मासिक पाळी
स्त्री (मुलगी) वयात आल्यावर योनीमार्गातून दर महिन्यास जो रक्तस्राव होतो, त्याला मासिक पाळी (Menstrual cycle/ एमसी) असे म्हणतात. मुलगी साधारणपणे १२-१३ वर्षांची झाली की, मासिक पाळी सुरू होते. कधी कधी या आधीही सुरू होऊ शकते. दर महिन्याला एक स्त्रीबीज बिजाडांतून पक्व होऊन बाहेर पडते. त्याच्या वाढीसाठी गर्भाशयात एक आच्छादन ही तयार केले जाते. योग्य काळात स्त्री व पुरूषाच्या वीर्यातील पुरूषबीज व स्त्रीच्या गर्भाशयातील स्त्रीबीज यांचा संयोग होऊन गर्भ तयार होतो. पण ज्यावेळी हे स्त्रीबीज फलित होत नाही त्यावेळेस फलित न झालेल्या बिजासहित आच्छादन बाहेर टाकले जाते. ते रक्ताच्या स्वरूपात योनी मार्गाद्वारे बाहेर टाकले जाते म्हणून हा रक्तस्राव होतो.
मासिक पाळी चक्र व अवस्था
प्रत्येक स्त्रीला दर २७ ते ३० दिवसांनी मासिक पाळी येते. हे चक्र वयाच्या बाराव्या वर्षी सामान्यत: सुरू होते आणि साधारण पंचेचाळीस ते पन्नास वर्षे या कालावधीत थांबते. पाळी सुरू असण्याच्या दिवसात आयुर्वेदानुसार विश्रांतीची गरज असल्याने स्त्रीने श्रमाची कामे करू नयेत. मासिक पाळी संपल्यानंतर दोन आठवड्यांनी अथवा पुढची पाळी येण्या आधी दोन आठवडे स्त्रीचे बीजांड परिपक्व होऊन बीजपुंजापासून वेगळे होते.
मासिक पाळीचे चक्र
मासिक पाळीच्या चक्राच्या पहिल्या दिवशी रक्त वाहण्यास सुरुवात होते, ज्याला पहिला दिवस म्हणतात. हे चक्र पुढील मासिक पाळीच्या जरा आधी थांबते. हे ऋतुस्त्राव चक्र साधारणपणे २५ ते ३६ दिवसांचे असते. फक्त १० ते १५ टक्के स्त्रियांमध्ये मासिक पाळीचे हे चक्र अचूक २८ दिवसांचे असते. वयात आल्यानंतरच्या लगेचच्या काळात तसेच पाळी थांबण्याचा वेळी हा फरक ठळकपणे दिसून येतो आणि दोन पाळ्यांमधील कालावधी देखील अधिकतम असतो. रक्तस्राव ३ ते ७ दिवस किंवा सरासरी ५ दिवस सुरू राहतो. या दरम्यान सुमारे ०.५ ते २.५ औंस रक्त जाते. एका सॅनिटरी नॅपकिनमध्ये – ज्याला टॅंपन असे ही म्हणतात – त्याच्या प्रकारानुसार १ औंस रक्त शोषले जाऊ शकते. मासिक पाळी मध्ये वाहणारे रक्त नेहमीच्या जखमेतून येणाऱ्या रक्तापेक्षा वेगळे असते व स्त्राव भरपूर असल्याशिवाय त्याची सहजपणे गांठ तयार (क्लॉटिंग) होत नाही. मासिक पाळीच्या आवर्तनाचे नियमन संप्ररेकांमार्फत म्हणजेच हार्मोन्समार्फत केले जाते. ल्युटिनायझिंग आणि फॉलिकल-स्टिम्युलेटिंग प्रकारची ही संप्रेरके पिट्युटरी ग्रंथींमधून स्त्रवतात आणि ह्यांमुळे बीजांड निर्मितीच्या प्रक्रियेस (ओव्ह्यूलेशन)चालना मिळते व बीजांडकोश (ओव्हरीज्) उत्तेजित होऊन इस्ट्रोजेन तसेच प्रोजेस्टेरॉनची निर्मिती होते. इस्ट्रोजेन तसेच प्रोजेस्टेरॉनमुळे गर्भाशय व स्तनांना उत्तेजना मिळून त्यांना भावी फलनासाठी सज्ज केले जाते.
