Jump to content

मान कौर

मान कौर
जन्म १ मार्च १९१६ (1916-03-01)
ब्रिटिश भारत
मृत्यू ३१ जुलै, २०२१ (वय १०५)
मृत्यूचे कारणकर्करोग
राष्ट्रीयत्वभारत भारतीय
नागरिकत्व भारतीय
कारकिर्दीचा काळ २००९ - २०२१
ख्याती १०० वर्षांहून अधिक वयोगटाच्या श्रेणींमध्ये धावण्याचे जागतिक विक्रम केले

मान कौर (१ मार्च, १९१६ - ३१ जुलै, २०२१) ह्या एक भारतीय ट्रॅक आणि फील्ड ॲथलीट होत्या. त्यांनी विविध कार्यक्रमांसाठी १०० वर्षांहून अधिक वयोगटातील श्रेणींमध्ये धावण्याचे जागतिक विक्रम केले आहेत. वयाच्या १०३ व्या वर्षी त्यांना भारताच्या राष्ट्रपतींनी नारी शक्ती पुरस्कार प्रदान केला होता.

मान कौर यांचे पुत्र गुरदेव सिंग हे एक अनुभवी खेळाडू आहेत. ते पंजाब विद्यापीठाच्या ॲथलेटिक्स मैदानावर रोज धावत असत. इ.स. २००९ मध्ये, जेव्हा मान कौर वयाच्या ९० च्या आसपास होत्या तेव्हा त्यांनी आपल्या मुलासोबत पीयू ग्राउंडवर धावायला सुरुवात केली. रोज सकाळ संध्याकाळ त्या नियमित धावण्याचा सराव करत असत. त्यांची तळमळ आणि समर्पण पाहून गुरदेव सिंग यांनी त्यांना व्हेटरन ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले. त्यानंतर त्यांनी चॅम्पियनशिपमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली आणि मागे वळून पाहिले नाही. मान यांनी १२ वर्षात ८०हून अधिक पदके जिंकली होती.[]

वैयक्तिक जीवन

मान कौरची उंची सुमारे पाच फूट (१५० सेमी) होती आणि त्या मूळ पंजाबी भाषक होत्या.[] त्यांनी जागतिक मास्टर्स ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये अनेक सुवर्णपदके जिंकली.[][][]

२०२० मध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनी नारी शक्ती पुरस्कार विजेत्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी. कौर ही तळाच्या रांगेत उजवीकडे दुसऱ्या क्रमांकावर आहेत

वयाच्या ९३ वर्षांपर्यंत त्यांनी कधीही ॲथलेटिक्सचा सराव किंवा साधा विचार देखील केला नव्हता. इ.स. २०१६ मध्ये त्या अमेरिकन मास्टर्स गेम्समधील एका स्पर्धेत सर्वात जलद शतकवीर बनल्या.[]

इ.स. २०१७ वर्ल्ड मास्टर्स गेम्सच्या अपेक्षेने, कौरने पंजाबी युनिव्हर्सिटीमध्ये नियमितपणे प्रशिक्षण घेतले, स्वतःच्या विश्वविक्रमात सुधारणा करण्याच्या आशेने त्यांनी वर्षानुवर्षे सराव केला. त्यांचा स्वतःचा मुलगा गुरदेव सिंग, जे त्यावेळी ७९ वर्षाचे होते, तेच त्यांचे प्रशिक्षक होते.[] ऑकलंड, न्यू झीलंड येथे झालेल्या २०१७ च्या खेळांमध्ये त्यांनी १०० मीटर धावण्याची शर्यत ७४ सेकंदात पूर्ण केली.[]

इ.स. २०१९ मध्ये त्यांनी पोलंडमध्ये त्यांच्या श्रेणीतील चार स्पर्धा जिंकल्या - शॉट पुट, ६० मीटर स्प्रिंट, २०० मीटर आणि भालाफेक. त्यांनी ६० मीटर शर्यत ३६ सेकंदात पूर्ण केली.[] यानंतर त्यांना आणि गुरदेवला बारू साहिब येथील विद्यापीठाच्या दौऱ्यासाठी आमंत्रित करण्यात आले. जेथे त्यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या कर्तृत्वाबद्दल आणि आहाराविहाराबद्दल मार्गदर्शन केले. त्या भाषणांनुसार, त्यांच्या आहारात काजू, कडधान्ये, घरगुती सोया दूध, केफिर, गव्हांकुराचा रस आणि मोड आलेले गहू यांचा समावेश होता.[]

