे जे संकुल आहे तेथून फक्त प्रशासकीय कारभार पाहिला जातो. मुंबई विद्यापीठाचे स्वतःचे अभियांत्रिकी व वैद्यकिय विभाग नाहीत.

ग्रंथालय

मुंबई विद्यापीठाचे ग्रंथालय

विद्यापीठाचे स्वतंत्र ग्रंथालय असून त्याला जवाहरलाल नेहरू ग्रंथालय असे नाव आहे. या ग्रंथालयात ८,५०,००० च्यावर पुस्तके आहेत. ग्रंथालयाची पुस्तकसूची संगणकीकृत केलेली आहे.

मुख्य इमारत

विद्यापीठाची मुंबई फोर्टमधील मुख्य इमारत गॉथिक शैलीत बांधलेली आहे. या इमारतीच्या बाजूलाच २३० फूट उंचीचा प्रसिद्ध असा राजाबाई टॉवर आहे. लंडनमधील बिग बेन टॉवरला नजरेसमोर ठेवून ब्रिटिश अभियंता जॉर्ज गिल्बर्ट स्कॉट याच्या देखरेखीखाली याचे काम इ.स. १८७० साली पूर्ण झाले. उद्योगपती प्रेमचंद रायचंद यांनीही या कामी आर्थिक मदत केली होती. त्यामुळेच त्यांच्या आईच्या राजाबाई या नावावरून टॉवरलाही राजाबाई टॉवर असे नाव दिले गेले.हे

इतर संस्था

वीरमाता जिजाबाई अभियांत्रिकी संस्था (जुने नाव व्हिक्टोरिया ज्युबिली टेक्निकल इन्स्टिट्यूट-(VJTI)) आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR) यांसारख्या अनेक ख्यातनाम संस्था या विद्यापीठाच्या अधिपत्याखाली होत्या. आता या संस्थांना स्वायत्तता मिळाली आहे.

क्रमवारी आणि श्रेणीकरण

इ.स. २०१० साली राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती परिषद (नॅक) कडून या विद्यापीठाला पंचतारांकित दर्जा देण्यात आला. इ.स. २०१२ सालच्या जगातील सर्वोत्तम ५०० विद्यापीठांमध्ये मुंबई विद्यापीठाचा क्रमांक लागत नाही. इ.स. २०१२ साली या विद्यापीठाचा जागतिक क्रमवारीत ५५१ वा क्रमांक होता.[][]

विद्यापीठाचे काही माजी कुलगुरू

  • जॉन विल्सन.
  • सर रेमंड वेस्ट.
  • सर अलेक्झांडर ग्रांट
  • रॅंग्लर रघुनाथ पुरूषोत्तम परांजपे.
  • डॉ.राजन वेळूकर. (इ.स. २०१० ते इ.स. २०१५) (सद्य)

नामवंत विद्यार्थी

मुंबई विद्यापीठाचे गीत

इदं सुन्दरं मन्दिर शारदाया
मुम्बापुरीविश्वविद्यालयम्।
कलाशाखवाणिज्यशाखाधिरूढा
अमूढा विमुक्ता विहंगा वयम् ॥१॥
शृण्वन्तु सर्वे दृढं निश्चयम् ॥धृ॥

सत्यं वदामो धर्म चरामो
नयामो नृणां दुःखभारं लयम्।
स्वकार्ये रतानां सदा जागृतानां
भवेत्किं भविष्येऽपि कस्मात्भयम् ॥२॥
शृण्वन्तु सर्वे दृढं निश्चयम् ॥

युवा स्यात बलिष्ठो युवा स्यात गरिष्ठो
युवा ध्येयनिष्ठोऽपि भूयात्स्वयम्।
यदि स्यात्युवा राष्ट्रकर्तव्यनिष्ठः
सम्मानयेत् तं ही लोकत्रयम् ॥३॥
शृण्वन्तु सर्वे दृढं निश्चयम् ॥

वंदामहे भारतं पूजनीयं
स्वदेशात्परं नास्ति देवालयम्।
अत्रैव सर्वेप्रतिष्ठापयामो
ममत्वेन साधू समत्वं नयम् ॥४॥
शृण्वन्तु सर्वे दृढं निश्चयम् ॥

कवी - वसंत बापट

संगीत - प्रभाकर पंडित []

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ टिकेकर, २००७ पृ. तेवीस.
  2. ^ टॉप युनिव्हर्सिटी रॅंकिंग्स (इंग्लिश मजकूर)]
  3. ^ टॉप युनिव्हर्सिटी रॅंकिंग्स (इंग्लिश मजकूर)
  4. ^ टिकेकर, २००७ पृ. एकवीस.

संदर्भयादी

  • टिकेकर, अरुण. ऐसा ज्ञानसागरु बखर मुंबई विद्यापीठाची.

हे सुद्धा पहा