Jump to content

मानगड

मानगड हा छोटा किल्ला रायगड जिल्ह्याच्या माणगाव तालुक्यातल्या निजामपूर गावाजवळ आहे. (रायगडाच्या पायथ्याचे छत्री निजामपूर आणि हे निजामपूर वेगळे आहे!)

किल्ल्याला जायचा मार्ग

पुण्याहून ताम्हिणी घाटातून किंवा मुंबईहून राष्ट्रीय महामार्ग ६६ मार्गावरील माणगावला येता येते. तेथून निजामपूर १० कि.मी. आहे. निजामपूर ते पाचाड रस्त्याने गेल्यास बोरवाडी आणि नंतर मशीदवाडी म्हणजेच पूर्वीची मानगडवाडी हे खेडे लागते. त्या गावापासून प्रशस्त पायवाटेने पंधरा-वीस मिनिटांच्या सोप्या चढणीने मानगडाच्या अर्ध्या वाटेवरचे विंझाईदेवीचे कौलारू देऊळ लागते. विंझाई देवीच्या मंदिरापासून खोदीव पायऱ्या चढून गेल्यावर दोन बुरुजांमध्ये बंदिस्त झालेला गडाचा दरवाजा दिसतो. आता दरवाज्याची कमान पडून गेली आहे. निजामपूरपासून गडापर्यंत अगदी माथ्यापर्यंत दिशादर्शक फलक लावलेले आहेत. दुर्गवीर नावाची संस्था गडाच्या संवर्धनाचे काम करते.

गडावर असलेल्या गोष्टी

  • विंझाईदेवीचे मंदिर
  • मंदिराजवळ दगडात कोरलेल्या दोन मूर्ती
  • जवळच एक छोटी दगडी दीपमाळ
  • दोन भक्कम बुरुज आणि मधे कमान नसलेला गडाचा दरवाजा
  • पडलेली कमान आणि तिच्यावरील मासा आणि कमळाचे शिल्प
  • प्रवेशद्वारातून आत जाऊन डावीकडे गेल्यावर एक कोठारसदृश खोली.
  • कोठाराच्या बाहेर एक व समोर एक अशी पाण्याची दोन टाकी. तिथून सरळ गेल्यावर दोन तीन मिनिटात पायथ्यावरून गडाचा माथा
  • प्रवेशद्वारातून आत जाऊन उजव्या हाताने गेले तरी गडमाथ्यावर जाता येते. पण तसे करू नये. त्या वाटेने गड उतरल्यास चहूबाजूचा किल्ला नीट बघता येतो.
  • गडमाथ्यावर एक ध्वजस्तंभ आणि पाण्याच्या दोन टाकी.
  • माथ्यावरून पायथ्याच्या मशीदवाडी गावाचे आणि कुंभ्या घाटाजवळच्या धन्वी शिखरांचे दृश्य.
  • ध्वजस्तंभापासून गाव डावीकडे ठेवून पुढे गेल्यास मानगडावरील काही जोत्यांचे अवशेष.
  • जोत्यांचे अवशेष पाहून पुढे गेल्यावर एक पीर आणि आणखी काही जोती.
  • मानगडावरचा लहानसा माथा अर्ध्या तासात पाहून झाल्यावर वरून आल्यावाटेने न उतरता विरुद्ध वाटेने थोडेसे उतरून निजामपूरच्या दिशेने चालू लागलो की उजवीकडे पाण्याच्या खोदीव टाक्यांची मालिका.
  • सरळ गेल्यावर शेवटी नव्यानेच सापडलेला आणि त्याआधी पूर्णपणे मातीत गाडला गेलेला चोर दरवाजा.
  • चोर दरवाज्याला व्यवस्थित पायऱ्या असून ती वाट चाच नावाच्या गावात पोहोचते.
  • परत येताना वाटेत एक भग्न शिवमंदिर, एक ३ फ़ूट उंचीच्या चौथऱ्यावरचा भव्य नंदी.
  • मंदिराजवळच अनेक वीरगळी (वीरांच्या स्मृतिशिळा)