माझे सत्याचे प्रयोग
माझे सत्याचे प्रयोग ही महात्मा गांधींची आत्मकथा आहे.
गांधीजींनी जीवनभर कशी वाटचाल केली ह्याचा मागोवा या पुस्तकामध्ये घेतला आहे.
हे पुस्तक मराठी, हिंदी, गुजराती व इंग्रजीमध्ये उपलब्ध आहे तसेच जगभरातील अनेक भाषांमध्ये त्यांचे अनुवाद झालेले आहेत.
या पुस्तकात लहानपणापासून १९२१ पर्यंतचे गांधीजींचे आयुष्य रेखाटले गेले आहे. दर आठवड्याला थोडे थोडे याप्रमाणे हे पुस्तक लिहिले गेले आणि १९२५ ते १९२९ या काळात ते त्यांच्या नवजीवन या नियतकालिकात प्रसिद्ध केले गेले. 'यंग इंडिया' मध्ये त्याचे इंग्रजी भाषांतर छापले जायचे. [१]स्वामी आनंद यांनी या प्रकल्पाला चालना दिली आणि गांधीजींच्या इतर सहकाऱ्यांनी त्यांच्या सार्वजनिक लढायांची पार्श्वभूमी कळावी म्हणून हे प्रसिद्ध करावे असे त्यांना भरीस घातले. जागतिक आध्यात्मिक व धार्मिक अधिकार असलेल्या तज्ञांच्या समितीने, १९९९ मध्ये '१०० आध्यात्मिक पुस्तकातील एक' असा या पुस्तकाचा गौरव केला.
हा भाग महादेव देसाई यांनी लिहिला आहे. त्यांनी १९४० मध्ये या पुस्तकाचे गुजरातीमधून इंग्रजीत भाषांतर केले. या प्रस्तावनेत देसाई म्हणतात की मुळात हे पुस्तक दोन भागात लिहिले गेले होते, पहिला भाग १९२७ मध्ये आणि दुसरा १९२९ मध्ये! ते असाही उल्लेख करतात की मूळ पुस्तकाची किमात रु.१ होती आणि ही प्रस्तावना लिहीपर्यंत पाच आवृत्तींचे प्रकाशन झाले होते. गुजरातीमधील ५०००० पुस्तकांची विक्री झाली होती परंतु इंग्रजी पुस्तक महाग असल्याने लोक विकत घेत नव्हते. इंग्रजी पुस्तक स्वस्तात उपलब्ध करून दिले पाहिजे असे देसाई म्हणतात. ते हाही उल्लेख करतात की एका इंग्रज विद्वानाने संपूर्ण भाषांतराचे संस्करण केले आहे परंतु त्यांना नामोल्लेख नको होता. पाचव्या भागातील प्रकरण २९-४० चे भाषांतर देसाई यांचे सुहृद प्यारेलाल यांनी केले आहे.
प्रस्तावना
या पुस्तकाची प्रस्तावना खुद्द गांधीजी यांनी लिहिली आहे आणि यात उल्लेख केला आहे की कसे येरवडा कारागृहातील सह-कैदी जेरमदास यांच्या आग्रहामुळे त्यांनी परत आत्मचरीत्र लिहायला सुरुवात केली. त्यांचा एक मित्र त्यांना म्हणाला होता की आत्मचरित्र लिहिणे ही पाश्चात्य लोकांची खासियत आहे. पूर्वेकडे कोणी असे करत नाही. गांधीजी स्वतःच कबूल करतात की पुढे मागे त्यांचे विचार बदलू शकतात पण ही गोष्ट सांगण्यामागचा त्यांचा एकमेव उद्देश आहे, सत्याचे प्रयोग लोकांना सांगणे. ते असेही म्हणतात की या पुस्तकात त्यांना राजकीय प्रयोगांविषयी न लिहिता आध्यात्मिक आणि मूल्यविषयक प्रयोगांबद्दल लिहायची इच्छा आहे.
भाग १
पहिल्या भागात गांधीजींच्या बालपणातील प्रसंग आहेत, मांस खाण्याचे, धूम्रपान, मद्यपान, चोरी करणे आणि त्याचे प्रायश्चित्त अशा प्रयोगांबद्दल कथन केले आहे. त्यांनी बालपणात वाचलेल्या दोन पुस्तकांचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता. 'हरिश्चंद्र' नाटकाच्या प्रभावाबद्दल ते लिहितात की ते नाटक त्यांनी अतिशय मनापासून वाचले. ते सतत त्यांच्या मनात असे व स्वतःला हरिश्चंद्र समजून त्यांनी अनेक वेळा कल्पनारंजन केले होते. दुसरे प्रभाव पडणारे पुस्तक म्हणजे श्रवण पितृभक्ती नाटक, श्रवण बाळाच्या आई-वडिलांवरील भक्तीविषयीचे नाटक! गांधींचा विवाह १३ व्या वर्षी झाला. त्यांच्याच शब्दात सांगायचे तर, "१३ व्या वर्षी झालेल्या माझ्या विवाहाबद्दल मी इथे सांगणे माझे कर्तव्य आहे. इतक्या लवकर विवाह करण्यामागील मौलिक विचार मला कधी कळू शकला नाही." या भागातील आणखी एक महत्त्वाची घटना म्हणजे गांधीजींचे वडील करमचंद गांधी यांचे निधन. गांधीजींनी त्यांचे सत्याचे प्रयोग मांडण्याकरता हे पुस्तक लिहिले. या भागात त्यांना शाळेत असणारा व्यायामाच्या कंटाळ्याविषयी, विशेषतः जिमनॅॅसटिक्सच्या कंटाळ्याविषयी लिहिले आहे.
संदर्भ
- ^ Johnson, Richard L. (2006). Gandhi's Experiments with Truth: Essential Writings by and about Mahatma Gandhi (इंग्रजी भाषेत). Lexington Books. ISBN 9780739111437.