माणसांचे संमेलन
महाराष्ट्रातल्या पाचगणीजवळ खिंगर नावाचे एक खेडे आहे. त्या खेड्याच्याही शेजारी एका शांत, निवांत ठिकाणी ‘अक्षर मानव’ संघटनेकडून दरवर्षी माणसांचे संमेलन भरववले जाते. दरवर्षीच्या संमेलनाला माणसाशी संबंधित असलेला एक खास विषय ठरवला जातो. त्या संमेलनाला तेच नाव दिले जाते. त्या विषयाच्या संकल्पनेभोवती पूर्ण तीन दिवस गप्पा मारत, चर्चा करत, त्या संकल्पनेचा आनंददायी आणि तेवढाच गंभीर, समाजाला बोधप्रद असा उलगडा करत हे संमेलन चालते
पुण्याच्या शुक्रवार पेठेत राष्ट्रभूषा चौकात अक्षर मानव नावाच्या एका संघटनेतर्फे हे संमेलन भरते. पहिल्या वर्षाच्या संमेलनाचे नाव ‘मी संमेलन’, . दुसऱ्या वर्षीचे नाव ‘मी-तू संमेलन’ आणि तिसऱ्या वर्षीचे ‘आपण संमेलन’ होते. चौथ्या वर्षीचे संमेलन २७-२९-२९ जुलै २०१२ या दिवशी झाले. त्या संमेलनाचे नाव होते ‘समाज संमेलन.’
या माणसांच्या संमेलनाला निमंत्रणपत्रिका नसते, औपचारिक उद्घाटन किंवा समारोप नसतो, कार्यक्रमपत्रिका नसते आणि अध्यक्षही नसतो. संमेलनस्थळी चार रात्री आणि तीन दिवस राहणे अनिवार्य असते. संमेलनात येणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला येण्याजाण्याचा खर्च, मानधन असे काहीही दिले जात नाही. राहण्याचीही स्वतंत्र व्यवस्था नसते. पण सर्वाना चांगले जेवायखायला घातले जाते व चहा-नाश्ताही मिळतो. या राहण्याखाण्याचे कुणाकडूनही कसलेही पैसे घेतले जात नाहीत.
या संमेलनांमुळे सामाजिक संस्कार घडतात, असा आयोजकांचा विश्वास आहे. चर्चांद्वारा प्रगट झालेली इथली मतमतांतरे सर्वदूर पोहोचतात आणि पुढच्या काळात ती सर्वत्र नांदत, निनादत असतात, असा उपस्थितांचा स्वानुभव आहे. आयुष्याच्या खूप महत्त्वाच्या आणि दिशादर्शक गोष्टी या संमेलनांमध्ये बोलल्या-ऐकल्या जातात. त्या अर्थाने ही संमेलने खूप अर्थपूर्ण आणि खोल चिंतन-मननाची होतात.
हे सुद्धा पहा
मराठी साहित्य संमेलने