मासिक पाळीच्या आवर्तनातील टप्पे
ह्या चक्रांमध्ये ३ टप्पे असतात -
- फॉलिक्युलर (अंडे बाहेर सोडले जाण्याआधी)
- ओव्ह्यूलेटरी (अंडे बाहेर सोडले जाणे)
- ल्युटिल (अंडे बाहेर सोडल्यानंतर)
फॉलिक्युलर टप्पा
हा टप्पा रक्त वाहण्याचा पहिल्या दिवशी सुरू होतो (दिवस १) परंतु ह्या टप्प्याचे खरे वैशिष्ट्य म्हणजे ओव्हरीजमध्ये फॉलिकलची विकास होणे.फॉलिक्युलर टप्प्याच्या सुरुवातीला गर्भाशयाचे अस्तर (एंडोमेट्रियम) गर्भाच्या पोषणासाठी आवश्यक असे द्रव भरून फुगते. अंड्याचे फलन न झाल्यास एस्ट्रोजेन तसेच प्रोजेस्टेरॉनचे प्रमाण कमी असते. ह्याचा परिणाम म्हणून एंडोमेट्रियमचे वरचे थर बाहेर टाकले जातात आणि मासिक पाळीचे रक्त वाहण्यास सुरुवात होते. साधारण ह्याच वेळी पिट्युटरी ग्रंथींमधून फॉलिकलला उत्तेजित करणाऱ्या संप्रेरकांची निर्मिती जरा जास्त प्रमाणात केली जाते. ह्या संप्रेरकामार्फत साधारणतः ३ ते १० फॉलिकल्स तयार केली जातात. प्रत्येकात एक अंडे असते. ह्याच टप्प्यात, ह्या संप्रेरकांचे प्रमाण कमी होऊ लागल्यानंतर, ह्यांपैकी एकाच डॉमिनंट फॉलिकलची वाढ होत राहते. कालांतराने ते स्वतःच एस्ट्रोजेन तयार करू लागते आणि इतर फॉलिकल्स नष्ट होतात. फॉलिक्युलर टप्पा सुमारे १३-१४ दिवसांचा असतो. तिन्ही टप्प्यांपैकी ह्या टप्प्याच्या कालावधीत सर्वाधिक बदल होत राहतात. मेनोपॉजच्या वेळी हा टप्पा ही कमी दिवसांचा असतो. ल्युटिनायझिंग संप्रेरकांचे प्रमाण वाढते तेव्हा हा टप्पा संपतो व परिणामी अंडे बाहेर सोडले जाते (ओव्ह्यूलेशन).
