महाराष्ट्रातील बौद्ध धर्म
महाराष्ट्रातील बौद्ध |
---|
दीक्षाभूमीचा स्तूप, नागपूर |
एकूण लोकसंख्या |
६५.३१ लाख ते १.१० कोटी (प्रमाणः- ५.८१% ते १०%) (२०११)[१] |
लोकसंख्येचे प्रदेश |
विदर्भ • मराठवाडा • खानदेश • कोकण • मुंबई उपनगर |
भाषा |
मराठी व वऱ्हाडी |
धर्म |
नवयान बौद्ध धर्म |
संबंधित वांशिक लोकसमूह |
मराठी लोक |
बौद्ध धर्म |
---|
नवयान बौद्ध धर्म हा महाराष्ट्रातील एक प्रमुख धर्म असून राज्याच्या मराठी संस्कृतीचा महत्त्वपूर्ण भाग आहे. महाराष्ट्र हे भारतीय राज्यांपैकी सर्वाधिक बौद्ध धर्मीयांची लोकसंख्या असलेले राज्य आहे. इसवी सनापूर्वी ५०० वर्षाच्या सुमारास गौतम बुद्धांच्या हयातीत बौद्ध धर्माचा प्रवेश महाराष्ट्रात झाला होता. २०व्या शतकात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या धार्मिक क्रांतीनंतर राज्यात हा धर्म व्यापक प्रमाणात रूढ झाला, व बौद्ध अनुयायांच्या संख्येतही लक्षनीय वाढ झाली.
बौद्ध धर्म हा महाराष्ट्रात बौद्ध धर्माचा प्रचार व प्रसार सातवाहन काळात फार मोठ्या प्रमाणात झाला. नाग लोकांनी धर्मप्रचारास प्राणांची बाजी लावून दिली होती. हजारो बुद्ध लेणी कोरल्या गेल्या. सिद्धांच्या माध्यमातून नाथांपर्यंत आणि नाथांपासून वारकरी संप्रदायापर्यंत बौद्धधम्म झिरपत गेला. बौद्ध धर्म हा महाराष्ट्रात सातव्या शतकापर्यंत मोठ्या प्रमाणावर प्रचलित होता.
२०११ च्या भारतीय जनगणनेच्या अहवालानुसार सबंध भारतात सुमारे ८४,४२,९७२ बौद्ध लोक होते, यापैकी ६५,३१,२०० म्हणजेच ७७.३६% बौद्ध हे महाराष्ट्र राज्यातील होते.[२] महाराष्ट्रामध्ये बौद्ध धर्म हा हिंदू व इस्लाम नंतर तृतीय क्रमांकाचा सर्वात मोठा धर्म आहे. आणि महाराष्ट्रातील लोकसंख्येत बौद्धांचे प्रमाण सुमारे ६% आहे. भारतातील एकूण नवयानी बौद्धांपैकी (नवबौद्ध) सुमारे ९०% महाराष्ट्रात आहेत.[३] डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशभरातील आपल्या लाखो अनुयायांसह १९५६ च्या अशोक विजयादशमीच्या दिवशी बुद्धधर्मात प्रवेश केला. हा दीक्षा समारंभ नागपूर येथे झाला. महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा व कोकण येथील दलित समाजाने यात मोठ्या प्रमाणात भाग घेतला. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये बौद्धांच्या संख्येत लक्षणीय वाढ झालेली आढळते. बौद्ध धर्माच्या प्रभावाखाली असलेला राज्यातील महार समाज व महाराष्ट्रीय बौद्ध समाज ह्या दोन्ही बौद्ध समाजाची एकत्रित लोकसंख्या ही १ कोटींवर (१०-१२%) आहे.
इतिहास
प्राचीन इतिहास
बुद्धांच्या हयातीत इसवी सनापूर्वी ५०० वर्षाच्या सुमारास बुद्ध धर्माचा प्रवेश महाराष्ट्रात झाला.[४] बौद्ध धर्माचे संस्थापक, बुद्ध यांनी उरुवेलाबोधगया येथे संबोधी प्राप्त झाल्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन धम्मउपदेश देणे सुरू केले. त्यांनी अनेक शिष्य लाभले, ज्यात भिक्खू-भिक्खुणी व उपासक - उपासिका यांचा समावेश होता. बुद्धांनी आपल्या शिष्यांना (भिक्खू) कल्याणप्रद अशा आपल्या सद्धम्माचा उपदेश करण्यासाठी चारही दिशांना संचार करा, असा आदेश दिला होता. त्यानुसार हजारो भिक्खू भिक्खूणी धम्माचा उपदेश करण्यासाठी ह्या जंबुवदिपातील निरनिराळ्या ठिकाणी गेले. यामुळे महाराष्ट्रात देखील बुद्ध धम्माचा प्रचार प्रचार झाला. महाराष्ट्रात बुद्ध धम्माचा प्रचार होण्याचे दुसरे एक कारण व्यापारीवर्ग होता. सुरुवातीपासून व्यापारीवर्ग तथागतांच्या धम्माकडे आकर्षित झाला होता. जून्या पाली वाङमयात त्यावेळी अस्तित्वात असलेल्या व्यापारी मार्गांबद्दल बरीच माहिती मिळते. महत्त्वाच्या व्यापारी मार्गांपैकी अवन्ती-दक्षिणापथ हा एक महत्त्वाचा व्यापारी मार्ग होता. हा मार्ग उत्तरेकडे महाराष्ट्रातील पैठणपर्यंत व तेथून पुढे दक्षिणेकडे जात होता. धम्म प्रचारक भिक्खुंमुळे व व्यापारी वर्गामुळे बुद्ध हयात असतानाच बुद्ध धम्माचा प्रवेश महाराष्ट्रात झाला होता.[५]
अजिंठा लेण्यांची निर्मिती इ.स.पू. दुसऱ्या शतकात झाली. कार्ला, भाजा, कान्हेरी, नाशिक, पितळखोर, वेरूळ आणि अजिंठा ही प्राचीन भारतातील व्यापारी दळणवळणाच्या राज्यमार्गावर वसली होती. त्यामार्गाला सार्थवाहपथ असे म्हणले जात असे. चंद्रगुप्त मौर्याने गांधार प्रदेश जिंकून मगध राज्याला जोडल्यावर अशोकाच्या काळात या प्रदेशात बुद्ध धम्माचा व्यापक प्रसार झाला. सम्राट अशोक ह्यांच्या साम्राज्यात महाराष्ट्राचा देखील समावेश होता. अशोकाच्या आठव्या आणि नवव्या धर्माज्ञेचे शिलाखंड ठाणे जिल्ह्यातील सोपारा येथे सापडले आहेत. सोपारा ही मौर्यांची प्रांतिक राजधानी होती. सुत्तनिपातातील पारायण वग्गावरून धम्मप्रचारक भिक्खुंमुळे आणि व्यापाऱ्यांमुळे बुद्ध हयात असतानाच बौद्ध धम्माचा प्रवेश महाराष्ट्रात झाला होता. इ.स.पू. चौथ्या शतकात वैशाली येथे दुसरी बौद्ध धम्म संगिनी भरली होती. अपरांत देशांतून आठ अर्हंत आणि अवंती व दक्षिणापथ या देशातून अठ्ठाऐंशी अर्हंत यशाचे निमंत्रण स्वीकारून वैशालीस गेले होते. बुद्ध धम्माची मते मूळ शुद्ध स्वरूपात रहावीत व धम्माचा प्रचार होण्यासाठी उपाय योजना करावी असे दोन मुख्य उद्देश ही संगीनी भरवण्यामागे होते.[६]
