माझी वसुंधरा अभियान
Majhi Vasundhara Abhiyan | |
संस्थेचे अवलोकन | |
---|---|
अधिकारक्षेत्र | महाराष्ट्र शासन |
संकेतस्थळ | https://majhivasundhara.in/ |
खाते |
निसर्गाच्या पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आणि आकाश पंचतत्वासोबत जीवन पद्धती अंगीकारल्याशिवाय आपण निसर्गासोबत जगू शकणार नाही आणि जैव विविधतेचेही अस्तित्व राहणार नाही. म्हणून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना सोबत घेऊन तेथे या निसर्गाशी संबंधित पंचतत्वांवर आधारित उपाययोजना करून शाश्वत निसर्गपूरक जीवनपद्धती अवलंबिण्यासाठी "माझी वसुंधरा" हे अभियान महाराष्ट्र शासनाचे पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग दिनांक २ ऑक्टोबर, २०२० पासून राबविण्यात येत आहे.[१]
पर्यावरणाचे जतन, संवर्धन व संरक्षण करण्यासाठी "माझी वसुंधरा (माय अर्थ)" हा अभिनव उपक्रम विभागाने हाती घेतला आहे. हा उपक्रम निसर्गाच्या "पंचमहाभूते" नावाच्या पाचही घटकांवर लक्ष केंद्रित करतो. त्यात भूमी (जमीन), जल (पाणी), वायू (हवा), अग्नी (ऊर्जा), आकाश (संवर्धन) यांचा समावेश आहे. या उपक्रमातून वातावरणीय बदल आणि पर्यावरणाच्या समस्यांबद्दल नागरिकांना जागरूक करून त्यांना पर्यावरणाच्या सुधारणेप्रती प्रयत्न करता येत आहेत. त्यातून राज्याच्या शाश्वत विकासाप्रति प्रयत्न केले जात आहेत.[२]
अभियानातील पंचातत्वांचे महत्व
पृथ्वी: तत्वाशी संबंधित वनीकरण, वनसंवर्धन, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन व जमिनीचे धुपीकरण इत्यादी बाबींवर कार्य करणे.
वायू: तत्वाचे संरक्षण करता यावे म्हणून हवेच्या गुणवत्तेसाठी वायूप्रदूषण कमी करून हवेच्या गुणवत्तेत सुधारणा करणे.
जल: तत्वाशी संबंधित नदी संवर्धन, सागरी जैव विविधता, जलस्रोतांचे संवर्धन व संरक्षण तसेच सागरी किनारे यांची स्वच्छता करणे.
अग्नी: तत्वाशी संबंधित ऊर्जेचा परिणामकारक वापर, ऊर्जा बचत तसेच ऊर्जेचा अपव्यय टाळणे या बाबींना प्रोत्साहन देणे, अपारंपरिक ऊर्जेच्या निर्मितीसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम, महामार्गाच्या दुतर्फा असलेल्या जागा, पडीक जमिनी, शेतांचे बांध या सारख्या जागांवर राबविणे.
आकाश: या तत्वास स्थळ व प्रकाश या स्वरुपात निश्चित करून मानवी स्वभावातील बदलांसाठी जनजागृती व शैक्षणिक कार्यक्रमांद्वारे जनमानसात बिंबवणे या प्रमुख बाबींचा समावेश आहे.