ओव्ह्यूलेटरी टप्पा
ल्युटिनायझिंग संप्रेरकांचे प्रमाण वाढते तेव्हा हा टप्पा सुरू होतो. ल्युटिनायझिंग संप्रेरकामुळे डॉमिनंट फॉलिकलला उत्तेजना मिळून अखेरीस ते बीजांडकोशाच्या भिंतीतून बाहेर येते व अंडे बाहेर सोडले जाते. ह्यानंतर फॉलिकलला उत्तेजित करणाऱ्या संप्रेरकांचे प्रमाण मंदपणे वाढते. फॉलिकलला उत्तेजित करणाऱ्या संप्रेरकांचे प्रमाण वाढण्यामागील कारण अजून नीटसे समजलेले नाही. हा टप्पा साधारणतः १६ ते ३२ तास चालतो व अंडे बाहेर सोडण्याच्या क्रियेने ह्याची सांगता होते. अंडे बाहेर सोडले गेल्यानंतर १२ ते २४ तासांनी, ल्युटिनायझिंग हार्मोनमधील वाढ लघवी तपासल्यानंतर दिसून येते. हे प्रमाण मोजल्याने एखादी स्त्री फलनक्षम आहे अथवा नाही हे समजते. अंडे सोडल्यानंतर अधिकतम १२ तासांपर्यंत त्याचे फलन होऊ शकते. अंडे बाहेर सोडले जाण्याआधी पुनरुत्पादक नलिकेत (रिप्रॉडक्टिव्ह ट्रॅक) शुक्रजंतू हजर असल्यास फलनाची शक्यता जास्त असते. ओव्यूयालेशनचे वेळी काही स्त्रियांना ओटीपोटाच्या खालच्या एका बाजूस वेदना जाणवते, तिला मधली वेदना (शब्दाश:, मिडल पेन) म्हणतात. ही वेदना काही मिनिटांपासून काही तासांपर्यंत टिकते. ज्या बीजांडकोशातून अंडे बाहेर आलेले असते त्याच बाजूस दुखते मात्र ह्या दुखण्याचे कारण माहीत नाही. फॉलिकल फाटण्याआधी किंवा नंतर हे दुखणे जाणवते परंतु सर्वच आवर्तनांमध्ये दुखते असे नाही. दोन्ही बीजांडकोशांमधून आळीपाळीने अंडे बाहेर येईल असे नाही, ह्यासंबंधी काही ही नियम नाही. एक बीजांडकोश काढून टाकला तर राहिलेल्या बीजांडकोशातून दर महिन्यास एक अंडे बाहेर सोडले जाते.
ल्युटिल टप्पा
ओव्ह्यूलेशननंतर हा टप्पा सुरू होतो आणि, फलन न झाल्यास, सुमारे १४ दिवस चालून पुढील मासिक पाळीच्या आधी संपतो. ह्यामध्ये अंडे बाहेर सोडल्यानंतर फाटलेले फॉलिकल पुनः सांधले जाते आणि त्यातून बनलेल्या आकृतीस कॉर्पस ल्युटेअम असे म्हणतात. ह्यामधून वाढत्या प्रमाणात प्रोजेस्टेरॉन तयार केले जाते. फलन झालेच तर त्या दृष्टीने गर्भाशयाची तयारी करण्याचे काम ह्या कॉर्पस ल्युटेअमतर्फे केले जाते. कॉर्पस ल्युटेअमद्वारे तयार झालेल्या प्रोजेस्टेरॉनमुळे एंडोमेट्रियमची जाडी वाढते व भावी गर्भास आवश्यक ती पोषकद्रव्ये त्यात भरली जातात. तसेच प्रोजेस्टेरॉनमुळे सर्व्हिक्स (ग्रीवा) मधील म्युकस (श्लेष्मा) घट्ट होऊन गर्भाशयात वीर्य किंवा इतर जीवाणूंच्या प्रवेशाची शक्यता कमी होते. प्रोजेस्टेरॉनमुळे ह्या टप्प्यादरम्यान शरीराचे एकंदर तापमानही किंचित वाढते व पुढील मासिक पाळी चालू होईपर्यंत ते तसेच वाढलेले राहते. ह्या वाढीव तापमानावरूनही ओव्ह्यूढलेशनची शक्यता आजमावता येते. ह्या टप्प्यामध्ये इस्ट्रोजेनचे प्रमाण जास्त असते. एंडोमेट्रियम जाड बनवण्यामध्ये इस्ट्रोजेनचाही वाटा असतो.इस्ट्रोजेन तसेच प्रोजेस्टेरॉनच्या वाढत्या पातळीमुळे स्तनांतील दुग्धनलिका रुंदावतात व ह्यामुळे स्तनांना सूज येऊन ते नाजुक बनतात. अंड्याचे फलन न झाल्यास १४ दिवसांनंतर कॉर्पस ल्युटेअम खराब होते व पुढील मासिक आवर्तन सुरू होते. अंड्याचे फलन झाल्यास गर्भाभोवतीच्या पेशी ह्यूमन कोरियॉनिक गोनाडोट्रॉपिन नावाचे संप्रेरक तयार करतात. ह्या संप्रेरकाद्वारे कॉर्पस ल्युटेअम जतन केले जाते कारण त्यामधून अजूनही बाहेर पडणारे प्रोजेस्टेरॉन, वाढत्या गर्भाने स्वतःची संप्रेरके तयार करेपर्यंत, उपयोगी पडणार असते. गर्भधारणेची चाचणी (प्रेग्नन्सी टेस्ट) मुख्यतः ह्या ह्यूमन कोरियॉनिक गोनाडोट्रॉपिनचे वाढते प्रमाण शोधण्यावर आधारित असते.