त्रिपिटकात निष्णात असलेले भिक्खू थेर मोग्गलीपुत्ततिस्साने एक हजार विद्वान भिक्खुंना निवडून शुद्ध स्वरूपात धम्म लिहून काढण्यास सांगितले. हे काम नऊ महिने चालले होते. तिसऱ्या धम्म संगितीची परिणीती म्हणून धम्म प्रचारासाठी निरनिराळ्या देशांत पाठविण्यात आलेले धर्मोपदेशक होत. त्यात "महारठ्ठ महाधम्म रक्खित थेर नाम कमू" म्हणजे महाधम्म रक्खिताला महारठ्ठ नावाच्या देशात कार्तिक महिन्यात पाठविले. इ.स.पू. तिसऱ्या व चौथ्या शतकात महाराष्ट्रात बऱ्याच मोठ्या प्रमाणावर बुद्ध धम्माचा प्रचार झाला होता. मौर्याचा आणि सात वाहनाचा काळ महाराष्ट्राच्या इतिहासातील सुवर्णकाळ होता. त्या वेळच्या वाढलेल्या अधिक संपत्तीचा अविष्कार म्हणजे महाराष्ट्रात निर्माण झालेले कला कौशल्याने युक्त असे अनेक बुद्ध विहार योगाचाराचा तत्त्ववेत्ता असंग काही दिवस अजिंठा येथे राहत होता. अजिंठा येथील चित्रकला जवळजवळ एक हजार वर्ष अव्याहत चालली होती. तेथून मध्य प्रदेशातील बाघा, दक्षिणेतील बदमी, सिग्रिया, सित्तनवसाल मध्ये आशियातील बामीयान, तिबेट आणि चीन देशांतील तुनऱ्हुआंग येथे तिचा प्रचार झाला. अजिंठा येथे शिल्पकला व चित्रकला शिकवण्याचे विद्यालय होते.[७]
महाराष्ट्रात बौद्ध धर्माचा प्रचार व प्रसार सातवाहन काळात फार मोठ्या प्रमाणात झाला असून यात नाग लोकांचे मोठे योगदान होते. पुरातन वास्तू व प्राचीन लिखाण यांचा शोध घेतला असता बौद्ध धर्म हा महाराष्ट्रात सातव्या शतकापर्यंत मोठ्या प्रमाणावर प्रचलित होता. पर्सी ब्राऊन या विद्वानाच्या मते भारतातील बौद्ध शिल्पांपैकी अर्ध्याहून अधिक शिल्पे (लेणी) महाराष्ट्रात सापडतात, ही गोष्ट बौद्ध धर्माला महाराष्ट्रात त्या काळी असलेली लोकप्रियता दर्शविते. अशा तऱ्हेची डोंगरात खोदून काढलेली वास्तु-शिल्पे त्याकाळी महाराष्ट्र बौद्ध धर्माचे अधिपत्य दर्शविते. सिद्धांच्या माध्यमातून नाथांपर्यंत आणि नाथांपासून वारकरी संप्रदायापर्यंत बौद्धधम्म झिरपत गेला. बौद्ध धर्म हा महाराष्ट्रात सातव्या शतकापर्यंत मोठ्या प्रमाणावर अनुसरला जात होता.[८]
अनेक शतके बुद्ध धम्म जंबुव्दीपातील प्रमुख राजधर्म होता. महाराष्ट्रातील संतांवर सुद्धा बौद्ध धम्माचा प्रभाव. संत एकनाथ म्हणतात, "लोक देखोनि उन्मत्त दारांनी असक्ता न बोले बौद्ध रूप ठेविले जधनी हात धर्म लोपला अधर्म जाहला हेतून पाहासी द्या लागे बौद्ध रूपे पंढरी नांदसी”. संत तुकराम महाराज सुद्धा विठ्ठलाला बुद्ध समजतात. ते म्हणतात की "बुद्ध अवतार महिमा अदृष्ठा मैन मुखे निष्ठा धरियली". 'मेमॉयर ऑन द केव्ह टेंपल' या ग्रंथात पंढरपूरचे विठ्ठल मंदिर बुद्धाचे असल्याचे साक्ष देतो.[९]
आंबेडकरांची धम्मक्रांती
बौद्ध शिल्पे, स्मारके व तीर्थस्थळे
बौद्ध विहारे
- दीक्षाभूमी, नागपूर
- दीक्षाभूमी (चंद्रपूर)
- चैत्यभूमी, मुंबई
- ड्रॅगन पॅलेस बौद्ध विहार, कामठी, नागपूर
- ग्लोबल विपश्यना पॅगोडा, मुंबई
- विश्वशांती स्तूप, वर्धा
- मुक्तीभूमी, येवला
बौद्ध लेणी
भारतात सुमारे १४०० लेणी आहेत, त्यापैकी सुमारे ११०० महाराष्ट्र राज्यात आहेत. देशातील व महाराष्ट्रातील बहुसंख्य लेणी ह्या बौद्ध लेणी आहेत. सर्व महाराष्ट्रातील बौद्ध लेणी या बौद्ध तीर्थस्थळे व प्रार्थनास्थळे आहेत. भारतात अनेक बौद्ध लेणी किंवा बुद्ध लेणींची निर्मीती झालेली आहेत त्यातील बहुतांश बुद्ध लेणी या महाराष्ट्र राज्यात निर्मिलेल्या आहेत.
- अजिंठा लेणी
- अंबा-अंबिका लेणी
- भीमाशंकर लेणी
- अगाशिव लेणी (जखीणवाडी लेणी)
- आंबिवली
- छत्रपतीसंभाजीनगर अश्मक लेणी
- कान्हेरी लेणी
- कार्ले लेणी
- कुडा लेणी
- कांब्रे लेणी
- कोंडाणा लेणी
- खडसांबळे
- खरोसा
- लेण्याद्री (गिरिजात्मज)
- गांधारपाले लेणी
- घटोत्कच लेणी
- घारापुरी लेणी
- जुन्नर
- बहरोट लेणी
- ठाणाळे लेणी
- ढाक
- तुळजा लेणी
- तेर
- धाराशिव लेणी
- नाडसूर लेणी
- नाणेघाट
- नेणावली लेणी
- पन्हाळेकाजी लेणी
- त्रिरश्मी लेणी (पांडवलेणी)
- पाताळेश्वर
- पितळखोरे लेणी
- बेडसे लेणी
- भाजे लेणी
- भामचंद्र
- भूत लेणी
- महाकाली लेणी
- मागाठाणे लेणी
- मंडपेश्वर लेणी
- वाई लेणी
- वेरूळ लेणी
- जोगेश्वरी लेणी
- नांदगिरी लेणी
- शिरवळ लेणी
- शिवनेरी लेणी
- घोरावाडी लेणी
- हरिश्चंद्रगड
- त्रिरश्मी लेणी
स्मारके
सण, उत्सव व विशेष दिवस
महाराष्ट्रातील बौद्ध लोक बुद्ध पौर्णिमा, भीमजयंती, धम्मचक्र प्रवर्तन दिन, गुरुपौर्णिमा, वर्षावास, नामांतर दिन असे अनेक विशेष दिवस उत्सव म्हणून साजरे करतात.