स्पर्धा व सन्मान
या अभियानांतर्गत नागरी स्थानिक संस्था व ग्राम पंचायती या स्थानिक संस्थांची पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करणाऱ्या योजना प्रभावीपणे व मिशन मोड पद्धतीने राबविण्याची स्पर्धा घेण्यात येते. निसर्गाच्या पंचतत्वावर आधारित पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करणाऱ्या विविध शासकीय योजना/ कार्यक्रम/ उपाय एकत्रित करून त्या प्रभावीपणे व मिशन मोड पद्धतीने राबविण्यासाठी निर्देशक (इंडिकेटर) स्वरूपात असलेली टुलकिट तयार करून दिली जाते. ज्यामध्ये त्यांनी केलेल्या कामाचे मुल्यमापन करण्यासाठी गुण ठेवलेले असतात. या टूलकिटनुसार विविध उपाययोजना स्थानिक संस्थांमध्ये एप्रिल ते मार्च या एक वर्षाच्या कालावधीत राबविण्यात येतात. स्थानिक संस्थांनी एप्रिल ते मार्च या कालावधीत केलेल्या कामाची माहिती एम. आय.एस. (व्यवस्थापन माहिती प्रणाली) स्वरूपात माझी वसुंधरा अभियानाच्या वेब पोर्टलवर भरावी लागते. स्थानिक संस्थांनी भरलेल्या एम.आय.एस. चे त्रयस्त यंत्रणेमार्फत डेस्कटॉप मुल्यमापन करण्यात येते. डेस्कटॉप मुल्यमापनात गुणानुक्रमे चांगली कामगिरी करणाऱ्या स्थानिक संस्थांचे मुल्यमापन त्रयस्त यंत्रणे मार्फत संबंधित स्थानिक संस्थेमध्ये प्रत्यक्ष भेट देऊन करण्यात येत. डेस्कटॉप असेसमेंट व फिल्ड असेसमेंट मधील प्राप्त होणाऱ्या गुणांच्या आधारे उच्चत्तम कामगिरी करणाऱ्या स्थानिक संस्थांची विजेते म्हणून निवड करून या स्थानिक संस्थांचा सन्मान जागतिक पर्यावरण दिन म्हणजे दिनांक ५ जून रोजी करण्यात येतो.[२][३]
बक्षिसांच्या रकमेचा विनियोग व कार्यपद्धती[४]
सदर बक्षिस रकमेचा विनियोग हा निसर्गाच्या पंचतत्वांचे संरक्षण, संवर्धन व जतन करण्यासाठीच्या उपाय योजना हाती घेण्यासाठी करण्यात यावा, असे महाराष्ट्र शासन, पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, शासन निर्णय, क्रमांक अभियान २०२१/ प्र.क्र.५१/तां.क. १, दिनांक १८ मे, २०२१ यात नमूद केले आहे.
सदर उपाय योजनांपैकी काही उपाय योजना उदाहरणा दाखल खाली नमूद केल्या आहेत.
१) शहराचे / गावाचे हरित अच्छादन वाढविण्यासाठी करावयाच्या उपाय योजना (जैवविविधतेच्या संवर्धनासह) उदा.:
अ) मियावाकी वृक्षारोपण
ब) अमृत वन
क) स्मृती वने
ड) शहरी वने
इ) बटरफ्लाय गार्डन (ई) सार्वजनिक उद्याने
२) जुन्या हरित क्षेत्रांचे संवर्धन आणि देखभाल. (जैवविविधतेच्या संवर्धनासह)
३) रोप वाटीकांची निर्मिती
४) जलसंवर्धनाचे उपक्रम
५) रेन वॉटर हारवेस्टिंग व परकोलेशन
६) नदी, तळे व नाले यांचे पुनःर्जिविकरण / सौंदर्यीकरणाचे उपक्रम
७) नूतनीकरणयोग्य उर्जा स्त्रोतांच्या वापरास प्रोत्साहन देण्याच्या उपाय योजना
८) एकूण सौरउर्जेवर चालणारे / एलईडी चालणारे दिवे
९) विद्युत वाहनांना प्रोत्साहन - चार्जिंग पॉईंट उपलब्ध करून देणे
१०) माझी वसुंधरा अभियानांतर्गत घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धांच्या विजेत्यांना द्यावयाची बक्षिसे
सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणे.
संबंधित स्थानिक संस्थाना, त्यांना मिळणाऱ्या बक्षिसाच्या एकूण निधी मधून निसर्गाच्या पंचतत्वांचे संरक्षण, संवर्धन व जतन करण्यासाठीच्या उपाय योजना करण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करावा लागतो. हा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करताना, एकूण बक्षिस रकमे पैकी ५०% रक्कम हरित क्षेत्र वाढविण्यासाठी वापरण्यात यावी. उर्वरित ५०% रक्कम पर्यावरण पूरक इतर उपाय योजनांसाठी वापरण्यात यावी. इतर उपाय योजनांसाठीच्या ५०% रकमेमधून कमाल १०% पर्यंतची रक्कम नवीन माझी वसुंधरा अभियान मध्ये घेण्यात येणाऱ्या स्पर्धांच्या विजेत्यांना बक्षिसे देण्यासाठी वापरण्यास शासन मान्यता देतो.
