माणिकचंद पहाडे
हैदराबाद मुक्तिसंग्रामातील अग्रणी स्वातंत्र्य सैनिक माणिकचंद पहाडे
भारतीय एकात्मतेचा ध्यास मनात रुजला आणि राजस्थानी कुटुंबातील एक व्यक्ती मराठी मुलखात आली. निझामी राजवटीत स्थिरावली. येथील अन्यायाविरुद्ध पेटून उठली. ती व्यक्ती म्हणजे स्वातंत्र्यसेनानी माणिकचंद पहाडे.
नाशिक जिल्ह्यातील नांदगावमध्ये इ.स. १८९८ ला जन्मलेले माणिकचंदजी इ.स. १९२६ साली औरंगाबादला आले.
इ. स, १९३० साली ते वकील झाले.
माणिकचंदजी फर्डे वक्ते आणि अन्यायाविरुद्ध लढणारे निष्णात वकील म्हणून प्रसिद्धीस पावले..
स्वातंत्र्य सैनिक भगतसिंगांना २३ मार्च १९३१ रोजी फाशी झाल्यावर औरंगाबादमधील मोर्चांचे नेतृत्व माणिकचंदजींनीच केले होते.
इ.स. 1923 साली भारतात कामगार कायदा आला, पण निझामाने हैदराबाद संस्थानात त्याची अंमलबजावणी होऊ दिली नाही.
" हम करे सो कायदा " म्हणत कामगारांची पिळवणूक चालूच होती. .
त्याच वेळी कामगार चळवळीचे नेतृत्व करत माणिकचंदजीं पहाडे यांनी ४ हजार कामगारांचा मोर्चा काढून त्यांच्या मागण्या मान्य करून घेतल्या.
हैदराबाद मुक्तिसंग्रामासाठी काँग्रेसने चळवळ उभारली.
दि. २४ सप्टेंबर १९३८ रोजी हैदराबाद मुक्तिसंग्रामासाठी हैदराबाद स्टेट काँग्रेसने सत्याग्रह पुकारला.
स्वातंत्र्यसेनानी माणिकचंद पहाडे यांच्याकडे.त्याचे नेतृत्व होते
त्यांनी निझामाच्या जुलमी राजवटीविरुद्ध रणशिंग फुंकले.
पहाडेंच्या नेतृत्वाची ताकद त्या वेळी निझामालाही जाणवली.
त्याने त्यांना तत्काळ तुरुंगात डांबले.
त्यांच्या उपजीविकेचे साधन असलेली वकिलीची सनद रद्द केली.
त्यांना तीन वेळा तुरुंगात पाठवले.
पण पहाडे नमले नाहीत, झुकले नाहीत.
पुढे इंग्रजी राजसत्तेचा अंमल संपुष्टात येत असताना निझामाने भारतीय संघराज्यात सामील होण्यास नकार दिला.
त्यामुळे हैदराबाद संस्थानात असंतोष उसळला.
लोक रस्त्यावर उतरू लागले..
त्यांना दडपण्यासाठी निझामाने रझाकारांची फौज आणली.
ही फौज लोकांवर प्रचंड अत्याचार करत होती.
त्यामुळे ७ ऑगस्ट १९४७ रोजी काँग्रेसतर्फे " हिंदी संघात सामील व्हा " हा दिन पाळला गेला.
त्या दिवशी पूर्ण औरंगाबाद शहर निझामाने पोलिस आणि संघटित गुंडांच्या ताब्यात दिले होते.
जनसामान्यांचे ‘भाऊसाहेब’ असणाऱ्या माणिकचंदजींच्या प्रतीक्षेत चार-पाच हजार स्त्री-पुरूष गुलमंडीवर जमले होते.
गुलमंडी भोवती असलेल्या वेढ्यामध्ये साधारण ३०० च्यावर पोलिस व तितकेच रजाकार होते.
औरंगाबादला लष्करी छावणीचे रूप आलेले होते.
माणिकचंदजींवर जिल्हाबंदी होती, शिवाय त्यांच्यासाठी " जिंदा या मुर्दा पकडो " चे फर्मानही होते.
अशा आव्हानात्मक परिस्थितीत आज गुलमंडीवर ज्या ठिकाणी टॉवर चे घड्याळ आहे तेथे माणिकचंदजी अचानक अवतरले .
माणिकचंदजी गुलमंडी चौकाच्या मधल्या ओट्यावर आले, तोंडावरची शाल काढली आणि " भारत माता की जय ", " स्टेट काँग्रेस जिंदाबाद " ची घोषणा दिली.
" महात्मा गांधी जिंदाबाद ", " स्वामी रामानंद तीर्थ जिंदाबाद " च्या घोषणांनी गुलमंडी दणाणून गेली.
माणिकचंदजी निवेदन वाचत असताना ते बेसावध आहेत हे पाहून जमादार फरीद याने त्यांच्या कमरेवर त्वेषाने लाथ मारली.
माणिकचंदजी धाडकन तोंडावर पडले, त्यांच्या डोक्याला लागले, त्यांचे दात पडले.
निझामाचे सैनिक व रजाकार त्वेषाने माणिकचंदजींवर तुटून पडले.
त्यांना १०-१५ शिपायांनी लाठ्यांनी झोडपायला, नालदार बुटांनी तुडवायला सुरुवात केली.
माणिकचंदजींचे अंग काळेनिळे पडले, जखमा झाल्या. परंतु शुद्ध जाईपर्यंत त्यांनी हातातून तिरंगा सुटू दिला नाही.
" भारतमाता की जय " चा घोष चालू होता.
जमावाला नियंत्रणात ठेवताना घोडेस्वार आपले घोडे माणिकचंदजींच्या अंगावरून नेत होते.
बेशुद्धावस्थेत असलेलया माणिकचंद यांना कॉलर पकडून,फरफटत नेले गेले आणि व्हॅनमध्ये फेकून दिले.
जनसमुदायाने उत्स्फूर्तपणे " माणिकचंदजी पहाडे जिंदाबाद " अशा घोषणा दिल्या.
पुढे काही दिवसांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या आदेशाने पोलिस ऍक्शन झाली आणि भारतीय लष्कराने निझामाचा पाडाव केला.
परिणामी हैदराबाद राज्यातील, मराठवाड्याने १७ सप्टेंबर १९४८ रोजी स्वातंत्र्याचा श्वास घेतला.
माणिकचंदजींवर काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली.
इ. स. १९५२ साली झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत ते फुलंब्रीचे आमदार म्हणून निवडून आले.
इ. स. १९४८ ते १९५१ या कालावधीत ते सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे सचिव होते.
आमदार झाल्यावर दोन वर्षांनी त्यांना अर्धांगवायूच्या विकाराने घेरले..
दी. ७ जुलै १९५५ रोजी त्यांचे निधन झाले.
त्यांच्या त्यागाची आठवण म्हणून औरंगाबादेतील विधी महाविद्यालयास त्यांचे नाव देण्यात आले.
त्याच प्रमाणे गुलमंडी चौकाचे " स्वातंत्र्यसेनानी माणिकचंदजी पहाडे चौक " असे नामकरण करून औरंगाबाद शहराने आपली कृतज्ञता व्यक्त केली.
हा सारा इतिहास आजच्या तरुण पिढीला प्रत्येक पाल्यांनी जरूर वाचून दाखवावा ही नम्र विनंती.
( संदर्भ : महाराष्ट्र टाइम्स आणि दिव्य मराठी या वर्तमापत्रातील जुने अंक)