मामासाहेब जगदाळे
निवृत्ती गोविंदराव जगदाळे उर्फ कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे (फेब्रुवारी ४, इ.स. १९०३ - मे ३०, इ.स. १९८१) हे महाराष्ट्रातील एक शिक्षणप्रसारक आणि समाजसुधारक होते. कर्मवीर भाऊराव पाटील[१], शिक्षण महर्षी डॉ.बापूजी साळुंखे[२], पंजाबराव देशमुख यांनी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात बहुजनांच्या शिक्षणासाठी प्रसार व्हावा यासाठी संस्था निर्माण केल्या होत्या. यांचे बरोबरीनेच कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. मामांचा उल्लेख बहुजनांच्या शिक्षणाचे कैवारी म्हणून केला जातो. पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर[३] व मराठवाड्यातील उस्मानाबाद[४] या सीमावर्ती भागात बहुजन मुलांना शिक्षण घेणे शक्य व्हावे म्हणून बार्शी येथे ‘श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ ’ स्थापन करून शिक्षणप्रसार केला. संस्थेची बोर्डिंगे, प्राथमिक शाळा (५), माध्यमिक शाळा (१४), उच्च माध्यमिक (१४ ),द्विलक्षी व किमान कौशल्य अभ्यासक्रम (५ ठिकाणी), महाविद्यालये (५ ), कृषितंत्रनिकेतने (२), नर्सिंग महाविद्यालय[५] (१), दवाखाना, शेती, धेनुसंवर्धन, तांत्रिक शिक्षण, छापखाना यांचे मूर्तस्वरूप आज सन २०१८मध्ये लक्षात येते. हे पथदर्शक दिशा देण्याचे द्रष्टेपण मामांच्या विचारात व कृतीत होते. गरीब व होतकरू मुलांना मोफत शिक्षण दिले पाहिजे, पैशावाचून बहुजनांच्या मुलांचे शिक्षण थांबले नाही पाहिजे यासाठी त्यांनी अहोरात्र प्रयत्न केले. त्यामागे उदात्त ध्येयवाद, त्याग व सेवा तसेच कामाची तळमळ व निष्ठा या गोष्टी होत्या. काम करून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिक रोजगार देत जेणेकरून त्या विद्यार्थ्याला आणि संस्थेला मदत होईल.[स्मरणिका १]
चरित्र
मामासाहेब जगदाळे यांचा जन्म उस्मानाबाद जिल्ह्यातील भिकार सारोळे (ता. वाशी) या गावी वारकरी कुटुंबात झाला. त्यांचे मूळ गाव चारे (बार्शी)[६] हे सोलापूर जिल्ह्यातील आहे. या गावाचा शेती[७] हा प्रमुख व्यवसाय. जगदाळे कुटुंबाने शेती करत असताना वारकरी संप्रदायाची पताका हाती घेतली. संपूर्ण कुटुंब भक्तिमय झाले. वडील गोविंदराव व आई मुक्ताबाई यांच्याकडून मामांना संस्काराची शिदोरी मिळाली. बालपण चारे गावात गेले. खरे तर मामा हे वयाच्या दहाव्या वर्षी शाळेत गेले. चारे गावात तिसरीपर्यंत शिक्षण घेण्याची सोय होती. पुढील शिक्षणासाठी कुटुंबाचा विरोध पत्करून बार्शी येथे शिक्षण घेतले. मामा सातवीची परीक्षा १९२३ साली व इंग्रजी माध्यमातून मॅट्रिकची परीक्षा १९३० साली उत्तीर्ण झाले. १९३१ मध्ये मामांनी ‘ सोलापूर को- ऑपरेटिव्ह सुपरवायझिंग युनियन’चे सुपरवायझर म्हणून काम केले. परिस्थितीमुळे आपणास उच्च शिक्षण घेता आले नाही हे ओळखून बहुजन समाजातील मुले शिकली पाहिजेत. यासाठी मामांनी १९३४ मध्ये बार्शी येथे श्री शिवाजी बोर्डिंगची स्थापना केली. सुभद्रा अक्का यांना विनंती करून आपल्या दोन भाच्यांना बोर्डिंग मध्ये ठेवून सुरुवात केली. बोर्डिंगसाठी मामा गावोगावी जाऊन धान्य मागत असत. सुरुवातीला बोर्डिंगसाठी जागा नव्हती. १९४३ साली शिवाजी बोर्डिंगच्या इमारतीचे काम पूर्ण झाले. आज त्याचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे. मामांच्या जीवनावर छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम, महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांचा प्रभाव होता. श्रमाची प्रतिष्ठा ओळखून मामांनी ‘कमवा व शिका’सारखी योजना प्रत्यक्ष राबवली.[८] वा.म. कुदळे, कृ.ग. राऊत, श्री.सं.मा.बरांगुळे, श्री.बा.गे.मोहिते, श्रीमती डॉ.शकुंतला करपे, श्री. भ.र.कांबळे, श्री. टी.बी.जगदाळे, मामांच्या मानसकन्या आमदार सौ.शैलजाताई शितोळे, जनाब नजीरद्दीन नाईकवाडी, श्री.अंबादास पाटील, श्री.श्रीरंग रेवडकर, श्री. डॉ.चतुर्भुज शितोळे, श्री.बापूराव मोहिते हे मामांचे सहकारी होते.[९]
