Jump to content

मार्मिक (साप्ताहिक)

मार्मिक
प्रकार साप्ताहिक
विषय राजकीय
भाषा मराठी
संस्थापक संपादक बाळ ठाकरे
कार्यकारी संपादक मुकेश माचकर
संपादक रश्मी उद्धव ठाकरे
माजी संपादक बाळ ठाकरे
स्थापना 13 ऑगस्ट 1960; 64 वर्षां पूर्वी (1960-०८-13)[]
पहिला अंक
देश भारत
मुख्यालय मुंबई
संकेतस्थळ https://emarmik.com/

मार्मिक हे मराठी भाषेमधील व्यंगचित्रांनी युक्त असलेले साप्ताहिक आहे. हे साप्ताहिक मुंबईहून प्रकाशित होते. व्यंगचित्र साप्ताहिक अशी ओळख आहे.[]

आरंभ

१९५० ते १९६० पर्यंतचा संयुक्त महाराष्ट्र समितीचा लढा हा मराठी माणसाचा एकजुटीचा पहिला लढा. मोर्चा, आंदोलने, निषेध सभा, निवडणुका यांनी भरगच्च भरून गेलेला हा इतिहास. या इतिहासातूनच मराठी माणसाचे असे मत झाले की लढल्याशिवाय मराठी माणसाला काही मिळतच नाही. महाराष्ट्राबद्दल केंद्र सरकारच्या मनात आकस आहे. आपण संघटीत झालो तर आपले हित साधू शकलो हेही मराठी माणसाला कळून आले आणि नेमकी त्याच वेळी ‘मार्मिक’ची सुरुवात झाली.

शिवसेनेच्या स्थापनेची बीजे ‘मार्मिक’मध्ये दिसून येतात. त्या ‘मार्मिक’चा इतिहास मनोरंजक आहे.

सुरुवातीच्या काळात बाळासाहेब ‘फ्री प्रेस’ मध्ये नोकरी करीत असत. त्या नोकरीतून कुटुंब चालविण्याइतकी प्राप्ती होत नसे. मग बाळासाहेब लिंटास कंपनी किंवा वेगवेगळी नियतकालिके, अंक, संख्या यांची कामे घरी घेऊन येत आणि करीत असत. कुणाच्या जाहिरातीचे डिझाईन करून देणे, कुणाचे स्केचिंगचे काम कर, कुणाचे चित्र काढू दे असली कामे करून संसाराला हातभार लावण्याचा खटाटोप ते करीत. ही कामे करण्यासाठी रात्र रात्र जागत असत. हळूहळू प्रपंचाच्या गरजा वाढू लागल्या आणि एक दिवस ते प्रबोधनकारांना म्हणाले,

“दादा, मी स्वतःचं काही तरी नवीन सुरू करीन म्हणतो. मला माझ्या कामाचा पूर्ण मोबदला मिळातो असं वाटत नाही. म्हणून नोकरी सोडाण्याचा विचार करीत आहे.”

दादा म्हणाले, “सोडून दे नोकरी. त्यात कसला विचार करतोस, पण पुढे काय करणार ?”

“एक साप्ताहिक काढीन म्हणतो. व्यंगचित्र साप्ताहिक. असं साप्ताहिक सध्या नाही म्हणून ते चांगलं चालेल असं मला वाटतं.”

“उत्तम विचार आहे. कर सुरू,” दादा म्हणाले.

“पण नाव काय द्यायचं?” बाळासाहेबांनी विचारले.

“मार्मिक”, दादा.