बुद्धपौर्णिमा
वैशाख पौर्णिमेला बुद्धांचा जन्म झाला, ह्याच पौर्णिमेला त्यांना ज्ञान प्राप्ती झाली आणि ह्याच पौर्णिमेला त्यांचे महापरिनिर्वाण देखील झाले त्यामुळे बौद्ध संस्कृतीत बुद्धपौर्णिमेला महत्त्वाचे स्थान आहे.[१०][११]
धम्मचक्र प्रवर्तन दिन
१४ ऑक्टोबर १९५६ अशोक विजयादशमी रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या ६,००,००० अनुयायांसोबत नागपूर येथे बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. दरवर्षी अशोक विजयादशमी रोजी लाखो बौद्ध अनुयायी दीक्षाभूमी येथे साजरा करतात तसेच औरंगाबाद लेणी परिसर यासारख्या राज्यातील अनेक जिल्ह्यांतील-शहरातील स्थानिक बौद्ध स्थळांवर देखील हा सण साजरा करतात.[१२][१३][१४]
भीमजयंती
१४ एप्रिल १८९१ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला, त्यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी लाखो अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा देऊन भारतातून नाहीसा झालेल्या बौद्ध धम्माला पुनर्जीवित केले आणि बौद्धांचे ते आदरणीय ठरले. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती बौद्ध उत्सवाप्रमाणे साजरी केली जाते.
गुरुपौर्णिमा
आषाढ पौर्णिमेला सिद्धार्थ गौतमाने (बुद्धाने) गृहत्याग केला होता, शिवाय ह्याच पौर्णिमेला वाराणसी येथील सारनाथ जवळील मृगदाय वनामध्ये पाच परिव्राजकांना बुद्धाने धम्मदीक्षा दिली. सम्बोधी प्राप्तीनंतरचे हे बुद्धाचे पहिले धम्मचक्र प्रवर्तन होय.
वर्षावास
वर्षावास ह्या शब्दाचा विग्रह केल्यास 'वर्षा+वास' असा होतो व त्याचा अर्थ 'वर्षा ऋतूमध्ये एकाच ठिकाणी वास्तव्य करणे असा होतो. आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा हा काळ पावसाळ्याचा असल्यामुळे बौद्ध भिक्खू एका विहारात राहून तेथील उपासकांना व उपासिकांना धम्मोपदेश करतात म्हणून या वास्तव्यास 'वर्षावास' असे म्हणले जाते.[१५]
नामांतर दिन
नामांतर आंदोलन इ.स. १९७६ ते १९९४ या दरम्यान महाराष्ट्रात घडलेले दलित-बौद्ध चळवळीचे एक आंदोलन होते. छत्रपती संभाजी नगर येथील 'मराठवाडा विद्यापीठा'ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे ही 'सरकारी मागणी' या आंदोलनाची होती. शेवटी सोळा वर्षाच्या लढाईनंतर छत्रपती संभाजी नगरातील मराठवाडा विद्यापीठाला १४ जानेवारी १९९४ रोजी "डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ" असे नाव देण्यात आले. त्यामुळे दरवर्षी १४ जानेवारी रोजी बौद्ध अनुयायांद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरात नामांतर दिन साजरा केला जातो.[१६]
महापरिनिर्वाण दिन
महापरिनिर्वाण दिन हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन (पुण्यतिथी) असून तो ६ डिसेंबर रोजी आयोजित केला जातो. आंबेडकरांचे ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्ली येथे (सध्या डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारक) महापरिनिर्वाण अर्थात निधन झाले होते, याच्या दुसऱ्या दिवशी ७ डिसेंबर रोजी मुंबईतील चैत्यभूमी येथे त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. निधनाच्या काही दिवसांपूर्वी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी त्यांनी लक्षावधी अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला होता, त्यांना बौद्ध लोक 'बोधिसत्व' मानतात. आंबेडकर हे बौद्ध गुरू होते, यामुळे त्यांच्या पुण्यतिथीसाठी 'महापरिनिर्वाण' हा बौद्ध संकल्पनेतील शब्द वापरण्यात आला आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त दरवर्षी १ डिसेंबर पासून मुंबईतील त्यांचे समाधीस्थळ असलेल्या चैत्यभूमी येथे भारतभरातून लक्षावधी लोक येतात. चैत्यभूमी येथे २५ लाखाहून अधिक भीमानुयायी जमा होतात, व चैत्यभूमी स्तूपात ठेवलेल्या आंबेडकरांच्या अस्थीकलश व प्रतिमेस अभिवादन करतात व बाबासाहेबांचे दर्शन घेतात. मुंबईत यावेळी बौद्धांची संख्या ३० लाखावर झालेली असते. या दिवशी भारत तसेच जगभरातील आंबेडकरवादी व्यक्ती आंबेडकरांची प्रतिमा व मुर्ती समोर ठेवून त्याच्या स्मृतीस अभिवादन करतात.[१७][१८][१९][२०]
विविध बौद्ध पौर्णिमा
बौद्ध संस्कृतीत विविध पौर्णिमांचे वेगवेगळे महत्त्व आहे. वैशाख पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे, कारण राजपुत्र सिद्धार्थ गौतम (बुद्ध) यांचा जन्म, बोधिसत्वाची सम्यक सम्बोधी, धम्मचक्र प्रवर्तन आणि बुद्धाचे महापरिनिर्वाण इत्यादी महत्त्वाच्या घटना, वैशाख पौर्णिमेच्या दिवशीच घडलेल्या आहेत.
चैत्र पौर्णिमा
बुद्धत्व प्राप्त होण्यापूर्वी सिद्धार्थ गौतम, बोधगया (बुद्धगया) येथे निरंजना नदीच्या तीरावर वटवृक्षाखाली तपश्रर्या करीत बसलेले असताना, सुजाता नावाच्या स्त्रीने सिद्धार्थ गौतमास खीर दिली. त्यामुळे चैत्र पौर्णिमा सुजाताचे खीरदान म्हणून ओळखले जाते.
वैशाख पौर्णिमा
वैशाख पौर्णिमेला सिद्धार्थ गौतमाच्या जीवनामध्ये महत्त्वाच्या घटना घडलेल्या आहेत त्या खालीलप्रमाणे :
- सिद्धार्थ गौतमाचा जन्म : लुम्बिनी वनामध्ये राजपुत्र सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला.
- युवराज्ञी यशोधरेचा जन्म : कोलीय राजा दंडपाणी यांच्या राजवाड्यात यशोधरेचा जन्म झाला.
