मार्शल (मिशिगन)
मार्शल अमेरिकेच्या मिशिगन राज्यातील छोटे शहर आहे. बॅटल क्रीक या शहराचे उपनगर असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार ७,०८८ होती. हे शहर कॅल्हून काउंटीचे प्रशाकीय केन्द्र आहे.
या भागात १८३० च्या सुमारास युरोपीय लोकांनी पहिल्यांदा वस्ती केली होती. या शहराला त्यांनी अमेरिकेचे सरन्यायाधीश जॉन मार्शल यांचे नाव देण्यात आले होते.
गुलामगिरीविरुद्ध लढा
१८४३साली केंटकीमधील कॅरल्टन शहराजवळच्या फ्रांसिस गिल्टनरने आपल्या गुलाम ॲडम क्रॉसव्हाइटची चार मुले तिऱ्हाइत व्यक्तीस विकण्यास काढली. याचा सुगावा लागताच क्रॉसव्हाइट आपल्या कुटुंबासह गिल्टनरच्या वाडीतून पळून गेला. लपतछपत उत्तरेकडी प्रवास करीत क्रॉसव्हाइट कुटुंब मार्शलमध्ये पोचले. फ्रांसिस गिल्टनरने आपली मालमत्ता परत मिळविण्यासाठी स्वतःचा मुलगा डेव्हिड व इतर काही लोकांना क्रॉसव्हाइटच्या मागावर पाठविले.
२६ जानेवारी, १८४७ च्या सकाळी या टोळक्याने क्रॉसव्हाइटच्या घराचे दार ठोठाविले. क्रॉसव्हाइट कुटुंबाने आरडाओरडा करताच गावातील सुमारे शंभर व्यक्ती त्यांच्या मदतीस धावून आले. गिल्टनर आणि त्याच्या सशस्त्र टोळक्याने या लोकांना धमकाविले व त्यांची नावे लिहून घेतली. त्यांना न घाबरता मार्शलमधील लोकांनी आपली नावे शुद्धलेखनासहित दिली व गिल्टनरला हुसकावून लावले.