आपल्या वयाच्या १०३व्या वर्षी कौर यांनी डिसेंबर २०१९ मध्ये मलेशियात झालेल्या आशियाई मास्टर्स चॅम्पियनशिपमध्ये २०० मीटर डॅश आणि २.२१ मीटर शॉट पुटमध्ये सुवर्णपदक जिंकले.[]

८ मार्च (आंतरराष्ट्रीय महिला दिन) २०२० रोजी कौर यांना नारी शक्ती पुरस्कार प्रदान करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मान कौर ज्या तत्परतेने राष्ट्रपती भवनात सन्मान स्वीकारण्यासाठी मंचावर पोहोचल्या होत्या, ते पाहून राष्ट्रपतीही आश्चर्यचकित झाले. त्याचवेळी, पंतप्रधानांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीदरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचा फिटनेस पाहून हात जोडून त्यांच्यासमोर उभे राहिले.[१०] त्यांना "चंदीगडचा चमत्कार" असे टोपणनाव देण्यात आले.[]

पुरस्कार आणि सन्मान

विविध खेळ आणि वयोगटात खेळत दिवंगत मान कौर यांनी आठ जागतिक विक्रम केले. जगातील १० प्रसिद्ध शीख प्रभावशाली महिलांमध्येही त्यांचे नाव नोंदवले गेले. त्यांनी जगातील २५ देशांमध्ये झालेल्या मास्टर गेम्समध्ये भाग घेतला होता आणि ३५ पदके जिंकली होती. त्यांचा मुलगा गुरदेव सिंग यांनी सांगितले की, जर त्यांची तब्येत चांगली असती तर त्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी तोक्यो ऑलिम्पिकमध्ये गेल्या असत्या. जपानी वर्तमान पत्रात त्यांच्या बद्दल बातम्या देखील प्रसिद्ध झाल्या होत्या. परंतु त्यांनी जपानला जाण्यापूर्वीच जगाचा निरोप घेतला.[१०] त्यांनी १५ वर्षात ८०हून अधिक पदके जिंकली होती.[]

मृत्यू

पित्ताशयाच्या कर्करोगाने पीडित कौर यांचे वयाच्या १०५ व्या वर्षी ३१ जुलै २०२१ रोजी निधन झाले.[१०]

संदर्भ

  1. ^ a b "दुखद: चंडीगढ़ की अंतरराष्ट्रीय वेटरन एथलीट मान कौर का निधन, गॉल ब्लैडर के कैंसर से थीं पीड़ित". amarujala.com. १७ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
  2. ^ a b c "Whatever Happened To ... The 101-Year-Old Champion Runner From India?". NPR.org (इंग्रजी भाषेत). 12 May 2020 रोजी पाहिले.
  3. ^ "Man Kaur, 100-year-old runner from India, wins gold medal at Masters Games". The Indian Express. 30 April 2017 रोजी पाहिले.
  4. ^ "Man Kaur, oldest athlete at World Masters Games, now Auckland's oldest skywalker". stuff.co.nz. 30 April 2017 रोजी पाहिले.
  5. ^ "101-Year-Old Wins Four Gold Medals at the World Masters Games". runnersworld.com. 30 April 2017 रोजी पाहिले.
  6. ^ a b "Lady mason, centenarian athlete among 15 women conferred Nari Shakti Awards". The New Indian Express. 10 April 2020 रोजी पाहिले.
  7. ^ "101-year-old athlete Mann Kaur sets world record to win World Masters gold". Hindustan Times. 30 April 2017 रोजी पाहिले.
  8. ^ Bhattacharjee, Sumit (20 December 2019). "Man Kaur, a woman athlete who is going great guns at 103". The Hindu (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X. 21 March 2021 रोजी पाहिले.
  9. ^ Retrieved 24 March 2021, 2019 Asian Masters Championship Meet Results
  10. ^ a b c "इंटरनेशनल मास्टर एथलीट मान कौर की जिंदगी की दौड़ पूरी, चंडीगढ़ में हुआ निधन, पीएम मोदी रहे हैं फिटनेस के मुरीद".