- विवाह : राजपुत्र सिद्धार्थ गौतम यांचा विवाह युवराज्ञी राजकुमारी यशोधराशी झाला.
- ज्ञानप्राप्ती : बुद्धगया येथे सिद्धार्थ गौतमाला पिंपळाच्या झाडाखाली ज्ञानप्राप्ती झाली.
- महापरिनिर्वाण : वयाच्या ८०व्या वर्षी कुशीनगर येथील शालवनात जोडवृक्षाखाली भगवंताचे महापरिनिर्वाण झाले.
ज्येष्ठ पौर्णिमा
- सुजाताची धम्म दीक्षा : भगवंतानी सुजातास धम्मदीक्षा दिली.
- श्रीलंकेमध्ये बोधिवृक्ष लावला : सम्राट अशोकाचा पुत्र महेंद्र व कन्या संघमित्रा यांनी श्रीलंका देशातील अनुराधापुरम येथे भारतामधून आणलेली बोधिवृक्षाची शाखा लावली.
- भिक्खू महेंद्रचे निर्वाण : भिक्खू महेंद्रांनी श्रीलंकेमध्ये ३८ वर्ष बौद्ध धम्माचा प्रचार केला आणि भिक्खू महेंद्राचे निर्माण सुद्धा ह्याच दिवशी झाले.
आषाढ पौर्णिमा
- सिद्धार्थ गौतमाचा गृहत्याग : रोहिणी नदीच्या पाणी वापरावरून शाक्य आणि कोलीय यांच्यामध्ये वादविवाद झाला, हा वाद युद्धानेच मिटवावा असा शाक्य संघानी घेतलेला निर्णय, सिद्धार्थ गौतमांनी अमान्य केला. सिद्धार्थ गौतमांनी निर्णय अमान्य केल्यामुळे, शाक्य संघानी सिद्धार्थाला दिलेली गृहत्यागाची शिक्षा सिद्धार्थाने मान्य केली व गृहत्याग केला.
- पाच परिव्राजकांची धम्मदीक्षा: वाराणसी येथील सारनाथजवळील मृगदाय वनामध्ये पाच परिव्राजकांना भगवंताने धम्मदीक्षा दिली. सम्बोधी प्राप्तीनंतरचे हे भगवंताचे पहिले धम्मचक्र प्रवर्तन होते.
श्रावण पौर्णिमा
- अंगुलीमालाची धम्मदीक्षा : एक कुविख्यात, चोर, डाकू, दरोडेखोर, खुनी अंगुलीमाल याने तथागताकडून धम्मदीक्षा घेतली.
- पहिली विश्वधम्म संगिती : भगवंताच्या महापरिनिर्वाणानंतर राजगृह येथे पहिली विश्वधम्म संगिती भरविण्यात आली.
भाद्रपद पौर्णिमा
- वर्षावास : वर्षावासाची सुरुवात आषाढी पौर्णिमेस होते आणि त्यांची सांगता अश्विनी पौर्णिमेस होते. भाद्रपद हा महिना वर्षावासाच्या कालावधीमध्ये येत असतो.
अश्विन पौर्णिमा
अश्विन पौर्णिमा सुद्धा वर्षावासाच्या कालावधीतच येते. वर्षावासातील अंतिम पौर्णिमा म्हणजे अश्विन पौर्णिमा असते.
- चक्रवर्ती सम्राट अशोकाची धम्मदीक्षा : भिक्खू मोग्गलीपुत्र तिस्सयांना राजा सम्राट अशोक यांनी आपले धम्मगुरू मानले व त्यांच्याकडून सम्राट अशोक राजाने धम्मदीक्षा घेतली. तो दिवस अश्विन शुद्ध दशमी होता. याच दिवसाला "अशोक विजयादशमी" किंवा "दसरा" म्हणतात.
कार्तिक पौर्णिमा
वर्षावास : आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा हा काळ पावसाळ्याचा असल्यामुळे बौद्ध भिक्खूंना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे शक्य नसते म्हणून या कालावधीत बौद्ध भिक्खू एका विहारात राहून तेथील उपासकांना धम्मोपदेश करतात म्हणून या वास्तव्यास 'वर्षावास' असे म्हणतात. वर्षावास समाप्तीनंतर बौद्ध भिक्खू धम्म प्रचारासाठी बाहेर पडण्याचा महिना कार्तिक महिना होय.
कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी घडलेल्या महत्त्वाच्या घटना खालीलप्रमाणे :
- धम्मसेनापती सारिपुत्र आणि महामौद्गल्यान यांनी तथागताकडून धम्मदीक्षा घेतली.
- सारिपुत्राचे ३ भाऊ व ३ बहिणी व आईने धम्मात प्रवेश केला.
- भदन्त सारिपुत्राचे निर्वाण झाले.
- भदन्त महामौद्गल्यान यांची कार्तिक अमावस्येच्या दिवशी निगठानी हत्या केली.
मार्गशीर्ष पौर्णिमा
- राजगृहास भेट : सिद्धार्थ गौतमाने गृहत्याग केल्यानंतर मगध देशाचा राजा बिंबिसार यांची राजगृह येथे भेट झाली.
- नालागिरी हत्ती : देवदत्ताने तथागताचा प्राण घेण्याच्या उद्देशाने 'नालागिरी' नावाच्या हत्तीस मद्य पाजून भगवंताच्या अंगावर सोडले.
पौष पौर्णिमा
- भगवंतांची राजगृहास पुन्हा भेट : सिद्धार्थ गौतमाने गृहत्याग केल्यानंतर मगध देशाचा राजा बिंबिसार यांची प्रथम भेट राजगृह येथे झाली होती. त्यावेळी सिद्धार्थ गौतमाने बिंबिसार राजास वचन दिले होते की, मला बुद्धत्व प्राप्ती झाल्यानंतर मी आपली पुन्हा अवश्य भेट घेईन. त्या वचनपूर्तीसाठी बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर तथागत बुद्धाने पुन्हा राजगृह येथे भेट दिली.
- वेळूवन भिक्खू संघास दान : राजा बिंबिसाराने त्यांचे सुंदर, सुगंधी भव्य वेळूवन भगवंताच्या संघास दान दिले.
- राजा बिंबिसाराने भगवंताकडून धम्मदीक्षा घेतली.
माघ पौर्णिमा
- महापरिनिर्वाणाची घोषणा : माघ पौर्णिमेस वैशाली येथील विहारात आराम करीत असताना भगवंताने आपला प्रिय शिष्य आनंद यास जवळ बोलावून म्हणले 'आनंद' - "तथागत आजपासून तीन महिन्यांनी म्हणजे वैशाखी पौर्णिमेस महानिर्वाण पावतील."
- भगवंतानी वैशाली नगरीचे अंतिम दर्शन घेतले.
- वैशाली नगरीच्या लिच्छवी जनतेस, आठवणींचे प्रतीक म्हणून भगवंतानी त्यांचे भिक्षापात्र दान दिले.
- भगवंताचा प्रिय शिष्य आनंद यांचे महापरिनिर्वाण झाले.
