Jump to content

माजिद माजिदी

जन्मएप्रिल १७, इ.स. १९५९
तेहरान, इराण
राष्ट्रीयत्वइराण इराणी
कार्यक्षेत्र चित्रपट दिग्दर्शन
भाषाफारसी
अधिकृत संकेतस्थळhttp://www.cinemajidi.com/

माजिद माजिदी (फारसी: مجید مجیدی ; रोमन लिपी: Majid Majidi ;) (एप्रिल १७, इ.स. १९५९ - हयात) हा आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेला इराणी चित्रपटदिग्दर्शक, चित्रपटनिर्माता आणि पटकथाकार आहे. माजिदीच्या वैविध्यपूर्ण चित्रपटांना आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.

जीवन

माजिदीचा जन्म एका मध्यमवर्गीय इराणी कुटुंबात झाला. त्याचे वास्तव्य तेहरानात होते. वयाच्या चौदाव्या वर्षी त्याने हौशी नाट्यसंस्थांमधून नाटकांत कामे करायला सुरुवात केली. तेहरानातील 'इन्स्टिट्यूट ऑफ ड्रॅमॅटिक आर्टस्' या संस्थेत त्याने पुढे शिक्षण घेतले.

इ.स. १९७९ साली झालेल्या इराणी क्रांतीनंतर त्याने आपल्या चित्रपटक्षेत्राच्या आवडीखातर अनेक चित्रपटांत काम केले. मोहसिन मखमलबाफ याच्या 'बॉयकॉट' या इ.स. १९८५ सालच्या चित्रपटातले माजिदीचे काम विशेष उल्लेखनीय आहे.

इ.स. १९९८ साली माजिदीने 'चिल्ड्रन ऑफ हेवन' हा चित्रपट दिग्दर्शित केला. 'सर्वोत्कृष्ट परभाषीय चित्रपट' विभागांतर्गत या चित्रपटाला अकॅडमी पुरस्कारांसाठी नामांकन मिळाले. असे नामांकन मिळालेला 'चिल्ड्रन ऑफ हेवन' हा एकमेव इराणी चित्रपट आहे.

यानंतर माजिदीने कलर ऑफ पॅरडाइज (इ.स. २०००), बरन (इ.स. २००१), द विलो ट्री (इ.स. २००५) असे अनेक चित्रपट दिग्दर्शित केले. नुकतीच त्याने पूर्ण लांबीचा 'बेअरफूट टू हेरात' नावाचा एक माहितीपट दिग्दर्शित केला आहे. या माहितीपटात त्याने २००१ साली झालेल्या तालिबानविरोधी घडामोडीनंतरचे हेरात शहरातले व शरणार्थी शिबिरांमधले जीवन चितारले आहे.

इ.स. २००८ सालच्या विशाखापट्टणम् आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन माजिदीच्या 'द सॉंग ऑफ स्पॅरोज्' या गाजलेल्या चित्रपटाने झाले.

इ.स. २००८ साली आयोजलेल्या उन्हाळी ऑलिंपिक खेळांनिमित्त पैचिंग प्रशासनाने पैचिंग शहराची माहिती करून देण्यासाठी 'व्हिजन पैचिंग' कार्यक्रमांतर्गत माहितीपट बनवायला ज्या पाच आंतरराष्ट्रीय चित्रपट दिग्दर्शकांना पाचारण केले त्यांमध्ये माजिद माजिदीचा समावेश होता.

चित्रपट कारकीर्द

चित्रपटवर्षप्रकारभाषासहभाग
एन्फजर (स्फोट)इ.स. १९८१लघुमाहितीपटफारसीदिग्दर्शन
हूडाजइ.स. १९८४लघुपटफारसीदिग्दर्शन
रोज-इ-इम्तेहान (परीक्षेचा दिवस)इ.स. १९८८लघुपटफारसीदिग्दर्शन
येक रोज बा आसिरां (युद्धनिर्वासितांसोबत एक दिवस)इ.स. १९८९लघुमाहितीपटफारसीदिग्दर्शन
बादुकइ.स. १९९२चित्रपटफारसीदिग्दर्शन
आखरी आबादी (अखेरची वस्ती)इ.स. १९९३लघुपटफारसीदिग्दर्शन
फादर (वडील)इ.स. १९९६चित्रपटफारसीदिग्दर्शन
खुदा मियाद (परमेश्वर येईल)इ.स. १९९६लघुपटफारसीदिग्दर्शन
बचेहा-ये आसमां (आकाशाची लेकरे)इ.स. १९९७चित्रपटफारसीदिग्दर्शन
रंग-इ खुदा (देवाचे रंग)इ.स. १९९९चित्रपटफारसीदिग्दर्शन
बरन (पाऊस)इ.स. २००१चित्रपटफारसीदिग्दर्शन
पा बेराने ता हेरात (हेरातापर्यंत अनवाणी)इ.स. २००१माहितीपटफारसीदिग्दर्शन
ऑलिंपिक तू उर्दूगाह (सैन्यछावणीतले ऑलिंपिक)इ.स. २००३लघुमाहितीपटफारसीदिग्दर्शन
बीड-इ मजनूं (अजून एक आयुष्य)इ.स. २००५चित्रपटफारसीदिग्दर्शन
पीस, लव्ह, अँड फ्रेंडशिप (शांती, प्रेम आणि मैत्र)इ.स. २००७लघुमाहितीपटफारसीदिग्दर्शन
आवाजें गोंजेश्क-हा (पाखरांचे आवाज)इ.स. २००८चित्रपटफारसीदिग्दर्शन
पोएट ऑफ द वेस्ट्स्इ.स. २००६चित्रपटफारसीदिग्दर्शन
काश्मीर अफ्लोटनिर्मिती अवस्थेतफारसीदिग्दर्शन

बाह्य दुवे