दादांनी सुचविलेले नाव बाळासाहेबांना आवडले. वितरणाची सारी जबाबदारी श्री. बुवा दांगट यांच्यावर टाकण्यात आली. आता फक्तं मजकूर, छापखाना, कागद एवढेच बाकी राहिले. पहिल्या अंकापासून मालक, मुद्रक, प्रकाशन ‘ठाकरे बंधू’ व संपादक ‘बाळ ठाकरे’ अशी मांडणी ठरली. स्वतःचा छापखाना निघेपर्यंत अंक बाहेरून छापून घेण्याचे ठरविण्यात आले. मराठीत त्या काळात एकही व्यंगचित्र साप्ताहिक नव्हते. ‘शंकर्स विकली’ हे दिल्लीहून प्रसिद्ध होणारे व्यंगचित्र साप्ताहिक सोडले तर अन्य कोणतेही व्यंगचित्र साप्ताहिक संपूर्ण भारतात नव्हते. शेवटी ‘मार्मिक’चा प्रकाशनाचा दिवस ठरला. तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते १३ ऑगस्ट, १९६०ला प्रकाशन करावे असाही निर्णय झाला. प्रख्यात मासिक ‘धर्नुधारी’चे मालक व संपादक सगळे बंधू यांच्या छापखान्यात छपाईसाठी ‘मार्मिक’ गेला. अचानक त्यांनी ती जबाबदारी घेऊ शकत नसल्याचे सांगितले. मोठीच अडचण आली परंतु ‘आवाज’ या विनोदी वार्षिकाचे मधुकर पाटकर हे मदतीला धावून आले आणि त्यांनी ‘मार्मिक’ छापण्याची जबाबदारी घेतली.

दादरच्या बालमोहन विद्यालयाच्या हॉलमध्ये ‘मार्मिक’च्या प्रकाशनाचा दिमाखानच सोहळा मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते पार पडला. प्राध्यापक अनंत काणेकरही त्यावेळी उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना यशवंतराव म्हणाले,

“आज मी येथे रसिक म्हणून उपस्थित आहे. बाळ ठाकरे यांची व्यंगचित्रं मी नेहमीच आवडीने पहातो. अनेकदा मीही त्यांच्या कुंचल्याचा विषय ठरत असतो. त्यांच्या कुंचल्याचे बोचरे फटकारे ते त्यांच्या व्यंगचित्रातून मारत असतात, पण तो सगळा आनंददायी भाग असतो. त्यांच्या व्यंगचित्रांमुळे आम्हाला अंतर्मुख होण्याची संधी मिळते. जनतेची प्रतिक्रिया कळू शकतेर. त्यांच्या या नव्या साप्ताहिकाला माझ्या शुभेच्छा.”

१९५५ पासून ते १९६० पर्यंतचा कालखंड हा संयुक्त महाराष्ट्र समितीच्या लढ्याचा कालखंड होता. १९६० पासून १९६५ पर्यंतचा कालखंड हा ‘मार्मिक’चा कालखंड म्हणावा लागेल. पुढे ‘मार्मिक’ केवळ एक व्यंगचित्र साप्ताहिक राहिले नाही. मुंबई सह संयुक्त’ महाराष्ट्र झाला परंतु मुंबईत मराठी माणसाच्या हाल-अपेष्टा चालूच राहिल्या. हा मराठी माणूस ‘मार्मिक’ कडे फार मोठ्या आशेने पाहू लागला.

१ मे १९६६ च्या मार्मिक मध्ये “मराठी राज्यांत मराठी माणसांची ससेहोलपट” असा अग्रलेख प्रसिद्ध झाला. या अग्रलेखात … ‘प्रांतहित की राष्ट्रहित?’ असा प्रश्नठ ज्या ज्या वेळी उपस्थित होईल, त्या त्या वेळी राष्ट्रहितापुढे प्रांतहिण गौणच मानले पाहिजे, असे बाळासाहेब म्हणाले. आपली विशुद्ध राष्ट्रवादीची भूमिका मांडताना ते पुढे म्हणतात, “आम्ही याच विशुद्ध राष्ट्रावादी भूमिकेचे कट्टर पुरस्कर्ते आहोत. पण स्वतःच्या प्रांताचीं न्याय्यनी वाजवी गाऱ्हालणी कडाडून मांडणे, त्यासाठी भांडणे हा संकुचित प्रांताभिमान आणि आपल्या प्रांतांतील जनतेचं अकारण नुकसान होत असलं तरी ते मुकाट्याने सहन करणे हा विशाल राष्ट्राभिमान, ही संपूर्णतः तत्त्वदृष्ट, तर्कदृष्ट व व्यवहार दृष्ट भूमिका मात्र आम्हांला साफ नामंजूर आहे.”