फाल्गुन पौर्णिमा
- कपिलवस्तू नगरीस भेट : सम्यक सम्बोधी प्राप्त झाल्यानंतर तथागताने आपल्या भिक्खू संघासह कपिलवस्तू नगरीस भेट दिली.
- पुत्र राहुलची धम्मदीक्षा : सिद्धार्थ गौतमाचा पुत्र राहुल यास भदन्त सारिपुत्र यांनी धम्मदीक्षा दिली.
प्रथा व परंपरा
लोक समूह
बौद्ध धर्मात जाती नाही. विविध समूह किंवा समाज बौद्ध धर्माचे अनुसरण करतात, ज्यात प्रामुख्याने अनुसूचित जाती, जमाती, भटके, विमुक्त, व ओबीसी यांचा समावेश होतो. प्रामुख्याने अनुसूचित जाती ही बौद्ध धर्मीय असलेला समूह आहे, ज्यात प्रामुख्याने महार, मांग व चांभार हे तीन समाज प्रमुख आहेत.
भाषा
महाराष्ट्रातील बौद्धांची मातृभाषा ही मराठी आहे. याशिवाय त्यांना हिंदी भाषा देखील समजते, आणि बरेचजण इंग्लिशही बोलतात. मराठी बोलणारे बौद्ध अनेक मराठीतील बोलीभाषा बोलतात, ज्यात मराठवाडी बोलीभाषा अहिराणी, आगरी, काणकोणची कोकणी, कोकणा, कोकणी, कोल्हापुरी, गडहिंग्लज पूर्वभागातील मराठी बोली, चंदगडी, जुदाव मराठी, झाडीबोली, तंजावर मराठी, तावडी, दखनी, नारायणपेठी, नॉ लिंग, पद्ये, पावरा, पूर्व मावळी, बेळगावी मराठी, मांगेली, मालवणी, मिंग्लिश, लमाणी, लेवा, वऱ्हाडी, वाघरी, सामवेदी, सोलापुरी इत्यादींचा समावेश होतो.
लोकसंख्या
इ.स. १९५१ मध्ये महाराष्ट्रात अवघे २,४८९ बौद्ध (०.०१%) होते, डॉ. आंबेडकरांच्या सामूदायिक धर्मांतरानंतर इ.स. १९६१ मध्ये ही संख्या १,१५,९९१% वाढून २७,८९,५०१ झाली होती.
वर्ष | बौद्ध लोकसंख्या (लाखात) | राज्यातील प्रमाण (%) | वाढ (वृद्धी) (%) |
---|---|---|---|
इ.स. १९५१ | ०.०२५ | ०.०१ | — |
इ.स. १९६१ | २७.९० | ७.०५ | १,१५,९९०.८ |
इ.स. १९७१ | ३२.६४ | ६.४८ | १६.९९ |
इ.स. १९८१ | ३९.४६ | ६.२९ | २०.८९ |
इ.स. १९९१ | ५०.४१ | ६.३९ | २७.७५ |
इ.स. २००१ | ५८.३९ | ६.०३ | १५.८३ |
इ.स. २०११ | ६५.३१ | ५.८१ | ११.८५ |
जिल्हानिहाय बौद्ध लोकसंख्या
२०११ च्या राष्ट्रीय जनगणनेनुसार, महाराष्ट्रातील जिल्हानिहाय बौद्ध लोकसंख्या खालील प्रमाणे आहे.[२२]
क्र. | जिल्हा | एकूण लोकसंख्या | बौद्ध लोकसंख्या | बौद्ध प्रमाण (%) | संदर्भ |
---|---|---|---|---|---|
१ | नागपूर | ४६,५३,५७० | ६,६८,०५० | १४.३६% | [२२][२३] |
२ | मुंबई उपनगर | १,२४,४२,३७३ | ६,०३,८२५ | ४.८५% | [२२][२४][२५] |
३ | ठाणे (पालघरसह) | १,१०,६०,१४८ | ४,४९,६१७ | ४.०७% | [२२][२६] |
४ | अमरावती | २८,८८,४४५ | ३,८३,८९१ | १३.२९% | [२२][२७] |
५ | बुलढाणा | २५,८६,२५८ | ३,६४,२१९ | १४.०८% | [२२][२८] |
६ | नांदेड | ३३,६१,२९२ | ३,५४,१८९ | १०.५४% | [२२][२९] |
७ | पुणे | ९४,२९,४०८ | ३,४०,४०४ | ३.६१% | [२२][३०] |
८ | अकोला | १८,१३,९०६ | ३,२८,०३३ | १८.०८% | [२२][३१] |
९ | औरंगाबाद | ३७,०१,२८२ | ३,०९,०९३ | ८.३५% | [२२][३२] |
१० | चंद्रपूर | २२,०४,३०७ | २,८६,७३४ | १३.०१% | [२२][३३] |
११ | यवतमाळ | २७,७२,३४८ | २,४९,८७४ | ९.०१% | [२२][३४] |
१२ | परभणी | १६,३६,०८६ | १,८७,८९९ | १०.२३% | [२२][३५] |
१३ | वाशीम | ११,९७,१६० | १,७९,३३० | १४.९८% | [२२][३६] |
१४ | हिंगोली | ११,७७,३४५ | १,७६,६७९ | १५.०१% | [२२][३७] |
१५ | वर्धा | १३,००,७७४ | १,७५,४१७ | १३.४९% | [२२][३८] |
१६ | भंडारा | १२,००,३३४ | १,५४,४५८ | १२.८७% | [२२][३९] |
१७ | जालना | ११,५९,०४६ | १,५२,५४० | ७.७९% | [२२][४०] |
१८ | जळगाव | ४२,२९,९१७ | १,४३,८६५ | ३.४०% | [२२][४१] |
१९ | सातारा | ३०,०३,७४१ | १,४१,३१५ | ४.७०% | [२२][४२] |
२० | मुंबई शहर | ३०,८५,४११ | १,३४,२५७ | ४.३५% | [२२][४३] |
२१ | गोंदिया | १३,२२,५०७ | १,२५,२८२ | ९.४७% | [२२][४४] |
२२ | रायगड | २६,३४,२०० | १,२१,७९१ | ४.६२% | [२२][४५] |
२३ | रत्नागिरी | १६,१५,०६९ | १,१३,४६७ | ७.०३% | [२२][४६] |
२४ | नाशिक | ६१,०७,१८७ | ९४,७८३ | १.५५% | [२२][४७] |
२५ | गडचिरोली | १०,७२,९४२ | ८२,६९५ | ७.७१% | [२२][४८] |
२६ | बीड | २५,८५,०४९ | ६८,४८२ | २.६५% | [२२][४९] |
२७ | लातूर | २४,५४,१९६ | ६६,५३५ | २.७१% | [२२][५०] |
२८ | सांगली | २८,२२,१४३ | ३८,२१० | १.३५% | [२२][५१] |
२९ | सोलापूर | ४३,१७,७५६ | ३५,४९७ | ०.८२% | [२२][५२] |
३० | अहमदनगर | ४५,४३,१५९ | ३३,८९८ | ०.७५% | [२२][५३] |
३१ | कोल्हापूर | ३८,७६,००१ | २९,७६६ | ०.७७% | [२२][५४] |
३२ | उस्मानाबाद | १६,५७,५७६ | २८,२१६ | ४.३५% | [२२][५५] |
३३ | सिंधुदुर्ग | ८,४९,६५१ | २४,७६२ | २.९१% | [२२][५६] |
३४ | धुळे | २०,५०,८६२ | १३,४०५ | ०.६५% | [२२][५७] |
३५ | नंदुरबार | १६,४८,२९५ | ४,९६९ | ०.३०% | [२२][५८] |
- | एकूण | ११,२३,७४,३३३ | ६५,३१,२०० | ५.८१% | [२२][५९] |