श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ
संस्थेचे नाव श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शी आहे. संस्थेचे मुख्य कार्यालय बार्शी येथे आहे. संस्थेचे ध्येय आणि उद्दिष्ट यांना अनुसरून व्यस्थापन समितीचे प्रशासन कार्यान्वित आहे.[१०]
हॉस्पिटल
ग्रामीण भागातील गोर-गरीब लोकांना आरोग्यसेवा मिळावी या उद्देशाने बार्शी येथे जगदाळे मामा हॉस्पिटलची[११]’ स्थापना ४ फेब्रुवारी १९७५ रोजी केली.[१२] या रुग्णलयात बाह्यरुग्ण, आंतररुग्ण, न्युरो सर्जरी विभाग, प्लास्टिक सर्जरी विभाग, शल्यचिकित्सा विभाग, क्ष-किरण विभाग, औषधशास्त्र विभाग, स्रीरोग व प्रसूती विभाग, बालरोग विभाग, नेत्ररोग विभाग, अस्थिरोग विभाग, नाक-कान-घसा विभाग, अतिदक्षता विभाग, दंतरोग विभाग, त्वचारोग विभाग, पॅथॉलॉजी विभाग, आयुर्वेद विभाग, फिजीओथेरपी व रिहॅबलिटिशन इत्यादी विभाग कार्यरत आहेत. सी.टी.स्कॅन, ट्रॉमा युनिट तसेच ३५० बेड्स आहेत. गरजूंना अल्पदरात वैद्यकीय सेवा दिली जाते. शिक्षण संस्थेमार्फत हे हॉस्पिटल चालविले जाते.[१३]
स्मृती संग्रहालय
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे ‘कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे स्मृती संग्रहालय’ स्थापन करण्यात आले आहे. डॉ. सुनीलकुमार लवटे यांचे स्मारकाची उभारणीमध्ये मोठे योगदान आहे.[१४]
संग्रहालय - दृष्टिक्षेपात
- जीवन व कार्याचे शिल्प आहे. प्रेरणा आणि कृतज्ञतेचा अविस्मरणीय संगम.
- मामांचे जीवन, कार्य, विचारांची जिवंत, दृक-श्राव्य अनुभूती देणारा चित्रपट कक्ष .
- मामांच्या कार्य प्रेरणांची प्रस्तुती.
- संस्था स्थापना, शाखा विस्तार यांच्या छायाचित्र कागदपत्रांचे दुर्मिळ संग्रहण.
- बोर्डिंगचा संसार
- संस्थेचे कार्यालय हेच मामांचे घर
- आरोग्य मंदिर ते ट्रॉमा युनिट - आरोग्य सेवेचा विस्तार व भविष्यवेध
- मान-सन्मान, पुरस्कार, पदवी, प्रकाशन सर्वांचे हृदयस्पर्शी प्रदर्शन[९]
पुरस्कार
मामासाहेब जगदाळे यांना मराठवाडा विद्यापीठाने २४ फेब्रुवारी १९८० रोजी 'डी.लिट' पदवी तसेच महात्मा फुले कृषी विद्यापीठाने 'डॉक्टर ऑफ सायन्स' ही पदवी देऊन गौरव करण्यात आला आहे.
संस्थेस मिळालेले पुरस्कार
- संस्था गटातील राज्यस्तरीय द्वितीय क्रमांकाचा ‘वनश्री’पुरस्कार
- सोलापूरचा ब्रम्हदेव माने – कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार १९९८
- महाराष्ट्र शासनाचा दलित मित्र पुरस्कार २००३
- नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती शैक्षणिक पुरस्कार. २०१३[१५]
चित्रपट
मामासाहेब जगदाळे यांच्या जीवनकार्यावर श्री यशवंत भालेकर यांनी लघुपट केला आहे. तसेच 'आम्ही बार्शीकर एक परिवार (राहुल जगदाळे[१६])' यांनी 'कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे' नावाचा माहितीपट बनवला आहे.[१५]
संस्थांची स्थापना/संक्षिप्त जीवनपट
- १९३४ – श्री शिवाजी मराठा बोर्डिंगची स्थापना.
