माधव कोंडविलकर
माधव कोंडविलकर (जन्म : कोंकण, १९४१; - रत्नागिरी, ११ सप्टेंबर २०२०) हे एक मराठी कवी आणि लेखक होते. कोडविलकरांनी ५०हून अधिक पुस्तके लिहिली, पण त्याती फारच थोडी प्रकाशित झाली, बाकीच्यांची हस्तलिखिते प्रकाशकांकडे धूळ खात पडून राहिली. पुढे, त्यांपेकी काही त्यांची कन्यका डाॅ. ग्लोरिया खामकर हिने उजेडात आणली.
राजापूरच्या सोगमवाडीत प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी मुंबईत माध्यमिक शिक्षण पूर्ण केले व कोकण विभागात प्राथमिक शिक्षक म्हणून ते रुजू झाले. माधव कोडविलकरंच्या तथाकथित खालच्या जातीमुळे यांना प्रत्यक्ष जीवनात फार कटू अनुभव आले. हे अनुभव वर्तमानपत्रांतून, व ‘अस्मितादर्श’ नियतकालिकामधून प्रसिद्ध होऊ लागले. मधु मंगेश कर्णिकांच्या प्रोत्साहनाने त्यांचे लेखन १९७७ साली प्रथम ‘तन्मय’ दिवाळी अंकात प्रकाशित झाले. डायरीतल्या नोंदींसारखे हे लेखन दोन वर्षांनी ‘मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे’ या नावाने पुस्तकरूपात आले आणि एका दुर्लक्षित, उपेक्षित जीवनविश्वाचा परिचय मराठी वाचकांना झाला. पुढे हिंदी व फ्रेंच भाषेत अनुवाद झालेल्या या पुस्तकामुळे कोंडविलकर 'प्रथितयश मराठी लेखक’ झाले.
राजापुरी बोलीचा वापर करून लिहिलेल्या कोकणातील ग्रामीण जीवनाचा पैस माधव कोडिलकरांच्या लेखनात दिसतो. त्यामुळेच बाबुराव बागुलांनी त्यांना ‘कोकणातच अडकलेला भांबावलेला लेखक’ म्हणले असले तरी, मुंबईतील उपेक्षितांचे, गिरणी कामगारांचे जगणे टिपणारी ‘देशोधडी’ ही कादंबरी, शेतकरी आत्महत्येची ‘लोकसत्ता’त प्रसिद्ध झालेली बातमी वाचून लिहिलेली ‘डाळं’ किंवा ‘एक होती कातळवाडी’ आणि ‘भूमिपुत्र’ या जागतिकीकरणाचे परिणाम मांडणाऱ्या कादंबऱ्या वाचल्या की कोंडविलकरांनी प्रादेशिकतेची तसेच दलित साहित्याची चौकटही ओलांडली होती असे समजून येते.
कोंडविलकरांची प्रकाशित पुस्तके
- अजून उजाडायचं आहे (आत्मकथनात्मक कादंबरी)
- अनाथ (आत्मकथनात्मक कादंबरी)
- आता उजाडेल ! (कादंबरी)
- इटुकलृराव (बालसाहित्य)
- एक होती कातळवाडी (कादंबरी)
- कळा त्या काळच्या (आत्मकथनात्मक कादंबरी)
- काहिली (कादंबरी)
- घालीन लोटांगण (धार्मिक)
- छेद (कादंबरी)
- झपाटलेला (कादंबरी)
- डाळं (कादंबरी)
- देवांचा प्रिय प्रियदर्शनी राजा सम्राट अशोक (ऐतिहासिक)
- देशोधडी
- निर्मळ (कादंबरी)
- भूमिपुत्र (कादंबरी)
- मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे (दलित साहित्य)
- स्वामी स्वरूपानंद (आध्यात्मिक)
- हाताची घडी तोंडावर बोट (कादंबरी)
माधव कोंडविलकर यांच्या साहित्यावरील पुस्तके
- माधव कोंडविलकर साहित्य आणि समीक्षा (डॉ. शरद बिऱ्हाडे)