कालावधी
वय वर्षे वीसच्या टप्प्यातील मुली आणि रजोनिवृत्ती पुर्व काळातील स्त्रिया त्यांच्या दृष्टीने ‘नियमित’ ही तुलनात्मक संज्ञा आहे. काही स्त्रियांच्या बाबतीत मासिक पाळी ही कधीच नियमित नसते. पहिल्या पाळीच्या अनुषंगाने पुढची पाळी कधी येईल याचा अंदाज वर्तविणे कधीकधी शक्य नसते. जास्त ताण पडणे, आजारपण, संतती नियमनांच्या गोळ्यांचा वापर अथवा त्यासाठी काही हार्मोन्सचा वापर अशा अनेक कारणांमुळे पाळी अनियमित येणे शक्य असते. संततिनियमनासाठी तथाकथित “तालबद्ध प्रक्रिया" (ऱ्हिदम मेथड) ही एक असुरक्षित पद्धत समजली जाते.
शरीराचे नैसर्गिक ऋतुचक्र शरीरात महिन्याचे २८ दिवस सतत स्त्री- संप्रेरकांमध्ये (हार्मोन्स) काही बदल होत असतात. यालाच वैद्यकीय भाषेत फॉलिक्यूलर फेज, ल्यूटील फेज, मिडसायकल फेज असे म्हणले जाते. यातील फॉलिक्युलर टप्प्याचा काळ साधारणपणे १४ दिवसांचा असतो व नंतरचा ल्यूटील टप्प्याचा काळ १४ दिवसांचा असतो. या संपूर्ण काळात संप्रेरकांचा स्राव चालू असतो. २८ दिवसांच्या शेवटी हा स्राव बंद होतो व नैसर्गिकरीत्या बंद होणारा संप्रेरकांचा स्राव जर कृत्रिमरीत्या हॉर्मोन्सच्या गोळ्या घेऊन चालू ठेवला तर पाळी पुढे ढकलली जाते. म्हणजेच पाळीच्या अपेक्षित तारखेआधी सहा ते सात दिवस गोळ्या चालू केल्या जातात व जोपर्यंत पाळी नको आहे तोपर्यंत घेतल्या जातात. आपले ठरवलेले काम संपले म्हणजे मग या गोळ्या बंद करायच्या की लगेच पाळी सुरू होते. म्हणजेच आपल्या मेंदूतील पिच्युटरी ग्रंथींच्या संदेशाद्वारे होणारे संप्रेरकांचे नैसर्गिक चक्र बाहेरून कृत्रिम संप्रेरके घेऊन बिघडवायचे. हे अयोग्य आहे. पुढे ढकलायला किंवा लवकर आणायला पाळी म्हणजे काही एखादी पूर्व नियोजित भेट नाही की जी आपण आपल्या मनाप्रमाणे किंवा सोयीप्रमाणे बदलू शकतो. पाळी पुढे करायची औषधे घेण्याचे परिणाम स्त्रिया आणि मुली यांना समजावून देणे आवश्यक आहे.