- ३० नोहेंबर १९४७ – संत गाडगेबाबा यांच्या हस्ते मुलींसाठी 'भारतीय बालिकाश्रम' वसतिगृहाची स्थापना.
- ४ डिसेंबर १९५१ – जनता विद्यालय येडशी.
- एप्रिल १९५४ – बार्शी येथे शंकरराव निंबाळकर अध्यापक विद्यालयाची स्थापना.
- जून १९५४ - महाराष्ट्र विद्यालय, बार्शी
- जून १९५४ महात्मा गांधी विद्यालय, काटेगाव
- जून १९५६ वखारिया विद्यालय, उपळे (दुमाला)
- जून १९५६ जयहिंद विद्यालय, कसबे तडवळे
- जून १९५६ भारत विद्यालय, उस्मानाबाद
- ११ जून१९५८ छत्रपती शिवाजी विद्यालय, वाशी
- १९५८ लोकसेवा विद्यालय, आगळगाव
- १ जून १९५८ किसान कामगार विद्यालय, उपळाई (ठोगे)
- १० जून १९६० महाराष्ट्र संत विद्यालय, तेर
- १८ जून १९६० श्री शिवाजी महाविद्यालय, बार्शी[१७]
- जून १९६१ संत तुकाराम विद्यालय, पानगाव
- जून १९६१ संत ज्ञानेश्वर विद्यालय, भातंबरे
- ४ जून १९६३ महात्मा फुले विद्यामंदिर, बार्शी
- जून १९६३ कर्मवीर विद्यालय, चारे
- ७ जून१९६६ शिक्षणशास्त्र महाविद्यालय, बार्शी
- १९६८ जिजामाता विद्यामंदिर, बार्शी
- १ जून१९६९ बी.पी.सुलाखे कॉमर्स कॉलेज, बार्शी[१८]
- १७ जुलै १९७२ कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय, वाशी[१९]
- १९७२ राजर्षि शाहू विधी महाविद्यालय, बार्शी
- ४ फेब्रुवारी १९७५ ‘जीवन संग्राम’ साप्ताहिक सुरू करण्यात आले
- ४ फेब्रुवारी १९७५ कर्मवीर जगदाळे मामा हॉस्पिटल
- १९८९ जिजामाता कन्या प्रशाला, बार्शी.
- २० जुलै १९८७ कर्मवीर बालविद्यामंदिर प्राथमिक शाळा, उस्मानाबाद.
- १९९० बालसंस्कार प्राथमिक विद्यामंदिर, वाशी.
- १९९०पासून - ४ फेब्रुवारी या मामासाहेब जागदाळे यांच्या जन्मदिनी ‘समाज दिन’ साजरा केला जातो.
कर्मवीर समाज परिवर्तन गौरव पुरस्कार
कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शैक्षणिक व सामाजिक कार्याबद्दल २००८ पासून पुरस्कार दिला जातो. आजवर हा पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती :-
- जी.डी. लाड २००८
- नागनाथअण्णा नाईकवाडी २००८
- गेल ओमव्हेट २००९
- मा.आमदार गणपतराव देशमुख २०१०
- आ.ह. साळुंखे २०११
- डॉ. सुनीलकुमार लवटे २०१२
- भालचंद्र मुणगेकर २०१३
- माजी प्राचार्य अनिरुद्ध जाधव २०१५
- डॉ. नरेंद्र दाभोलकर ( मरणोत्तर) २०१६-१७
- डॉ. रमणलाल दोशी २०१८[१५]
- डॉ. राजेंद्र भारूड २०१९
- मा. श्री. पन्नालालभाऊ प्रेमराज सुराणा
मामासाहेब जगदाळे यांची चरित्रे
- ज्ञानतपस्वी - कर्मवीर मामासाहेब जगदाळे (व.न. इंगळे )
शिक्षणाची गंगोत्री खेड्यापाड्यातल्या बहुजन समाजापर्यंत पोचावी, त्यांना आत्मभान यावे आणि कर्तृत्वसंपन्न आणि चारित्र्यसंपन्न पिढी घडवावी, या उद्देशाने कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांनी एका विद्यार्थ्याला घेऊन १९३४ मध्ये बार्शी येथे श्री शिवाजी मराठा बोर्डिंग सुरू केले.त्यांच्या तेजस्वी कार्याचा परिचय प्राचार्य व. न. इंगळे यांनी "ज्ञानतपस्वी' या ग्रंथात अत्यंत ओघवत्या शैलीत करून दिला आहे. या चरित्रग्रंथातील सत्तावीस प्रकरणांतून मामासाहेबांच्या समग्र जीवनावर प्रकाश टाकण्याचा लेखकाचा हा प्रयत्न स्तुत्य आहे.