त्याच अग्रलेखात त्यांनी, “महाराष्ट्रात असंख्य लोक तांदूळ खाणारे आहेत. पण महाराष्ट्रभर पुरेसा तांदूळ उपलब्ध नाही, महिना महिना लोकांना तांदळाचे दर्शन घडत नाही. केरळनी बंगाल येथील लोकांनी तांदळासाठी दंगे केले आणि मराठी माणूस मात्र सोसत राहीला” अशी तक्रार केली आहे. जसे अन्नाोचे तसेच वस्त्राच्या बाबतीतही. कापड गिरण्या परप्रांतीयांच्या मालकिच्या आहेत. त्या बंद पडतात आणि मराठी माणूस बेकार होतो अशीही तक्रार केली.

“महाराष्ट्रात निघणाऱ्याल सरकारी कारखान्यांना महाराष्ट्र शासनाने जमीन, वीज, पाणी इत्यादी सर्व सोयी मिळवून द्यायच्या आणि कारखाने उभारल्यानंतर त्यामध्ये परप्रांतीय बिगर मराठी लोकांना प्रचंड रोजगार उपलब्ध करून मराठी प्रजेची बेकारीनी उपासमारी वाढवायची हे योग्य आहे का?” असा प्रश्नर निर्माण केला.

याच अंकात त्यांनी ‘तुर्भ्याच्या खत कारखान्यांत परप्रांतीय मुजोर’ असे म्हणून एक यादी प्रसिद्ध केली.

तुर्भ्याच्या खतकारखान्यात परप्रांतीय मुजोर मुंबईला तुर्भे येथे सरकारी खत कारखाना निघाला.

यांत अधिकारी कोण आहेत?

वाचा यादी –

  • जनरल मॅनेजर- एम.एस.राम
  • जनरल कन्स्ट्रक्शन सुपरिंटेडंट- एम.एस.एन.भगवान
  • डेप्युटी चीफ अकौंट्सप ऑफिसर- भिशन्तंलाल
  • डे. चीफ प्रॉडक्शन इंजिनिअर- वेंकट्कृष्णन
  • एम.एस.एल.सिंहन; रामस्वामी
  • पर्चेस ऑफिसर- आर. प्रसाद
  • ज्यु. पर्चेस ऑफिसर- नरेंद्रन जॉर्ज
  • एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर- टी.एन.सरकार चंद्रशेखरन
  • असिस्टंट पर्सनल ऑफिसर- एन.के.दासगुप्ता
  • जनरल फोरमन- रामस्वामी
  • प्लान्ट इंजिनिअर- सी.के.टंडन
  • प्लान्ट मॅनेजर- कृष्णराव मित्रा आगरवाल
  • चीफ प्रोजेक्ट ऑफिसर- एच.ए.बाहा
  • चीफ अकौंट्सो ऑफिसर- टी. एस.सुब्रानिमन
  • पब्लिक रिलेशन्स ऑफिसर- श्री. भूपाल
  • डे. चीफ प्रॉडक्श न इंजिनिअर- बी.एस.कालिया
  • एच.के.गुप्ता; नागर; व्हर्गीज
  • ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर- माणकताला
  • चीफ इंजिनिअर- आर.के.घोष
  • चीफ पर्सनल ऑफिसर- ए.एन.नेब
  • जनरल फोरमन (इले.)- एस.एस.सौद
  • एस.एन.जैन;राधाकृष्णन

या संपूर्ण यादीत ‘शेळके’ एवढे एकच नाव मराठी आहे. बाकी एकूणएक परप्रांतीय! आता आफळे आणि कर्णिक असे दोघे मराठी अधिकारी घेतले आहेत. पण बहुसंख्य परप्रांतीयच!

हा महाराष्ट्रावर अन्याय आहे.

त्याचबरोबर ‘पिंपरीच्या कारखान्यांत सगळे यंडूगुंडू!’ असे म्हणून तेथील अधिकाऱ्यांची यादीसुद्धा त्यांनी छापली व त्या १४ अधिकाऱ्यांच्या यादीमध्ये सर्व अधिकारी एकूणएक परप्रांतीय असल्याचे निदर्शनास आणले. यादीच्या शेवटी ‘हा महाराष्ट्राचा उपमर्द आहे’ असे ते म्हणाले.

पिंपरीच्या कारखान्यात सगळे यंडूगुंडू

पिंपरी येथील पेनिसिलिन कारखान्यात वरिष्ठ जागेवर काम करण्यास सरकारला कोणते अधिकारी मिळाले?

पहा ही यादी.

