माधव मनोहर
माधव मनोहर |
---|
माधव मनोहर (जन्म : नाशिक, २० मार्च, १९११ - १६ मे, इ.स. १९९४) (मूळ नाव माधव मनोहर वैद्य) हे मराठी समीक्षक, नाटककार, लेखक होते. बी.ए. असले तरी मुंबईतील एस.एन..डी.टी. कॉलेजात ते प्राध्यापक झाले आणि तेथूनच निवृत्त झाले. चित्रपट समीक्षक व लेखक गणेश मतकरी हे त्यांचे नातू आहेत.[१]
इंग्रजी वाङ्मय वाचल्यावर माधव मनोहर यांना मराठी साहित्य आणि मराठी नाटक खूपच खुजे आणि परावलंबी असल्याची जाणीव झाली. येथूनच पुढे माधव मनोहर या समीक्षकाचा उदय झाला. इंग्रजीतले चांगले वाङ्मय मराठीत आणण्याचा त्यांनी सपाटा लावला. दैनिक केसरीत ’चौपाटीवरून’ या सदरात, व ’सोबत'मध्ये ’पंचम' या सदरातून ते नाट्यसमीक्षणे लिहीत असत. ’नवशक्ती’, ’रत्नाकर, ’रसरंग’मधूनही त्यांचे समीक्षालेख प्रकाशित होत. त्यांचे स्वतःचे साहित्य आहे त्यापेक्षा त्यांचे समीक्षासाहित्य अधिक आहे, त्यामुळे माधव मनोहर हे नाव साहित्यिकांच्या पंक्तीतून समीक्षकांच्या पंक्तीत जाऊन बसले.
टीका
माधव मनोहर वृत्तीने स्थितप्रज्ञ होते. त्यामुळे टीका आणि स्तुती दोनही त्यांना समान असे. कोणी त्यांच्यावर वैयक्तिक टीका केली आणि तीही शब्दांच्या माध्यमातून, तरी ते त्याला लेखणीने प्रत्युत्तर देत असत. त्यांची लेखणी इतकी परखडपणे बोलत असे त्यांना कधी काही बोलावेच लागले नाही. मराठी साहित्यावर टीका करताना ते साहित्य कसे आहे यावरच त्यांचे लक्ष असे, ते कोणाचे आहे याला त्यांच्या लेखी काहीच महत्त्व नसे. वसंत कानेटकरांच्या सर्व नाटकांवर परखडपणे हल्ला करणाऱ्या माशव मनोहर यांनी त्यांच्या ’गगनभेदी’वर प्रशंसेची मुक्ताफळे उधळली होती. आपल्या पुस्तकांवर सातत्याने टीका होत असली तरी अनेक लेखकांनी आपल्या पुस्तकांच्या प्रस्तावना माधव मनोहर यांच्याकडून लिहून घेतल्या.
फौजदारी
माधव मनोहर यांचे वाचन अफाट होते, त्यामुळे ते साहित्यातील चोऱ्या सहज पकडत. वाङ्मयचौर्य पकडण्याच्या त्यांच्या या कामामुळे त्यांना ’साहित्यातले फौजदार’ म्हणत. माधव मनोहर यांच्यानंतर साहित्याला दिशा दाखवणारा इतका समर्थ टीकाकार मिळणे दुर्मीळ आहे. [ दुजोरा हवा][ संदर्भ हवा ]
माधव मनोहर यांनी लिहिलेली नाटके
- आई(भाषांतरित नाटक)
- आजोबांच्या मुली(रूपांतरित एकांकिका)
- आपण साऱ्या दुर्गाबाई(रूपांतरित एकांकिका)
- चेटूक(भाषांतरित नाटक)
- झोपलेले जग(भाषांतरित नाटक)
- डावरेची वाट(भाषांतरित नाटक)
- प्रकाश देणारी माणसं(रूपांतरित एकांकिका)
- रामराज्य(भाषांतरित नाटक)
- सशाची शिंगे(भाषांतरित नाटक)
- सौदा(रूपांतरित एकांकिका)
माधव मनोहर यांनी लिहिलेली अन्य पुस्तके/वाङ्मय
- अनाथ विद्यार्थी गृहाच्या मेळ्यासाठी पोवाडे, पदे
- अन्नदाता (अनुवादित कादंबरी)
- आशा (कथा)
- एक आणि दोन (अनुवादित कादंबरी)
- किल्ली (अनुवादित कादंबरी)
- क्लिओपॅट्रा (अनुवादित कथा)
- पंचमवेध (निवडक माधव मनोहर)
- मधुचंद्राची रात्र (कथा)
- मुलांची शाळा (कथा)
- स्मृतिरंग (अप्रकाशित खंडकाव्य)
सन्मान आणि पुरस्कार
- १९८१मध्ये माधव मनोहर यांना नाट्यसमीक्षा लेखनाबद्दल विष्णूदास भावे सुवर्णपदक मिळाले.
- नाट्यसमीक्षक माधव मनोहर हे सातारा येथे १९९० साली झालेल्या ७१व्या मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष होते.
- रंगत संगत प्रतिष्ठान माधव मनोहर यांच्या नावाचा स्मृती पुरस्कार देत असते. २०१७ साली हा पुरस्कार नाट्यसमीक्षक अरुण धाडीगावकर यांना मिळाला.
हेही वाचा
नोंदी व संदर्भ
- ^ आमचं घर : गणेश मतकरी, लोकसत्ता, दि. २३ मार्च २०१४, http://www.loksatta.com/vasturang-news/our-house-409279/, १८ मार्च २०१६ रोजी पाहिले.