महानुभाव साहित्यातील सात पद्यग्रंथ
महानुभाव साहित्यातील खास महत्त्वाचे सात पद्यग्रंथ. पंथीयांच्या दृष्टीने महत्त्व पावलेले हे ग्रंथ महानुभावीय कवींच्या अंतःकरणातील भक्तिभावनेतूनच निर्माण होऊन आराध्याच्या लीळास्मरणासाठी आणि पंथीय मतप्रतिपादनासाठी लिहिले गेले असले, तरी त्यांचे कर्ते व्युत्पन्न पंडित असल्याने या सातही ग्रंथांना त्यांनी आपापल्या परीने काव्याचा साज चढविला आहे.
एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस महानुभाव वाङ्मयाच्या मुद्रणाला व प्रकाशनाला विदर्भात प्रारंभ झाला. ज्ञानप्रबोध हा साती ग्रंथांमधील छापला गेलेला पहिला ग्रंथ होय.
साती ग्रंथ एकाच काळातील नाहीत. सव्वाशे वर्षांच्या कालावधीत त्यांची निर्मिती झाली. पंचकृष्णांविषयी निस्सीम भक्ती ही त्यांची निर्मितीप्रेरणा आहे. विषयांचे स्वरूप भिन्न असूनही योगायोगाने त्यांची मोट एकत्र बांधली गेली आहे. रुक्मिणीस्वयंवर, शिशुपालवध, उद्धवगीता व वछाहरण यांना भागवताचा आधार आहे. सह्याद्रि-महात्म्य व ऋद्धिपुरवर्णन स्वतंत्र आहेत.
मराठी साहित्यातील या काव्यरूपी सप्तर्षींनी श्रीचक्रधरोक्त पंथावर वाटचाल करणाऱ्या पथिकाचा मार्ग तर उजळलाच पण पंथीयेतर रसिकांनासुद्धा साहित्याचे समाधान मिळवून दिले. अभिव्यक्तीतील पारंपरिकता हे साती ग्रंथांचे मोठे वैगुण्य आहे. सर्व काव्यांमध्ये साचेबंदपणा आढळतो. पंथनिष्ठा व चक्रधरभक्ती समान आहे; वर्णनशैलीची ढब ठरून गेल्यासारखी आहे; श्रीमूर्तिवर्णनात सर्वत्र सारखेपणा आहे.
सूची
ग्रंथनाम (कर्ता, निर्मितिकाल) या क्रमाने
१. रुक्मिणीस्वयंवर (नरेंद्र, १२९३)
२. शिशुपाळवध (भास्करभट्ट बोरीकर, १३१२)
३. उद्धवगीता (भास्करभट्ट बोरीकर, १३१३)
४. वछाहरण (दामोदरपंडित, १३१६)
५. सह्याद्रि-माहात्म्य (रवळोबास, १३५६)
६. ऋद्धिपुरवर्णन (नारो बहाळिए, १४१८)
७. ज्ञानप्रबोध (पं. विश्वनाथ बाळापूरकर, १४१८)
साती ग्रंथांची सामूहिक वैशिष्ट्ये
- आराध्याविषयी निस्सीम भक्ती
- नमने – पंचकृष्ण व नागदेवाचार्य (नरेंद्र अपवाद)
- रंकवृत्ती आणि आत्मविश्वास
- संयम, प्रमाणबद्धता आणि प्रस्तुताप्रस्तुत विवेक
- भाषाशास्त्रीय समानता (पंथविचारांमुळे?)
- सात्त्विकभावांचे वर्णन
- श्रीमूर्तिवर्णन
- अलंकारबहळता आणि अत्युक्तिपूर्णता
साती ग्रंथांची मराठी साहित्याला देणगी
- साहित्यप्रकाराची विविधता – आख्यानकाव्य, स्थलवर्णनपर काव्य, तत्त्वपरकाव्य.
- विदग्ध संस्कृत महाकाव्याचा घाट पचवून नरेंद्राने काव्यनिर्मिती केली.
- बहारीच्या निसर्गवर्णनांची नवी रीत : नरेंद्र-भास्कर-दामोदर
- भास्कराच्या काव्यात हास्यरस आहे.
- ‘आत्मनिर्वेदता’ – काव्याला आत्मनिष्ठ रूप देण्याचा प्रयत्न.
- विश्वनाथबासांनी काव्याचे वर्गीकरण मांडले आहे.
- भक्तीचा ‘रस’ म्हणून गौरव करणारे महानुभावीय कवी हे मराठीतील ‘भक्तिरसा’चे पहिले पुरस्कर्ते होत.