  • मॅनेजिंग डायरेक्टर- सी.ए.सुब्रम्हण्यम
  • कंपनी सेक्रेटरी- व्ही.ए.सुंदरम
  • चीफ मयकॉलॉजिस्ट- डॉ. गोपालकृष्णन
  • डे. सुपरिंटेंडंन क्वाीलिटी कंट्रोल- डॉ.के.एम.वर्धन
  • पब्लिक रिलेशन्स ऑफिसर- श्री. मोटुलु
  • वर्क्स मॅनेजर- बी.व्ही.रामन
  • रिसर्च सुपरिंटेंडंट- डॉ.एम.जे.तिरुमालाचारी
  • सुपरिंटेंडंन क्वांलिटी कंट्रोल- डॉ.एम.आर.सर्वोत्तम
  • डेप्युटी सुपरिंटेंडंन (रिसर्च)- एन.एन.चारी
  • डेप्युटी सुपरिंटेंडंन- बी.ए.राजन
  • सुपरिंटेंडंन प्रोडक्श न- एस.आर.सेना
  • सिक्युटरिटी ऑफिसर- श्री. रावत

हे सर्व अधिकारी एकूणएक परप्रांतीय आहेत. या औषधी कारखान्यात, औषधालाही मराठी माणूस दिसू नये याची काहीच लाजशरम मराठी प्रशासनाला कशी वाटत नाही?

हा महाराष्ट्राचा उपमर्द आहे. हे सर्व सुरू असताना त्यांनी आपल्या व्यंगचित्रांच्या माध्यमातून आपल्या टीकाकारांचा समाचार घ्यायला सुरुवात केली. बाळासाहेबांचे व्यंगचित्र म्हणजे चाबकाचे फटकारे.

२२ मे, १९६६ रोजीच्या ‘मार्मिक’च्या पहिल्या पानावर ‘कायमचे सूर्यग्रहण’ हे व्यंगचित्र छापले. या सूर्याला ‘यंडूगुंडूंचे लोंढे’ हे ग्रहण लागले होते असे दाखविले आणि मराठी माणूस तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना विचारतो आहे, “हे खग्रास ग्रहण केव्हा सुटणार?” असा मजकूर लिहिला, तर ३ जुलै, १९६६ च्या अंकात ‘नागमोडी धोरण’ अशा मथळ्याखाली ठाकरी भाषेत मराठी माणसे नागमोडी धावणाऱ्याी ‘काँग्रेस’च्या बैलाला म्हणाला, “बैलच त्यो. त्यो काय सरल मुतनार?” असे म्हणून काँग्रेसच्या धोरणावर टीका केली.

‘मार्मिक’मधील त्यांची ‘रविवारची जत्रा’ असंख्य व्यंगचित्रांमुळे गाजत असे. ज्यावेळी आचार्य अत्रे यांच्याशी त्यांचा संघर्ष सुरू झाला त्यावेळी या व्यंगचित्रांच्या जोरावर त्यांनी अत्र्यंना नमविले. असे म्हणतात की त्या काळात महाराष्ट्राचे मंत्री सर्वात जास्त घाबरत ते मार्मिकला. ९ जून, १९६८ च्या ‘मार्मिक’मधील त्यांची यशवंतराव चव्हाणांवरील व्यंगचित्रेसुद्धा दीर्घकाळ गाजत राहीली.

‘मार्मिक’च्या पहिल्या पानावरचे ब्रीदवाक्यी “खींचो न कमानको, न तलवार निकालो; जब तोप मुकाबिल है, तो अखबार निकालो” हे खरोखर लेखनाचे आणि कुंचल्याचे सामर्थ्य दाखविणारे वाक्य, ठरले.

मराठी माणसाला चीड आणण्यासाठी ’मार्मिक’ने सतत काम केले. शिवसेना पुढे जाण्यामध्ये, मोठी होण्यामध्ये आणि यशस्वी होण्यामध्ये ‘मार्मिक’चा सिंहाचा वाटा आहे.

  1. ^ "Balasaheb Thackeray, Shiv Sena and the son of the soil". Mrityunjay Bose. Deccan Herald. 17 November 2019. 31 March 2020 रोजी पाहिले.
  2. ^ "मार्मिक विषयी". मार्मिक (इंग्रजी भाषेत). 2022-08-14 रोजी पाहिले.