२०११ च्या जनगणनेनुसार भारतातील ८४,४२,९७२ बौद्धांपैकी ६५,३१,२०० (७७.३६%) बौद्ध हे महाराष्ट्र राज्यात आहेत. महाराष्ट्रातील मराठी बौद्ध धर्मीय समुदाय हा भारतातील सर्वात मोठा बौद्ध समुदाय आहे. बौद्धांचे सर्वात जास्त प्रमाण विदर्भातील बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये आहे. या ११ जिल्ह्यांत एकूण ६५ लाख बौद्धांपैकी सुमारे ३० लाख (४६%) बौद्ध आहेत. यापैकी आठ जिल्ह्यांमध्ये बौद्धांची लोकसंख्या १२ ते १५ % आहे, तर अकोला जिल्ह्यामध्ये बौद्धांचे १८% एवढे उच्च प्रमाण आहे. गोंदिया, गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये अनुसूचित जमातींची लोकसंख्या जास्त असून तेथे बौद्धांची प्रमाण ७ ते १०% दरम्यान आहे. आणखी १२ लाख बौद्ध हे मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, परभणी, जालना आणि औरंगाबाद या जिल्ह्यांत आहेत. यातील आधीच्या तीन जिल्ह्यांमध्ये बौद्धांचे प्रमाण १०% पेक्षा जास्त आहे, तर हिंगोली जिल्ह्यामधील लोकसंख्येत १५% बौद्ध आहेत. ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई जिल्हा, रायगढ, पुणे, सातारा आणि रत्नागिरी या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांत आणखी १८ लाख बौद्ध आहेत, यातील मुंबई उपनगर जिल्हा आणि रत्नागिरी जिल्हा वगळता इतर जिल्ह्यांच्या लोकसंख्येत बौद्धांचे प्रमाण ५ टक्क्यांपेक्षा कमी आहे. मुंबई उपनगर आणि रत्नागिरी जिल्ह्यांच्या लोकसंख्येत अनुक्रमे ५% आणि ७% बौद्ध आहेत.
बुलढाणा, वाशिम, हिंगोली, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ व गडचिरोली या दहा जिल्ह्यांमध्ये बौद्ध धर्म हा दुसरा सर्वात मोठा धर्म आहे, यापैकी हिंगोली जिल्हा वगळता बाकीचे सर्व जिल्हे विदर्भातील आहेत. सोलापूर (०.८%), कोल्हापूर (०.८%), अहमदनगर (०.८%), धुळे (०.७) व नंदुरबार (०.३%) या पाच जिह्यांत बौद्धांचे प्रमाण १% पेक्षा कमी आहे. मुंबईत (मुंबई उपनगर व मुंबई शहर जिल्हा) सर्वाधिक बौद्ध लोकसंख्या ७,३८,०८२ आहे, जी राज्यातील एकूण बौद्ध लोकसंख्येचा ११.३०% भाग आहे.
अनुसूचित जाती प्रवर्गातील बौद्ध
- | एकूण बौद्ध लोकसंख्या | अनु.जाती. बौद्ध लोकसंख्या | प्रमाण (%) |
---|---|---|---|
भारत | ८४,४२,९७२ | ५७,५७,००० | ६८.१९% |
महाराष्ट्र | ६५,३१,२०० | ५२,०४,२८४ | ७९.६८% |
भारतात अनुसूचित जातींमध्ये (दलित) बौद्ध धर्म अतिशय वेगाने वाढत आहे. इ.स. २००१ मध्ये देशात ४१.५९ लाख बौद्ध धर्मीय हे अनुसूचित जाती प्रवर्गातील होते, तर दहा वर्षात इ.स. २०११ मध्ये हे प्रमाण ३८% वाढून ५७.५६ लाख एवढे झाले आहे. भारत देशातील एकूण अनुसूचित जातीच्या बौद्धांपैकी सुमारे ९०% महाराष्ट्रात राहणारे आहेत.[६०] महाराष्ट्रात एकूण बौद्ध लोकसंख्येत ५२,०४,२८४ (७९.६८%) अनुसूचित जातीचे बौद्ध आहेत.[६०] तर महाराष्ट्रातील एकूण १,३२,७५,८९८ अनुसूचित जातींत बौद्धांचे प्रमाण ३९.२०% आहे. महाराष्ट्रातील अनुसूचित जातींच्या बौद्ध लोकसंख्येत तब्बल ६०% वाढ झाली आहे.[६१]
बौद्ध व दलित स्थिती
राजकारण
महाराष्ट्रातील २८८ विधानसभा मतदार संघापैकी ६३ मतदार संघांत बौद्ध व अनुसुचित जातीचा प्रभाव आहे.
विविध समाजगटांना, समूहांना, जातींना प्रतिनिधित्व देणारे प्रमुख राजकीय पक्ष लोकसभा निवडणूकीत राज्यात लोकसंख्येने बौद्ध समाजाला कमी उमेदवारी देतात. महाराष्ट्रातील बौद्ध समाज हा मुख्यत: आंबेडकरी-रिपब्लिकन चळवळीशी जोडलेला आहे. आणि तो रिपाइंच्या प्रमुख चार गटांत तो विभागला गेला आहे. तसेच बौद्ध समाजातील काही लोक हे थेट काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, मनसे, बसप यांसारख्या राजकीय पक्षांत प्रवेश करून काम करीत आहेत. मात्र, बहुसंख्य बौद्ध व अन्य दलित जातीतील आंबेडकरी चळवळीला मानणारा समाज हा रिपाइंच्या माध्यमातून आपले राजकारण करीत आहे. आजवर रिपाइं गटांचे राजकारण हे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांबरोबर राहिले आहे. त्यामुळे हा बहुसंख्य बौद्ध समाज रिपाइंच्या माध्यमातूनही युती करून दोन्ही काँग्रेसबरोबर राहिलेला आहे. तसेच त्यातील काही भाग हा सेना-भाजपसोबतही आहे. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत रिपाइंच्या सर्वच गटांना, त्यांच्या नेत्यांना ज्या प्रकारे पराभवाला सामोरे जावे लागले, युती-आघाडी केलेल्या पक्षांकडूनच घात झाला होता, त्यानुसार प्रस्थापित पक्षांनी जाणीवपूर्वक रिपब्लिकन नेत्यांचा पराभव केला होता हे मानले जाते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत रिपाइं नेते रामदास आठवले थेट भाजपसोबत जाऊन महायुतीत दाखल झाले आहेत, तर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर व रिपाइंचे नेते डॉ. राजेंद्र गवई यांना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करून निवडणुका लढवल्या आहेत. दोन्ही काँग्रेस यांनी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे व बहुजन रिपब्लिकन एकता मंचाच्या अध्यक्ष सुलेखा कुंभारे यांचा पाठिंबा काँग्रेसने, तर रिपाइंच्या उपेंद्र शेंडे व गंगाधर गाडे गटाचा राष्ट्रवादीने पाठिंबा मिळवला होता, मात्र त्या बदल्यात त्यांना लोकसभेच्या जागा सोडण्यात आल्या नव्हत्या.