संतती नियमन
गरोदर रहाण्याची भीती न बाळगता समागम करण्याचा काळ आधी ठरविणे अथवा निश्चित करणे अयोग्य समजले जाते. बीजांड परिपक्व होऊन बीजपुंजापासून अलग होण्याच्या काळात केलेला समागम देखील धोकादायक ठरू शकतो कारण बीजांडाचे आयुष्य एकच दिवस असले तरी शुक्रजंतु जवळजवळ पाच दिवस कार्यरत राहतात. त्यामुळे या काळाच्या अलीकडील पाच दिवसात तर स्त्री समागम केला असेल तर स्त्री गरोदर राहू शकते. मासिकपाळीच्या काळात समागम केल्यास आपण गरोदर राहत नाही अशी एक चुकीची कल्पना स्त्रियांमध्ये आहे. जर स्त्रीची पाळी सात दिवसापर्यंत लांबली आणि शुक्रजंतू पाच दिवस राहिले किंवा मासिक पाळीचा काळ २८ दिवसांपासून कमी असेल तर स्त्री गरोदर होऊ शकते.
मासिक पाळीच्या समस्यांवर उपचार
मासिक पाळीशी संबंधित समस्यांवरील इलाज व उपचार हे मुख्यतः त्या समस्येच्या स्वरूपावर व ती आढळण्याच्या कालावधीवर अवलंबून असतात. किरकोळ समस्यांवर किंवा सहा महिन्यांपेक्षा कमी काळपर्यंत दिसलेल्या समस्यांवर डॉक्टर साधारणपणे जीवनशैली बदलण्याचे किंवा स्वतःच करण्याजोगे उपाय सुचवतात, उदाहरणार्थ -
- नियमित व्यायाम
- संतुलित आहार घेणे
- आहारात जास्तीचे लोह, कॅल्शिअम आणि ब जीवनसत्त्वाचा समावेश करणे (अथवा पूरक औषधे किंवा गोळ्या घेणे)
- गरम पाण्याची बाटली वापरणे
मासिक पाळीच्या समस्यांवर आपण वनौषधींचे व इतरही उपाय करू शकता, उदाहरणार्थ.
- विशिष्ट पूरक वनौषधी घेणे
- आल्याचा चहा पिणे
- जंगली सुरणासारख्या पेटके-विरोधी भाज्या खाणे
- ओटीपोटावर लव्हेंडर तेल चोळणे
- रास्पबेरीच्या पाल्याचा चहा पिणे
- जिंक्गो हे पूरक औषध घेणे
- विशिष्ट पुष्पौषधी (फ्लॉवर रेमेडीज्) घेणे
- मसाज करून घेणे
- ऍक्युपंक्चर करून घेणे
मासिक पाळीचा जास्त व दीर्घकाळ त्रास होत असल्यास डॉक्टर खालील प्रकारची औषधे घेण्यास सांगू शकतात
- सूज-विरोधी
- संप्रेरके बदलणे (हार्मोन रिप्लेसमेंट)
- नियमित पाळीसाठी तोंडावाटे घेण्याच्या गर्भनिरोधक गोळ्या
फायब्रॉइड्स किंवा कर्करोगासारखा एखादा गंभीर आजार दिसून आल्यास शस्त्रक्रियेची गरज भासू शकते. )या प्रकारच्या बऱ्याच समस्या किरकोळ असतात व फार काळजीचे कारण नसते. मासिक पाळीवर विविध घटकांचा परिणाम होत असतो आणि पाळीच्या सुरुवातीच्या काही समस्या शरीरास त्यांची सवय होईपर्यंतच टिकतात. अर्थात पाळीजास्त दिवस चालल्यास, अत्याधिक रक्तस्त्राव असल्यास अथाव रक्ताच्या गुठळ्या दिसल्यास डॉक्टरी सल्ला घेणे उत्तम.
नाटक
स्त्रियांच्या रजोनिवृत्ती या विषयावर प्रा. नितीनकुमार यांनी ’मेनोपॉज’ नावाचे नाटक लिहून दिग्दर्शित केले आहे. त्याचा पहिला प्रयोग पुण्यात २५-१-२०१८ रोजी झाला.
संदर्भ आणि नोंदी
हे सुद्धा पहा
- विटाळ
- सॅनिटरी नॅपकिन्स
- संततीनियमन