मामांनी दिलेले स्वावलंबनाचे धडे, उद्योग-व्यवसायांचे त्यांनी ओळखलेले महत्त्व व वसतिगृहयुक्त विद्यालयातून प्राचीन गुरुकुलाचे त्यांनी केलेले पुनरुज्जीवन, एखाद्या वटवृक्षाप्रमाणे विस्तारत गेलेले त्यांचे कार्य, मामांचे शैक्षणिक तत्त्वज्ञान, संस्थेकडे एक स्वयंपूर्ण विद्यापीठ म्हणून पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन या साऱ्याची नेमकी मांडणी अतिशय समर्पक शब्दांत इंगळे यांनी केली आहे. 'इथे ओशाळला मृत्यू' हा मामांच्या मृत्यूसंदर्भातला लेख काळजाला चटका लावून जाणारा आहे. बोलीभाषेच्या यथायोग्य वापर, हे या चरित्राचे खास वैशिष्ट्य.- प्रा. मिलिंद जोशी
कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांचे शैक्षणिक कार्य एका विशिष्ट प्रदेशापुरते मर्यादित राहिलेले आहे. तरीही त्याचं मोल कमी लेखता कामा नये. आज शिक्षणाची गंगा दारोदार पोहचली आहे. पण ज्या काळात शिक्षण ही मूठभरांची मक्तेदारी होती. त्याकाळात ही ज्ञानगंगा त्यांनी दारोदार -पोहोचविली हे आपण विशेषत्वाने लक्षात घेतले पाहिजे. कोणत्याही कामाचे मूल्यमापन करताना केवळ विस्तार लक्षात घेऊन चालत नाही, तर त्या कामाची व्याप्ती, सखोलता व ज्या परिस्थितीत हे काम केले आहे ती परिस्थिती लक्षात घेणे आवश्यक आहे. अर्थात कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांचं जीवितकार्य हे केवळ शिक्षण क्षेत्रापुरते मर्यादित नव्हतं हे हा चरित्रगंथ वाचल्यानंतर लक्षात येईल. - रा. रं. बोराडे[८]
- समाजवादाचे पुरस्कर्ते - कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे (भारती रेवडकर)
आज जागतिकीकरणाच्या काळात मामासाहेबांसारख्या समाजवादाचा पुरस्कार करणाऱ्या शिक्षण महर्षींना व त्यांच्या कार्याची नितांत आवश्यकता आहे. सभोवतालच्या गढूळ व स्वतःभवती संकुचित झालेला माणूस व त्यांची वृत्तीप्रवृत्ती मर्यादित झाली आहे. सुजलाम, सुफलाम बुद्धिप्रामाण्यवादी व व्यापक दृष्टीने कार्य करणाऱ्या मानवतावादी विचारसरणीला कवेत घेणाऱ्या विचार व कार्यव्यवस्थेची आज बैठक तयार व्हायला हवी. यासाठी मामासाहेबांच्या व्यापक कार्याचा व विचारसरणीचा आदर्श थोडक्यात या पुस्तकेतून मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
-डॉ. भारती रेवडकर
- कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे - शैक्षणिक तत्त्वज्ञान_भारती रेवडकर
डॉ. मामासाहेब जगदाळे यांनी समाजासाठी कार्य करून समाजपरिवर्तनासाठी मोठे योगदान दिले आहे. त्यांनी शिक्षण, समाजशिक्षण, विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास, प्रशासन, शाळा या संकल्पनांच्या व्याख्या लिहिल्या नाहीत किंवा स्वतःची विविध विचाराबद्दलची भूमिकाही लिहून ठेवली नाही. लोकसहभाग, दूरदृष्टी, सातत्य, बहुजनांची तळमळ यांना सोबत घेऊन मनातील प्रत्येक कृती प्रत्यक्ष साकार करण्यासाठी प्रचंड परिश्रम घेतले. वेळोवेळी ठिकठिकाणी नियोजनबद्ध उपक्रमांना गतिमान करून मामासाहेबांनी शैक्षिणिक संस्थेच्या माध्यमातून समाजविकासाची चळवळ उभी केली. समाजशात्र्यज्ञ, समाजवादाचे पुरस्कर्ते, शिक्षणतज्ञ, उत्तम प्रशासक अशा मामासाहेबांच्या विविध भूमिका अभ्यासांती समोर आल्या त्याचाच परामर्श या ग्रंथात घेतला आहे. - डॉ. भारती रेवडकर[22][22]
- असे आपले मामा
असे आपले मामा हे डॉ. मामासाहेब जगदाळे यांचे छोटेखानी जीवन चरित्र.