रामदास आठवले यांनी युतीकडे रिपाइंला लोकसभेसाठी किमान तीन मतदारसंघ व एक राज्यसभेची जागा व विधानसभेसाठी सुमारे ३५ मतदारसंघ मागितले होते. मात्र, प्रत्यक्षात आठवलेंना भाजपने राज्यसभेची एक जागा दिली. राज्यातील प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये (आदिवासी भाग वगळून) बौद्ध मतदारांची संख्या ही १० ते ३० हजार वा त्यापेक्षाही काही ठिकाणी अधिक आहे. म्हणजेच प्रत्येक लोकसभा क्षेत्रात बौद्ध मतदारांची लोकसंख्या साठ हजार ते एक लाख असून काही लोकसभा मतदारसंघांत ती चार ते सहा लाख एवढी सर्वाधिकही आहे. विशेषतः बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, वाशीम, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, हिंगोली, परभणी या जिल्ह्यांत बौद्ध समाजाची लोकसंख्या १२ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. मात्र, राजकीयदृष्ट्या बौद्ध समाज विखुरला गेल्याने, रिपाइंच्या गटबाजीमुळे प्रस्थापित राजकीय पक्षांना त्याचा फायदा होत आहे. राखीव जागा तसेच सर्वसाधारण जागांवर बौद्ध समाजातील उमेदवाराला उमेदवारी दिली जात नाही, त्या सर्व ठिकाणी बौद्धेतर उमेदवाराला उमेदवारी देत बौद्धांना राजकारणात एकाकी पाडले जात आहे, असे राजकीय समीक्षक सांगतात. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने प्रमुख राजकीय पक्षांच्या जाहीर झालेल्या उमेदवार याद्यांमधून राजकीयदृष्ट्या या बौद्ध समाजावर अघोषित बहिष्कारच घातला जातोय असे दिसते.[६२]
सामूहिक धर्मांतरे
१९५६ मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नवबौद्ध चळवळीनंतर महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यात अनेक सामूदायिक धर्मांतरे झालेली आहेत आणि आजही होत आहेत. त्यातील काही धर्मांतरे –
१९५० चे दशक
- १४ ऑक्टोबर, १९५६ (नागपूर, महाराष्ट्र) :-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ५,००,००० अनुयायांसोबत बौद्ध धम्म स्वीकारला.
- १५ ऑक्टोबर, १९५६ (नागपूर, महाराष्ट्र) :-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उर्वरित २ ते ३,००,००० अनुयायांसोबत बौद्ध धम्म स्वीकारला.
- १६ ऑक्टोबर, १९५६ (चंद्रपूर, महाराष्ट्र) :-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ३,००,००० अनुयायांसोबत बौद्ध धम्म स्वीकारला.
- ७ डिसेंबर, १९५६ (मुंबई, महाराष्ट्र) :-
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर दहनसंस्काराप्रसंगी उपस्थित १०,००,००० पेक्षा जास्त अनुयायांनी बौद्ध धम्म स्वीकारला.
१९६० चे दशक
१९७० चे दशक
१९८० चे दशक
१९९० चे दशक
२००० चे दशक
२००१ चे दशक
२०११ चे दशक
- मे, २०१७ रोजी, उत्तर प्रदेशमधील सहारनपुर जिल्हातील १८० कुटुंबांनी (सुमारे ८५० व्यक्तींनी) बौद्ध धर्मात धर्मांतर केले.[६४]
- २५ डिसेंबर, २०१७ रोजी, दीक्षाभूमी नागपूर येथे सुमारे ५,००० ओबीसींनी बौद्ध धम्म स्वीकारला.
बौद्ध व दलित आंदोलने
- दलित बौद्ध चळवळ
- नामांतर आंदोलन
- रिडल्स आंदोलन
उल्लेखनिय व्यक्ती
मुख्यः वर्ग:भारतीय बौद्ध
महाराष्ट्रातील काही उल्लेखनिय बौद्ध व्यक्ती खालील प्रमाणे आहेत:
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर (१८९१-१९५६)
- दादासाहेब गायकवाड (१९०२-१९७१)
- यशवंत आंबेडकर (१९१२-१९७७)
- नरेंद्र जाधव (ज. १९५३)
- वामन दादा कर्डक
- भदंत आनंद कौशल्यायन
- रा.सु. गवई
- नामदेव ढसाळ
- प्रकाश आंबेडकर (ज. १९५४)
- रामदास आठवले
- रावसाहेब कसबे
- भालचंद्र मुणगेकर
- सिद्धार्थ जाधव
- भाऊ कदम
- अभिजीत सावंत
- सुखदेव थोरात
- एकनाथ आवाड
- जोगेंद्र कवाडे
- राजकुमार बडोले
- आनंदराज आंबेडकर
- राजरत्न आंबेडकर
- सुनील खोब्रागडे
- भिमराव यशवंत आंबेडकर
हे सुद्धा पहा
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची
- महाराष्ट्रामध्ये धर्म
- भारतामध्ये बौद्ध धर्म
- मराठी बौद्ध
- दलित बौद्ध चळवळ
- नवबौद्ध
- नवयान
संदर्भ
- ^ "डी.एन.ए. इंडिया" (इंग्रजी भाषेत).
- ^ मनु मोदगिल. "दी क्वींट" (इंग्रजी भाषेत).
- ^ मनु मोदगिल. "इंडिया स्पेंड" (हिंदी भाषेत).
- ^ मोरे, एस.एस. (२००२ (तृतीय आवृत्ती)). महाराष्ट्रातील बुद्धधम्माचा इतिहास. औरंगाबाद: कौशल्य प्रकाशन. pp. ३४ व ४३.
|year=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ मोरे, एस.एस. (२००२, तृतीय आवृत्ती). महाराष्ट्रातील बुद्धधम्माचा इतिहास. औरंगाबाद: कौशल्य प्रकाशन. pp. ३४.
|year=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ मोरे, एस.एस. (२००२, तृतीय आवृत्ती). महाराष्ट्रातील बुद्धधम्माचा इतिहास. औरंगाबाद: कौशल्य प्रकाशन. pp. ४५-४८.
|year=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ मोरे, एस.एस. (२००२, तृतीय आवृत्ती). महाराष्ट्रातील बुद्धधम्माचा इतिहास. औरंगाबाद: कौशल्य प्रकाशन. pp. ५४.
|year=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ मोरे, एस.एस. (२००२, तृतीय आवृत्ती). महाराष्ट्रातील बुद्धधम्माचा इतिहास. औरंगाबाद: कौशल्य प्रकाशन. pp. ६४.
|year=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ मोरे, एस.एस. (२००२, तृतीय आवृत्ती). महाराष्ट्रातील बुद्धधम्माचा इतिहास. औरंगाबाद: कौशल्य प्रकाशन. pp. ६९.
|year=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ UNESCO, Lumbini in Nepal is the birthplace of the Lord Buddha, Gethin Foundations, p. 19, which states that in the mid-3rd century BCE the Emperor Ashoka determined that Lumbini was Gautama's birthplace and thus installed a pillar there with the inscription: "... this is where the Buddha, sage of the Śākyas (Śākyamuni), was born."