तांत्रिक मान्यता
सदर सविस्तर प्रकल्प अहवाला मध्ये समाविष्ट कामांना नागरी स्थानिक संस्थांनी नजिकच्या महानगर पालिकेच्या शहर अभियंता यांचे मार्फत तर ग्राम पंचायतींनी संबंधित जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्या मार्फत तांत्रिक मान्यता घेण्यात यावी. संबंधित महानगर पालिकेच्या शहर अभियंत्यांकडे / जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे अशा प्रकारे प्रस्ताव प्राप्त झाल्यावर विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून त्यांनी त्या प्रस्तावास तांत्रिक मान्यता देण्यात येते.
प्रशासकीय मान्यता
मा. प्रधान सचिव, पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग यांच्या अध्यक्षतेखाली गठित समिती प्रस्तावास मंजूरी देण्या बाबत निर्णय घेईल. समितीच्या मंजूरी नंतर प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याचे आदेश निर्गमित करण्यात येते.
प्रकल्पाची अंमलबजावणी
मंजूर सविस्तर प्रकल्प अहवालात समाविष्ट कामांची संबंधित स्थानिक संस्थेमार्फत अंमलबजावणी करण्यात येतो.
कामाच्या प्रगतीचा आढावा
संबंधित स्थानिक संस्थे मार्फत करण्यात येत असलेल्या कामाच्या प्रगतीचा आढावा वेळोवेळी माझी वसुंधरा अभियान संचालनालय व मा. प्रधान सचिव यांच्या मार्फत
घेण्यात येतो. सदर बक्षिसांच्या रकमेमधून घेण्यात आलेली कामे कमाल १२ महिन्यांच्या कालावधीत पूर्ण करण्यात यावीत, असेही यात नमूद केले आहे.
अभियान
माझी वसुंधरा १.०
कालावधी: २ ऑक्टोबर, २०२० ते ३१ मार्च, २०२१
एकूण सहभागी स्थानिक स्वराज्य संस्था: ६६७
अमृत शहरे: ४३
नगरपरिषद: २२६
नगरपंचायत: १२६
ग्रामपंचायत: २७३
माझी वसुंधरा २.०
कालावधी: २ ऑक्टोबर २०२० ते १५ एप्रिल ३०२१
एकूण सहभागी स्थानिक स्वराज्य संस्था: ११,९६८
अमृत शहरे: ४३
नगरपरिषद: २३६
नगरपंचायत: १३७
ग्रामपंचायत: ११,५६२
माझी वसुंधरा ३.०
कालावधी: १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३
एकूण सहभागी स्थानिक स्वराज्य संस्था: १६,८२४
अमृत शहरे: ४३
नगरपरिषद व नगरपंचायत: ३६८
ग्रामपंचायत: १६,४१३
माझी वसुंधरा ४.०[५]
कालावधी: १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४
एकूण सहभागी स्थानिक स्वराज्य संस्था: २२,६३२
अमृत शहरे: ४३
नगरपरिषद व नगरपंचायत: ३७१
ग्रामपंचायत: २२,२१८
संदर्भ
- ^ "महाराष्ट्र शासन, पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, शासन निर्णय, क्रमांक अभियान २०२०/प्र.क्र. १३४/तां.क.-१, दिनांक: १४ ऑक्टोबर, २०२०" (PDF).[permanent dead link]
- ^ a b "महाराष्ट्र शासन, पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग शासन निर्णय क्रमांक: पुनर्वि २०२३/प्र.क्र.११ (१)/तां.क.१, दिनांक: १३ मार्च, २०२३" (PDF).[permanent dead link]
- ^ "महाराष्ट्र शासन, पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, शासन निर्णय, क्रमांक अभियान २०२१/ प्र.क्र.५१/तां.क. १, दिनांक १८ मे, २०२१" (PDF).[permanent dead link]
- ^ "महाराष्ट्र शासन, पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग शासन निर्णय क्रमांक : अभियान २०२१/ प्र.क्र.५७/तां.क. १, दिनांक: ०८ जुलै, २०२१" (PDF).[permanent dead link]
- ^ "माझी वसुंधरा अभियान 4.0 राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राबविण्याबाबत" (PDF).