लेखक - चंद्रकांत मोरे , प्रा . बबन रोडे ,
प्रकाशक - संतोषी प्रकाशन, औरंगाबाद .
- ज्ञानसूर्य -
कर्मवीर डॉ.मामासाहेब जगदाळे यांचे शैक्षणिक व सामाजिक कार्याचा आलेख प्रभावीरित्या प्रमोद लांडगे यांच्या कवितेतून आविष्कृत होतो.
कवी - प्रमोद लांडगे
प्रकाशन - त्रिमूर्ती प्रकाशन गृह , बार्शी
- बहुजनांच्या शिक्षणाचे कैवारी - कर्मवीर मामासाहेब जगदाळे - लेखक डॉ. जितेंद्र बलभीम जळकुटे
- असे आपले मामा (चंद्रकांत मोरे, बबन रोडे)
- आठवणीतील कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे (भालके कृष्णाजी - शब्दांकन डॉ. विष्णू शिखरे)-
- आपले मामासाहेब जगदाळे (चंद्रकांत मोरे)
- कर्मवीर जगदाळे मामांची जीवनगाथा (कुंताताई जगदाळे) [२०]
- कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे शैक्षणिक तत्त्वज्ञान (भारती रेवडकर)
- कर्मवीर स्मृती भाग १ व २ (भारती रेवडकर)
- तेजोनिधी (रजनीश जोशी)
- परीसस्पर्श (स्मरणिका)
- पेरणी (व.न. इंगळे, चंद्रकांत मोरे, नारायण जगदाळे, सी.बी. टिगरे, अ.न. सोनार)
- बहुजन शिक्षणाचे कैवारी कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे (जितेंद्र जळकुटे)
- शिक्षण पंढरीचा वारकरी (व.न. इंगळे) ref>https://msblc.maharashtra.gov.in/pdf/pdf/Maharashtrache%20Shilpkar-Mamasaheb%20Jagdale.pdf. External link in
|title=
(सहाय्य)</ref> २००२ - सुवर्णकळस (स्मरणिका)
- ज्ञानतपस्वी (व.न. इंगळे) – [२१] (२००६)
- ज्ञानसूर्य (प्रमोद लांडगे)
नियतकालिकांतील लेख :-
- ४ फेब्रु २०१८ दिव्य मराठी वर्तमानपत्र (लेखक : महादेव राऊत)
- ४ फेब्रुवारी २०१८ संघर्ष (हनुमंत काळे)
संदर्भ
- ^ "भाऊराव पायगौंडा पाटील".
- ^ "शिक्षण महर्षी डॉ. बापुजी साळुंखे यांचे कार्य बहुमूल्य".
- ^ "सोलापूर".
- ^ "उस्मानाबाद".
- ^ "नर्सिंग महाविद्यालय". 2018-06-15 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
- ^ "बार्शी".
- ^ "शेती".
- ^ a b इंगळे, व न (२००२). महाराष्ट्राचे शिल्पकार कर्मवीर मामासाहेब जगदाळे. मुंबई: महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई.
- ^ a b स्मृती संग्रहालय
- ^ संस्थेचा निवेदन पत्रिका मसुदा
- ^ "बार्शी".
- ^ "बार्शी".
- ^ "हॉस्पिटल".
- ^ स्मृती संग्रहालय.
- ^ a b c जळकुटे, जीतेंद्र (२०१५). कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे. पुणे: मल्हार पब्लिकेशन.
- ^ "राहुल जगदाळे".
- ^ "श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी". 2018-05-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
- ^ "b p sulakhe".
- ^ "k.m.j.m. washi".
- ^ "कर्मवीर जगदाळे मामांची जीवनगाथा" (PDF).
- ^ "ज्ञानतपस्वी".
- ^ परीस स्पर्श