- ^ For instance, Gethin Foundations, p. 14, states: "The earliest Buddhist sources state that the future Buddha was born Siddhārtha Gautama (Pali Siddhattha Gotama), the son of a local chieftain—a rājan—in Kapilavastu (Pali Kapilavatthu) what is now the Indian–Nepalese border." However, Professor Gombrich (Theravāda Buddhism, p. 1) and the old but specialized study by Edward Thomas, The Life of the Buddha, ascribe the name Siattha/fitta to later sources.
- ^ "...मने शुद्ध जेथे, वसे बुद्ध तेथे!". Maharashtra Times. 1 ऑक्टो, 2017. 2019-10-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-05-17 रोजी पाहिले.
|date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ "दहा देशांतील बौद्ध भिक्खू येणार". Lokmat. 25 सप्टें, 2017.
|date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ "Dhammachakra Pravartan Day | 63व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाची जय्यत तयारी | नागपूर". ABP Majha. 7 ऑक्टो, 2019.
|date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ B. J., Journalism. "What is Vassa in Buddhism?". Learn Religions.
- ^ "'नामविस्तार दिना'साठी विद्यापीठ परिसर सजला". Maharashtra Times.
- ^ "डॉ अम्बेडकर महापरिनिर्वाण दिवस 2018 - Ambedkar Mahaparinirvan Diwas in Hindi". हिन्दीकीदुनिया.com (इंग्रजी भाषेत). 2017-01-24. 2018-05-09 रोजी पाहिले.
- ^ "Mahaparinirvan Din: डा. आंबेडकर का महापरिनिर्वाण दिवस आज, जानें काम की बातें - dr ambedkar mahaparinirvan divas today know important facts". Navbharat Times.
- ^ "What is Mahaparinirvan Divas? All you need to know why BR Ambedkar is linked to it". Latest Indian news, Top Breaking headlines, Today Headlines, Top Stories at Free Press Journal.
- ^ "Dr. Ambedkar Mahaparinirvan Diwas (64th) - 6th December 2019". IndiaCelebrating.com. 23 डिसें, 2016.
|date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ "Religion Data of Census 2011 XI BUDDHISTS". 2019-05-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-05-18 रोजी पाहिले.
- ^ a b c d e f g h i j k l m n o p q r s t u v w x y z aa ab ac ad ae af ag ah ai aj ak "महाराष्ट्राची जिल्हानिहाय धर्म लोकसंख्या". दैनिक लोकमत. २८ ऑगस्ट २०१५. p. ६.
- ^ "Nagpur District Religion Data - Census 2011". www.census2011.co.in.
- ^ https://www.census2011.co.in/census/city/365-mumbai.html
- ^ "Mumbai Suburban District Religion Data - Census 2011". www.census2011.co.in.
- ^ "Thane District Religion Data - Census 2011". www.census2011.co.in.
- ^ "Amravati District Religion Data - Census 2011". www.census2011.co.in.
- ^ "Buldana District Religion Data - Census 2011". www.census2011.co.in.
- ^ "Nanded District Religion Data - Census 2011". www.census2011.co.in.
- ^ "Pune District Religion Data - Census 2011". www.census2011.co.in.
- ^ "Akola District Religion Data - Census 2011". www.census2011.co.in.
- ^ "Aurangabad District Religion Data - Census 2011". www.census2011.co.in.
- ^ "Chandrapur District Religion Data - Census 2011". www.census2011.co.in.
- ^ "Yavatmal District Religion Data - Census 2011". www.census2011.co.in.
- ^ "Parbhani District Religion Data - Census 2011". www.census2011.co.in.
- ^ "Washim District Religion Data - Census 2011". www.census2011.co.in.
- ^ "Hingoli District Religion Data - Census 2011". www.census2011.co.in.
- ^ "Wardha District Religion Data - Census 2011". www.census2011.co.in.
- ^ "Bhandara District Religion Data - Census 2011". www.census2011.co.in.
- ^ "Jalna District Religion Data - Census 2011". www.census2011.co.in.
- ^ "Jalgaon District Religion Data - Census 2011". www.census2011.co.in.
- ^ "Satara District Religion Data - Census 2011". www.census2011.co.in.
- ^ "Osmanabad District Religion Data - Census 2011". www.census2011.co.in.
- ^ "Gondiya District Religion Data - Census 2011". www.census2011.co.in.
- ^ "Raigarh District Religion Data - Census 2011". www.census2011.co.in.
- ^ "Ratnagiri District Religion Data - Census 2011". www.census2011.co.in.
- ^ "Nashik District Religion Data - Census 2011". www.census2011.co.in.
- ^ "Gadchiroli District Religion Data - Census 2011". www.census2011.co.in.
- ^ "Bid District Religion Data - Census 2011". www.census2011.co.in.
- ^ "Latur District Religion Data - Census 2011". www.census2011.co.in.
- ^ "Sangli District Religion Data - Census 2011". www.census2011.co.in.
- ^ "Solapur District Religion Data - Census 2011". www.census2011.co.in.
- ^ "Ahmadnagar District Religion Data - Census 2011". www.census2011.co.in.
- ^ "Kolhapur District Religion Data - Census 2011". www.census2011.co.in.
- ^ "Osmanabad District Religion Data - Census 2011". www.census2011.co.in.
- ^ "Sindhudurg District Religion Data - Census 2011". www.census2011.co.in.
- ^ "Dhule District Religion Data - Census 2011". www.census2011.co.in.
- ^ "Nandurbar District Religion Data - Census 2011". www.census2011.co.in.
- ^ "Maharashtra Religion Data - Census 2011". www.census2011.co.in.
- ^ a b "बौद्ध बढ़े, चुनावी चर्चे में चढ़े". https://m.aajtak.in (हिंदी भाषेत). 2018-05-11 रोजी पाहिले. External link in
|website=
(सहाय्य) - ^ "Buddhism is the fastest growing religion among Scheduled Castes" (इंग्रजी भाषेत).
- ^ https://divyamarathi.bhaskar.com/news/EDT-sandesh-pawar-article-about-election-4562292-NOR.html
- ^ "संग्रहित प्रत". 2020-08-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-07-02 रोजी पाहिले.
- ^ "Dalits still converting to Buddhism, but at a dwindling rate" (इंग्रजी भाषेत).