Jump to content

मानवी वाघ

ही लोककला विदर्भात व विशेषतः नागपूर परिसरात प्रसिद्ध आहे. सन १९७२-१९७४ पर्यंत ही पहावयास मिळ्त होती. ती आता लोप पावत आहे. मानवी शरीरावर जंगलातल्या वाघासारखी रंग रंगोटी करून, डोक्यात केसाळ टोप घालून व वाघासारखे कान व शेपटी लावून वाद्याच्या तालावर मानवी वाघ नाचत असे. हा एक प्रकारचा बहुरुप्याचाच खेळ असे. या वेळेस, सनई (शहनाई) व ढोल, ताशे इत्यादी त्याचे सोबत असे. सनईच्या गोंडी तालावर मग हा वाघ डरकाळी फोडत व नाचत असे. लहान मुलांना भिवविण्यासाठी व त्यांची गम्मत करावयास त्यांचे अंगावर धावून जात असे. विशिष्ट ताल ऐकला की लहान मुले, बायाबापड्या वाघ बघावयास घराबाहेर येत असत व गोल उभे रहात. त्यामध्ये मानवी वाघ नाचत असे.

पोळा, गणपती, मस्कऱ्या गणपती, देवी, मारबत, मोहरम या सणांमध्ये विसर्जन सोहोळ्यात मानवी वाघ असेच. दिवसभर वेगवेगळ्या ठिकाणी नाचण्यासाठी मानवी वाघास खूपच दमदार असणे आवश्यक असे. त्यामुळे बहुधा पहेलवान लोकच वाघ बनत. आयुष्यभरात, २५-३० वेळा वाघ बनलेले लोक हयात आहेत. वाघ ओळखीच्या घरासमोर पण जाऊन नाचत असे. मग घरमालकाने दिलेली चलनाची नोट तोंडात घेऊन मग परत जाई.

नागपूर येथील राजे रघुजीच्या काळात, राजवाड्यावर होणाऱ्या प्रत्येक उत्सवाचे वेळी मानवी वाघाचा नाच होत असे.

या मानवी वाघाची रंगरंगोटी करणे हीसुद्धा एक कला आहे. या रंगकामात, पट्टेदार वाघ, ढोऱ्या वाघ, झेंडू वाघ, बिट्टु वाघ आदी समाविष्ट आहेत. नागपूर येथील चितार ओळीत, वाघ चितारणारे पेंटर होते व आहेत.

यामध्ये शरीरावर रंग लावला जात असल्यामुळे, शरीराची आग होत असते. शरीराची चामडी रंगामुळे ताणली जाते. नंतर, लावलेला रंग ८-१० दिवस निघत नाही. तो घासून काढावा लागतो. त्यानेही शरीराची आग होते. या सर्व त्रासांमुळे आधुनिक पिढी, हा वारसा चालवायला तयार नाही. कारण गोंडी तालाऐवजी ते डी.जे.च पसंत करतात.